खरी कुजबुज: मडगाव पोलिस स्‍थानकाला असं काय लागलंय सोनं?

Khari Kujbuj Political Satire: प्रतिमा कुतिन्हो व त्यांचे यजमान सावियो कुतिन्हो यांनी आंदोलन हायजॅक करण्याच्या दिशेने पावले उचलली व त्‍यामुळे ‘आप’वाल्यांनी म्हणे या आंदोलनातून काढता पाय घेतला. शिवाय चर्च संघटना व अन्य विचारवंतांनी लोकांना सबुरीने घेण्याचे आवाहन केल्याने आंदोलनाचा जोर ओसरला.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव पोलिस स्‍थानकाला असं काय लागलंय सोनं?

मडगाव पोलिस स्‍थानकातील पोलिस दुसरीकडे बदली केली तरी हालत नाही आहेत. आणि कुणा बाबाच्‍या आशीर्वादाने माहीत नाही, या बदली झालेल्‍या पोलिसांना कुणी रिलिव्‍हही करत नाहीत. उदाहरण द्यायचेच झाल्‍यास एका हवालदाराचे द्यावे लागेल. हा हवालदार २०१६ साली मडगाव पोलिस स्‍थानकात कामाला लागला होता. अजूनही तो तेथेच आहे.

दोन महिन्‍यांपूर्वी त्‍याची बदली मडगावच्‍याच वाहतूक विभागात करण्‍यात आली. हा वाहतूक विभाग मडगाव पोलिस स्‍थानकाच्‍या इमारतीतच आहे. पण दोन महिने झाले तरी या हवालदाराला या कक्षातून त्‍या कक्षात जाण्‍यास वेळ मिळत नाही. आणखी एक साहाय्‍यक उपनिरीक्षक तर म्‍हणे, २७ वर्षे तेथेच ठाण मांडून आहे.

शिवाय आणखी चार पोलिसही गेली कित्‍येक वर्षे एकाच ठिकाणी आहेत. त्‍यांच्‍याविरोधात आता काही जणांनी पोलिस महासंचालकांकडे तक्रारही केली आहे. एकाच ठिकाणी एवढी वर्षे ठाण मांडून बसण्‍यामागे त्‍यांचे कोणते गणित असेल बरे?∙∙∙

अखेर अतिउत्साह नडलाच!

सुभाष वेलिंगकर यांच्या वादग्रस्‍त विधानावरून राज्‍यात वादळ उठले आहे. आंदोलने केली जात आहेत. प्रतिमा कुतिन्हो व त्यांचे यजमान सावियो कुतिन्हो यांनी हे आंदोलन हायजॅक करण्याच्या दिशेने पावले उचलली व त्‍यामुळे ‘आप’वाल्यांनी म्हणे या आंदोलनातून काढता पाय घेतला. शिवाय चर्च संघटना व अन्य विचारवंतांनी लोकांना सबुरीने घेण्याचे आवाहन केल्याने रविवारी आंदोलनाचा जोर ओसरला.

पोलिस यंत्रणेनेही कठोर पावले उचलली. परिणामी कुतिन्हो दाम्‍पत्याने आंदोलन मागे घेण्याचे जाहीर केले. त्यांच्यासमोर दुसरा पर्यायच नव्हता. सावियोचे सोडा, पण एकंदर प्रकरणात प्रतिमाबायने जो आक्रस्ताळेपणा दाखवला, तो म्‍हणे त्यांच्या समर्थकांनाही आवडला नाही. या आंदोलनाचा लाभ घेऊन त्या राजकारणातील आपले स्थान मजबूत तर करत नाही ना, अशी शंका अनेकांना येऊ लागली. प्रथम काँग्रेस व नंतर ‘आप’वाल्यांनाही त्या डोईजड झाल्या, असे आता आंदोलकच म्‍हणू लागले आहेत. ∙∙∙

तो ‘सुदिन’ कधी उजाडणार?

राज्यात विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी वीजमंत्री प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. आपण एवढे रुपये खर्च करतो, तेही लोकांच्या खिशातील. पण वीज खात्यातील ग्राहक सेवा, फोन कधी व्यवस्थित चालल्याचे ऐकिवात नाही.

विजेची समस्या सांगण्यासाठी बऱ्याचदा फोन करावा तर तो बंद. फोन सुरू असला तरी उर्मट उत्तरे. आधीच ग्राहक वैतागलेला असतो, त्यात असा हा प्रकार. काय करावे? निदान ग्राहकांशी कसे बोलावे यासाठी तेथे प्रशिक्षित माणूस नेमणे हाच त्‍यावर एकमेव उपाय, नाही का? सुदिन साहेब, लक्ष घालतील का? ∙∙∙

जमत नसेल, तर वचन देऊ नये!

राज्यातील खाणअवलंबित सध्या साशंक बनले आहेत. राज्यातील खनिज व्‍यवसाय गणेश चतुर्थीनंतर पुन्हा एकदा नव्‍या जोमाने सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्‍यापूर्वी केली होती. पण आता चतुर्थी संपून एक महिना उलटला तरीही खाणी सुरू होण्याच्या कोणत्याच हालचाली नसल्याने खाणअवलंबितांच्‍या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली आहे.

प्रत्येकवेळी राजकारणी निवडणूक जवळ आली की खाणी सुरू होण्याचे गाजर दाखवतात. पण यावेळेला कोणतीच निवडणूक नसतानाही मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते. त्यामुळे खाणअवलंबितांचा विश्‍वास बसला होता. पण या विश्‍वासालाही तडा जाण्याचा प्रकार घडत आहे. ∙∙∙

युरींचा इरादा, इशारा बदलला?

‘आपण जे बोलतो ते करून दाखवितोच’ असे कुंकळ्‍ळीचे आमदार व विरोधी पक्षनेते युरी आलेमाव सांगतात. काल त्‍यांनी मॅरेथॉन पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष लँड्री मास्कारेन्‍हस व कुंकळ्‍ळी काँग्रेस गट समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी युरीनी कुंकळ्‍ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा मुद्दाही उपस्थित केला.

सरकारने केवळ सात हजार रुपयांचा दंड ठोठावून प्रदूषणकारी कारखाने पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिल्यामुळे युरी संतापले आहेत. आपण हे प्रकरण हरित लवाद व उच्च न्यायालयात नेणार आहे, असा इशारा द्यायला त्‍यांनी मागेपुढे पाहिले नाही.

युरीबाब आपण प्रदूषणाविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. त्याचे काय झाले? हरित लवाद व उच्च न्यायालयात जरूर जा, मात्र जनतेच्या न्यायासाठी आपण रस्त्यावर कधी उतरणार हे सांगा ना? असे कुंकळ्‍ळीकर विचारायला लागले आहेत.∙∙∙

‘नाना’ रंग

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. जे पोटात तेच ओठात, अशी त्यांची ओळख आहे. गोवा विद्यापीठात आयोजित व्याख्यानमालेत त्यांना एका सरकारी अधिकाऱ्याने प्रश्‍‍न विचारला.

आजच्या तरुणाईला पर्यावरणाबाबत कसे मार्गदर्शन करावे? नाना पटकन म्‍हणाले, मला सांगा ही जबाबदारी तुमची नाही का? त्यावेळी एकच हशा पिकला. कार्यक्रमादरम्यान चित्रपट, अभिनयावर प्रश्न विचारू नका, असे आयोजकांनी सांगूनही आपलेच खरे करत विद्यापीठातील एका प्राध्यापकाने चित्रपटाबाबत प्रश्न विचारलाच.

नानांनी त्यांची देखील फिरकी घेतली. परंतु हिंदी विषयातील एक प्राध्यापक, जे शेती विषयक चांगले काम करतात, त्यांची पाठ थोपटायला देखील ते विसरले नाहीत. असे नानांचे विविध रंग पाहून विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये दिवसभर चर्चा रंगल्या. ∙∙∙

असाही घरचा अहेर

गोव्यातील प्रत्येकाच्या रक्तात सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांची जनुके असल्याचे वक्तव्य पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी केले आहे. भाजपचे प्रवक्ते असलेले गिरीराज पै वेर्णेकर यांनी वैयक्तिक पातळीवर ते खोडून काढत त्यांना घरचा आहेर दिला आहे.

सिक्वेरा यांना समस्त हिंदू समाजाच्या वतीने बोलण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न वेर्णेकर यांनी उपस्थित केला आहे. हिंदूंचा ठेका त्यांना कोणी दिलेला नाही, असेही वेर्णेकर यांनी ठणकावले. सर्वधर्मसमभाव म्हटले जाते तेव्हा दुसऱ्या धर्माचा दुस्वास त्यात अभिप्रेत नाही. वादग्रस्त विधाने करण्याचा अधिकार सिक्वेरा यांना नाही.

फादर बोलमॅक्स यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती, त्यावेळी त्यांना जागा दाखवून देण्याची गरज होती. ते न करता त्यांच्या विधानाचे समर्थन अनेकजण करत होते. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, ते ठरवण्यासाठी हिंदू समर्थ आहेत. फादर बोलमॅक्स असो किंवा सिक्वेरा, यांनी हिंदूंचे प्रतिनिधीत्व करू नये, तशी आम्हाला गरज नाही. ∙∙∙

Khari Kujbuj
खरी कुजबुज: ‘शॅक’धारकांना सुखद धक्का!

आलेक्स यांची शरणागती

पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्‍यावर त्‍यांनी केलेल्‍या ‘तमाम गोमंतकीयांच्या रक्तात सेंट फ्रान्‍सिस झेवियर यांची जनुके आहेत’ या विधानाबद्दल माफी मागण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सोमवारी रात्री दिल्ली दौऱ्यावर निघण्यापूर्वी भाजपचे प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी वैयक्तिक पातळीवर व्हिडिओ जारी केला.

यामुळे आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याची कल्पना राजकारणात मुरलेल्या सिक्वेरा यांना आल्याशिवाय राहिली नाही. त्‍यांनी आपल्‍या विधानाने कोणाला वाईट वाटले असेल तर मी माफी मागतो असे सांगून हा विषय गुंडाळण्याचा प्रयत्न केला. आपल्या विधानाचा विपर्यास केला अशी पुस्ती जोडण्यासही त्यांनी कमी केले नाही. शांती, सौदार्ह, धर्मनिरपेक्षता, बंधुत्व हे प्रत्येकाच्या रक्तात आहे असे मला म्हणायचे होते असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com