'..मोबाईल कमी वापर'! आई ओरडली; 12 वर्षांची मुलगी दिल्लीच्या ट्रेनमध्ये चढली; घर सोडून गेलेली गोव्यातील 3 मुले सापडली उत्तर भारतात

Goa Missing Cases: रागाच्या भरात घर सोडून गेलेली मडगाव येथील १२ वर्षांची मुलगी शेवटी दिल्लीत सापडली. तसेच वडील रागावल्याने घर सोडून गेलेले नावेली येथील दोघे भाऊ उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे सापडले.
Goa Missing Cases
Goa Missing CasesDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मोबाईल फोनचा जास्त वापर करत असल्याने आई रागावली आणि त्या रागाच्या भरात घर सोडून गेलेली खारेबांध (मडगाव) येथील १२ वर्षांची मुलगी शेवटी दिल्लीत सापडली. तसेच वडील रागावल्याने घर सोडून गेलेले नावेली येथील दोघे भाऊ उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे सापडले.

यातील पहिले प्रकरण १७ नोव्हेंबर रोजी घडले. खारेबांध येथे राहणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराची मुलगी अचानक नाहीशी झाल्याने तिच्या आईने मडगाव पोलिसांत तक्रार दिली होती. मोबाईलच्या अतिवापरावरून आई तिला ओरडल्याने तिने घर सोडून मडगाव रेल्वे स्थानक गाठले आणि थेट दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमध्ये ती चढली.

दुसरी नावेली येथील घटना १८ नोव्हेंबर रोजी घडली. क्षुल्लक कारणावरून वडील रागावल्याने १७ वर्षीय मुलाने १२ वर्षांच्या भावासह घर सोडले आणि तेही उत्तर प्रदेशात जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसले. ही तिन्ही बेपत्ता झालेली मुले अल्पवयीन असल्याने मडगाव पोलिसांनी अपहरण म्हणून दोन्ही घटना नोंद केल्या होत्या.

मडगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक सूरज सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, खारेबांध येथील मुलगी आणि नावेलीतील दोन मुले नाहीशी झाल्यावर दोन वेगवेगळी पथके तयार करून शोध सुरू केला. कदंब बसस्थानक तसेच कोकण रेल्वे स्थानकावर शोध घेतला असता, ही मुले दोन वेगवेगळ्या रेल्वेंमध्ये चढल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. मडगाव पोलिसांनी दिल्ली व उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधून त्यांना सतर्क केले. रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मडगाव पोलिसांना याची खबर दिली.

आई-वडिलांना भेटण्यासाठी मुलगा निघाला; पण...

येथून बेपत्ता झालेला एक विद्यार्थी शोधाअंती रत्नागिरी रेल्वे स्थानकावर सापडला. त्याला योग्य सोपस्कारानंतर त्याच्या आत्याकडे सोपविण्यात आले. तो शिकण्यासाठी वास्कोत आत्याकडे राहतो. त्याचे आई-वडील आंध्रमध्ये राहतात. आई-वडिलांची आठवण येत असल्याने तो आपल्या गावी निघाला होता. तथापि, त्याला गावी जाण्यासाठी कोणती रेल्वे पकडावी, हे माहीत नव्हते. त्यामुळे समोर दिसेल त्या रेल्वेत तो चढला. मात्र, अंगावरील शालेय गणवेषामुळे तो रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान आणि तिकीट तपासनीसाच्या नजरेत आला. त्यांनी चौकशी केल्यावर सत्य बाहेर आले.

वास्को येथील एका विद्यालयामध्ये नववीच्या वर्गात शिकणारा एक विद्यार्थी १९ पासून बेपत्ता होता. शाळा सुटल्यावर तो घरी परतला नाही. सायंकाळी उशिरापर्यंत तो घरी न पोचल्याने शोधाशोध सुरू झाली; परंतु त्याचा शोध न लागल्याने पोलिस तक्रार करण्यात आली. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी शोध सुरू केला. तसेच विविध पोलिस स्थानकांना माहिती देण्यात आली. तसेच तांत्रिक देखरेख युनिटने शोध घेण्यास आरंभ केला.

Goa Missing Cases
Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

या विद्यार्थ्यासंबंधी माहिती मिळाल्याने रत्नागिरी येथील रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानांनी लक्ष ठेवले होते. हा मुलगा रत्नागिरी रेल्वे स्थानकावर नजरेस पडल्यावर त्याला रेल्वे अधिकारी आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या जवानाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सर्व माहिती सांगितली. त्यानंतर तो मिळाल्याची माहिती वास्को पोलिसांना देण्यात आली. अवघ्या चोवीस तासांत या विद्यार्थ्याचा शोध लागल्याने नातेवाईकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. याप्रकरणी वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक निखिल नाईक देसाई पुढील तपास करीत आहेत.

Goa Missing Cases
Missing Police Constable: ..घरच्यांनी सांगितले केरळला गेला! पोलिस कॉन्स्टेबल 2 वर्षे बेपत्ता; मायणा कुडतरीतील शिपायाला बडतर्फीची नोटीस

नावेलीतून मुलीचे अपहरण

मडगाव आणि नावेली येथून घर सोडून गेलेल्या तीन मुलांना शोधण्यात मडगाव पोलिसांना यश आले असतानाच २० नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास एका मुलीचे अपहरण झाल्याची नवीन तक्रार मडगाव पोलिसांत नोंद झाली आहे. मडगाव पोलिसांनी या प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला असून उपनिरीक्षक सुभाष गावकर हे याप्रकरणी तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com