Goa Politics: खरी कुजबुज; घर फिरले की घराचे वासेही फिरतात!

Khari Kujbuj Political Satire: मडगाव पालिकेच्‍या सभागृहात मडगावच्‍या नियोजित मास्‍टर प्‍लॅनचे सादरीकरण करण्‍यात आले. या सादरीकरणाला मडगावातील कित्‍येकांनी गर्दी केली होती.
Goa Latest Political Updates
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

मास्‍टर प्‍लॅनमध्‍ये मोतीडोंगरवासीयांनाही रुची?

मडगाव पालिकेच्‍या सभागृहात मडगावच्‍या नियोजित मास्‍टर प्‍लॅनचे सादरीकरण करण्‍यात आले. या सादरीकरणाला मडगावातील कित्‍येकांनी गर्दी केली होती. त्‍यात मडगावच्‍या मोती डाेंगरावरील झोपडपट्टीत रहाणाऱ्या लोकांचाही बऱ्यापैकी समावेश होता. आता मोती डाेंगरावरील लोकांनी मास्‍टर प्‍लॅनच्‍या सादरीकरणाला हजर राहिले म्‍हणून त्‍यात आक्षेप घेण्‍याचे काम नाही. तरीही मडगावातील काहीजण आता मडगावच्‍या आराखड्यात मोती डोंगरावरीलही लोक रुची घेऊ लागले आहेत, म्‍हणून टीका करू लागले आहेत. खरेच या मोतीडोंगरवासीयांना मडगावच्‍या नियोजनाबद्दल एवढा पुळका आहे का? ∙∙∙

घर फिरले की घराचे वासेही फिरतात!

गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळून २४ तास व्हायच्या आधीच त्यांच्यासोबत असणाऱ्या बेतकी-खांडोळा पंचायतीच्या पाच पंच सदस्यांनी त्यांची साथ सोडली आणि सरपंच विशांत नाईक यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला. ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’, या म्हणीचा यातून प्रत्यय आला. मंत्रिपद जाताच, त्यांच्याबरोबर असणारे एका रात्रीच फिरले आणि त्यांना खांडोळ्यात एकाकी पाडले, सत्तेची अजब जादू प्रियोळात सध्या कार्यरत आहे. कदाचित अशीच जादू भोम-अडकोण, तिवरे-वरगाव (माशेल) पंचायतीतही चालण्याची शक्यता अधिक आहे. ∙∙∙

…गोविंदाला जोरदार झटका!

प्रियोळात सत्तेची समीकरणे २४ तासांत बदलली असून ‘मगो’सह भाजपचा मूळ गट सक्रीय झाला आहे. त्यामुळे गावडेंबरोबर नेमके कोण होते, हेच कळत नाही. प्रियोळात त्यांना वेगवेगळे झटके बसत आहेत. त्यांचे पंचायतीवर असलेले वर्चस्व पंच झुकारत असून पुढील आमदार आपलाच असेल असे बिनधास्तपणे म.गो.-भाजप समर्थक पंच, कार्यकर्ते, बोलत आहेत. सात पंचायतीपैकी दोन पंचायतीवर ‘मगो’ चे वर्चस्व असून इतर दोन पंचायतीत बदलाचे वारे आहेत. खांडोळा पंचायत आज त्यांच्याकडून निसटली. त्यामुळे एकूण पाच पंचायती विरोधात आहेत, हा एक वेगळा जोरदार झटका गोविंदाला बसला आहे. ∙∙∙

बाबांच्‍या घरी गर्दी वाढली!

बदलत्‍या राजकीय घडामोडीत गावडेंचा ‘गोविंदा’ काल मुख्‍यमंत्र्यांनी केल्‍यानंतर सध्‍या आशेचे धुमारे जर कुणाला फुटले असतील, तर ते मडगावच्‍या बाबा समर्थकांना. आता मडगावचे हे बाबा म्‍हणजे, दिगंबर कामत हे काही वेगळे सांगण्‍याची गरज नाही. मंत्रिमंडळात एक जागा खाली झाल्‍याने आता आमच्‍या बाबांची वर्णी तिथे होईलच, असा विश्‍वास आता कामत यांचे कार्यकर्ते व्‍यक्‍त करू लागले आहेत. काल गुरुवारी कामत यांच्‍या निवासस्‍थानी लोकांची बरीच गर्दी होती, असे सांगण्‍यात येते. आता ही गर्दी बाबा मंत्री होणार म्‍हणून की, मडगावच्‍या ‘मास्‍टर प्‍लॅन’ च्‍या सादरीकरणाला जाण्‍यापूर्वी बाबांच्या घरी दिलेली भेट. हे मात्र समजू शकले नाही बुवा! ∙∙∙

‘अच्छे दिन’ पण कधी...?

कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे महत्त्वाकांक्षी लोकप्रतिनिधींपैकी एक नेते! त्यांची ही मनीषा आता कोणापासून लपून राहिलेली नाही. याच सुप्त इच्छेपोटी त्यांनी मध्यंतरी, भाजपापासून फारकत घेतली होती अन् निवडणूकीच्या निकालानंतर पुन्हा भाजपाला मिठी मारली होती हे सर्वश्रुत आहे. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे, बुधवारी १८ जूनला मायकल लोबोंचा वाढदिन थाटात साजरा झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही भेट दिली. येणाऱ्या काळात लोबोंना ‘अच्छे दिन’ पाहायला मिळतील, असे ते बोलले. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये लोबोंच्या वाढदिनी मुख्यमंत्र्यांनी हेच वक्तव्य केले होते. त्यामुळे लोबोंचे ‘अच्छे दिन’ कधी? असा प्रश्न त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. सद्यस्थितीत गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून गोविंद गावडेंना दोतोरने मंत्रिमंडळातून वगळले आहे. तसेच येणार्‍या काळात मंत्रिमंडळात फेरबदलचे संकेत मिळत आहेत. अशावेळी कदाचित लोबोंना मंत्रिमंडळात स्थान मिळते की दोतोरकडून फक्त आश्वासनाचे गाजर लोबोंना दिले गेले, हे येत्या काही दिवसांत समजेलच. ∙∙∙

बाबूंनी स्थान राखले!

हे बाबू केपेचे, म्हणजे बाबू कवळेकर. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि बाबू राजकीयदृष्ट्या संपला,अशी हाकाटी त्यांच्या विरोधकांनी मारण्यास सुरवात केली. पण बाबूंनी त्या टीकेकडे लक्ष न देता आपले काम सुरूच ठेवले आणि पक्षातही आपली प्रतिमा उजळ ठेवली. त्याचा परिणाम काल दिसून आला. काल भाजप प्रदेश कार्यकारिणीची समिती जाहीर झाली. मागच्या समितीत आणि या नव्या समितीत अनेक बदल झाले पण मागच्या समितीत उपाध्यक्ष असलेल्या बाबूंना त्याच पदावर ठेवले गेले. आणखी एक बदल झाला नाही, तो म्हणजे खजिनदार. हे पद संजीव देसाई यांच्याकडेच ठेवण्यात आले. यावरून विरोधक काही म्हणोत, बाबूंचे भाजपात वजन किती आहे ते स्पष्ट झाले, नाही का? ∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: गोविंद गावडे यांच्यानंतर आणखी दोन मंत्र्यांंना मिळणार नारळ; याच आठवड्यात होणार मंत्रिमंडळात फेरबदल?

रवींचा सल्ला घेतला असता तर...

गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून डच्चू दिल्यानंतर फोंड्यात विविध अँगलने चर्चा सुरू झाली आहे. गोविंद हे कृषिमंत्री रवी नाईक यांचे शिष्य. रवींच्या तालमीतूनच त्यांनी राजकारणाचा श्री गणेशा गिरवला आहे. आणि ते तसे जाहीरपणे सांगतही असत. असे असूनही ते रवींचा एक गुण घ्यायला विसरले, तो म्हणजे त्यांची स्थितप्रज्ञता. रवींचे बघा इतकी वर्षे राजकारणात असूनही ते कधीच कोणत्या वादात सापडलेले दिसले नाहीत. म्हणूनच अनेकदा पक्षांतरे करूनही त्यांच्या स्थानाला झळ पोहोचू शकली नाही. त्यामुळे विरोधकही त्यांच्याकडे ‘फादरली फिगर’ म्हणून बघत असतात. म्हणूनच गोविंदानी वादग्रस्त विधाने करण्यापूर्वी रवींचा सल्ला घ्यायला हवा होता, असे लोक आता बोलू लागलेत. पण आता बोलून काय फायदा ‘जब चिडिया चुग गयी खेत’.∙∙∙

Goa Latest Political Updates
Goa Politics: 'विचार न करता मतदान केले, तर उद्याचा गोवा आपल्यासाठी नसेल'! परब यांचा इशारा; विरोधकांसोबत जाण्याबाबत केले मोठे विधान

प्रियोळात झेडपी कोण?

प्रियोळ मतदारसंघात मंत्रिपद गेल्यामुळे गावडेंचे वर्चस्व कमी झाल्याने त्यांची साथ अनेकांनी २४ तासांतच सोडली. त्यांच्याबरोबर असलेले पंच बाजूला झाले असून इतर दोन पंचायतीत गावडे समर्थक सरपंचांना पायउतार व्हावे लागणार आहे. याचा परिणाम आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीवरही होणार आहे. गावडे समर्थक उमेदवारांना निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे. कदाचित पुढील झेडपी भाजप, ‘मगो’ समर्थक उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भातही एकाच दिवसात हालचाली सुरू झाल्या आहेत. सध्या गावडे समर्थक गायब होत असून मगो-भाजपचे समर्थक असल्याचे भासवत आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com