
पणजी: ‘गोमंतकीयांच्या हिताशी कदापि तडजोड न करता स्वच्छ हेतू ठेवून विरोधक एकत्र येणार असल्यास आपण त्यांच्यासोबत जाऊ शकतो’, अशी ग्वाही ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे प्रमुख मनोज परब यांनी ‘गोमन्तक’च्या खास ‘टेबल टॉक’ कार्यक्रमात दिली.
परब यांनी प्रथमच अशी भूमिका मांडली असून, भविष्यात तशी पावले पडल्यास राजकीय पटलावर नवे समीकरण उदयास येऊ शकते. ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक राजू नायक यांनी परब यांच्याशी संवाद साधला.
गोव्याच्या हितासाठी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्ष कायम झटत राहील. खून, अपघात, मारामारी, भंगारअड्डे अशी संस्कृती हवी का, याचा लोकांनी विचार करावा. गोमंतकीयांची सहनशक्ती संपत आली आहे. जर आपण विचार न करता मतदान करत राहिलो, तर उद्याचा गोवा आपल्यासाठी नसेल, त्यामुळे आपण मतदान करताना विचार करावा, असे भावनिक आवाहन ‘आरजी’चे प्रमुख मनोज परब यांनी केले.
‘गोमन्तक टीव्ही’वरील खास कार्यक्रमात परब बोलत होते. त्यांनी ‘पोगो बिल’बद्दल पक्षाची भूमिका विषद केली. ते म्हणाले, ‘पोगो’ ही एक आंदोलनात्मक भूमिका नसून आमचा गाभा आहे. लोकांना माहिती आहे की ‘पोगो’ म्हणजे गोमंतकीय हक्कांचे रक्षण करणारे बिल आहे. आमच्यासाठी आम्ही मांडलेले बिल महत्त्वाचे असून हा विषय आमच्यासाठी कधीच संपणार नाही.
दरम्यान, निवडणुकीनंतर आमच्याकडे पूर्णवेळ कार्यकर्त्यांची कमतरता होती; परंतु आता पुन्हा संघटन तयार करायचे काम सुरू आहे. कार्यकर्त्यांना प्रशिक्षण द्यावे लागते आणि आवश्यक साधने नसल्याने भाजपविरोधात लढण्यासाठी आम्हाला अधिक परिश्रम करावे लागतात, असे परब यांनी स्पष्ट केले.
२०२२ निवडणुकीत झालेल्या मतदानावर प्रतिक्रिया देताना परब म्हणाले की, २०२२ निवडणुकीवेळी मी पक्षाचा चेहरा होतो आणि राज्यभर फिरावे लागत होते. त्यामुळे मला माझ्या मतदारसंघातदेखील प्रचार करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. आता मतदारसंघात आमचे सक्षम कार्यकर्ते तयार झाले आहेत, त्यामुळे पूर्वीसारखा प्रचार करण्याची जबाबदारी कमी होईल.
२० डिसेंबर १९६१ पूर्वी जे गोव्यात वास्तव्यास होते ते गोमंतकीय, अशी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाची स्पष्ट व्याख्या आहे. परंतु सरकारने अजूनही याबाबत ठोस कायदा आणलेला नाही. आम्हाला सत्ता मिळाली, तर गोमंतकीयत्वाचा कायदा करणार, असे परब यांनी ठामपणे सांगितले.
परब म्हणाले, आम्ही बिगर गोमंतकीयांच्या विरोधात नाहीत. जे बिगर गोमंतकीय आज बेकायदेशीररित्या राहात आहेत, नियम झुगारून बांधकामे करतात, त्यांच्याविरुद्ध आम्ही ठाम आहोत. आम्ही कोणावर अन्याय करत नाही; पण गोमंतकीयांचे हक्क डावलले, तर मूग गिळून बसणार नाही, असा इशाराही परब यांनी दिला.
आज भाजपला हरविणे, हे एक आव्हान आहे; पण गोमंतकीयांचे अस्तित्व जपणे, ही खरी लढाई आहे. भाजप आज काँग्रेसमय झाला आहे, असे देखील परब यांनी ठासून सांगितले. भाजपच्या ‘बी टीम’ असल्याच्या आरोपावरही त्यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले की, जर तसे असते तर आम्ही आज इतर पक्षांशी चर्चा करण्यास तयारीच दर्शविली नसती.
गोमंतकीय कोण, हे स्पष्ट करण्याची हीच वेळ आहे.
आम्ही बेकायदेशीर बांधकामे, झोपडपट्ट्या आणि बाहेरून आलेल्या नियमबाह्य लोकांचे समर्थन करणार नाही.
काँग्रेस कर्नाटकात म्हादईविरोधात भूमिका घेते आणि गोव्यात आम्हाला गप्प बसायला लावते, हे चालणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.