

सासष्टी: मडगाव शहरात डेंग्यूचे केवळ आठ रुग्ण आढळले असून, शहरात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात हॉटस्पॉट नसल्याचे मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. बाप्तिस्त मास्कारेन्हस यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात मडगाव पोलिस स्थानकात डेंग्यूचे पाच रुग्ण आढळले होते. मात्र, त्यानंतर पोलिस स्थानकात एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. तसेच हे पाच रुग्ण एकाच दिवशी आढळले नव्हते. दर १५ दिवसांनी एक याप्रमाणे रुग्ण आढळले होते. मडगावातील इतर रुग्णही शहरातील नसून, वेगवेगळ्या गावांमधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आरोग्य केंद्राकडून प्रत्येक रुग्णाची तपासणी करून त्याची माहिती घेतली जात आहे. फातोर्डा परिसरातही डेंग्यूचे अधिक रुग्ण आढळलेले नाहीत, असे डॉ. मास्कारेन्हस यांनी सांगितले.
सध्या पावसाबरोबरच अधूनमधून ऊन पडत असल्याने डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी कार्यरत आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित फॉगींग तसेच नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवली जात आहे.
नागरिकांनीही दक्षता घ्यावी!
नगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने विविध भागांत फॉगींग करण्यात येत आहे. मात्र, मनुष्यबळाची कमतरता असल्याने प्रत्येक घरात जाऊन तपासणी करणे शक्य नसल्याचे मास्कारेन्हस यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनीही स्वतःची काळजी घेऊन घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.