म्हापसा : मोपा विमानतळाचं काम पूर्ण झाल्यावर म्हापसा गोव्यातील मोठं शहर म्हणून नावारुपाला येईल, अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कौतुक केलं आहे. म्हापसा आंतरराज्य बसस्थानकाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात म्हापशाच्या विकासासाठी विविध योजना राबवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आमदार ज्योशुआ डिसोझा, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली.
गोवा सरकारच्या (Goa Government) साधनसुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून 10,075 चौमी जागेवर बसस्थानकाचं बांधकाम करण्यात आलं आहे. आतापर्यंत या बसस्थानकाच्या बांधकामावर 4.91 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या बसस्थानकाच्या आवारात बससोबतच टेंपो, कार, रिक्षा, दुचाकी यांनाही पार्किंगची सोय करण्यात आली आहे. तसंच कदंबचं कार्यालय, चालकांसाठी सोय, प्रवाशांसाठी शेड, कँटीन, स्वच्छतागृह, हायमास्ट, मार्केट यार्डापर्यंत जाणाऱ्या 10 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या बांधकामाचा पहिल्या टप्प्यातील कामात समावेश आहे.
पुढील सहा महिन्यात म्हापसा (Mapusa) मुख्य बसस्थानकाचं कामही मार्गी लावलं जाईल, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) म्हणाले. म्हापशाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तार नदीच्या सौंदर्यीकरणासाठी पुढील 3 वर्षात सर्व सुविधा पुरवल्या जातील. त्यानंतर म्हापसावासीयांना संध्याकाळच्या वेळी फिरण्यासाठी विरंगुळ्याचं ठिकाण विकसित करण्याचा मानस असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच या परिसरात पर्यटकांना (Tourist) आकर्षिक करण्यासाठी पावलंही सरकार उचलणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.