Mapusa Municipality Pre-Monsoon Work: म्हापसा पालिका क्षेत्रातही माॅन्सूनपूर्व कामे संथगतीनेच सुरू आहेत. शहरातील ओढे व नाल्यांमध्ये अनेक ठिकाणी कचरा दिसत असताना प्रशासनाकडून ही कामे माॅन्सूनपूर्व केली जातील असा दावा केला जात आहे.
साफसफाईच्या पहिल्या फेरीनंतर रस्त्याशेजारी काढून ठेवलेला गाळ अद्याप हटविणे बाकी आहे.
पालिकेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे, नाले, गटारे, चेंबर आदींची साफसफाई व राडारोडा उचलण्याची कामे केली जातात. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी डांबरीकरण केले जाते.
मात्र सध्या भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू असून अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांचे डांबरीकरण होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
यंदाही पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांसाठी निविदा काढण्यात आली. या कंत्राटदाराकडून मार्केट परिसर व शहरातील प्रभागांतील साफसफाई केली जात आहे. या व्यक्तिरिक्त पालिकेने पहिली फेरी काही दिवसांपूर्वीच पूर्ण केली होती.
अनेक प्रभागांतील गटाराशेजारी काढून ठेवलेला गाळ सध्या उचलण्याची कामे संथगतीने सुरू आहेत.
काढून ठेवलेला गाळ आरोग्यास घातक
म्हापसा मार्केट परिसरातील गटारांतील गाळ काढण्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू होते. परंतु काही ठिकाणी पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटूनही हा गाळ उचललेला नाही. मार्केटमध्ये बाजारहाटसाठी लोकांची वर्दळ असते.
शिवाय विक्रेतेही असतात. त्यामुळे इतके दिवस गाळ काढून तो उघड्यावर ठेवणे अयोग्यच. कारण आरोग्यासाठी ते घातक आहे. उपलब्ध माहितीनुसार, पालिकेजवळ ट्रकांची कमतरता असल्याने हा गाळ हटविण्यास विलंब झाला आहे.
पालिकेकडे दीडशे कामगारांची फौज; पण…!
आपत्कालीन स्थिती हाताळण्यास म्हापसा पालिकेजवळ स्वतःची अशी सक्षम यंत्रणा नाही. त्यांना वीज खाते व अग्निशमन दलावर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही.
आपत्कालीन स्थितीसाठी पालिकेकडून प्रशासकीय व्यवस्थापनास स्वतःचे दहा कर्मचारी पुरवितात. आपल्याजवळ स्वतःची 2 कटर मशिन्स, 1 जेसीबी तर 15 ट्रक चालू स्थितीत असल्याचा दावा पालिका करते.
मात्र वास्तव वेगळे आहे. तसेच पालिका आपल्या कार्यक्षेत्रात आपत्कालीन स्थितीवेळी कायमस्वरुपी व रोजंदारी मिळून 100 ते 150 कामगार युद्धपातळीवर कामास लावण्याची क्षमता ठेवते. मात्र त्यामुळे शहरातील दैनंदिन कामांवर परिणाम होऊ शकतो.
पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे पालिका क्षेत्रात सध्या वेगाने सुरू आहेत. या कामांचा आढावा घेतल्यानंतर ती मे अखेरपर्यंत पूर्ण होतील असा विश्वास आहे. तसेच जलस्त्रोत विभागाने साफसफाईची कामे हाती घेतली आहेत. पावसाळ्यात लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रयत्नशील आहे.
प्रिया मिशाळ, नगराध्यक्षा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.