

म्हापसा: म्हापसा पालिकेच्या बुधवारी (ता. २५) झालेल्या सर्वसाधारण बैठकीत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. मागील बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी गटातीलच काही नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. एकमेकांवरील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप आणि असंसदीय शब्दांच्या वापरामुळे वातावरण कमालीचे तापले. अखेर उपनगराध्यक्षांना आपले शब्द मागे घेण्याची वेळ ओढवली.
नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी अन्य नगरसेवक व मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर उपस्थित होते. चर्चेदरम्यान नगरसेवकांनी एकमेकांना लक्ष्य करत केलेली वैयक्तिक टीका ''ऑन रेकॉर्ड'' घेतली जाणार नाही, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. तसेच सर्वांनी बोलताना मर्यादा पाळावी, अशी सूचनाही त्यांनी केली; मात्र लोकप्रतिनिधींकडून त्याचे पालन होताना दिसले नाही.
बैठकीत रक्ताच्या नात्यातील दुकान हस्तांतरणाच्या विषयावरून उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट आणि नगरसेवक साईनाथ राऊळ यांच्यात वादाची ठिणगी पडली. मागील बैठकीत या विषयावर झालेली चर्चा आणि नोंदवलेले महत्त्वाचे मुद्दे उपनगराध्यक्षांच्या सांगण्यावरून लघुलेखकाने जाणीवपूर्वक वगळल्याचा गंभीर आरोप राऊळ यांनी केला. यावरून त्यांनी भिवशेट यांना चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे, संबंधित महिला लघुलेखकाने उपनगराध्यक्षांनी तसे करण्यास सांगितले होते, असा दावा सभागृहासमोर केल्याने हे प्रकरण अधिकच चिघळले.
नगरसेवक ॲड. शशांक नार्वेकर, शुभांगी वायंगणकर, डॉ. नूतन बिचोलकर, कमल डिसोझा आणि डॉ. तारक आरोलकर यांनीही या वादात उडी घेत भिवशेट यांच्यावर निशाणा साधला. उपनगराध्यक्ष आपला खासगी अजेंडा राबवत असून इतिवृत्तात फेरफार करून कायद्याचे उल्लंघन करत आहेत, असा आरोप या नगरसेवकांनी केला. तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी चुकीचा पायंडा पाडत असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला.
दोन सत्रांत राडा; अखेर माफी
सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक गोंधळामुळे दुपारी २:३० वाजता तहकूब करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता पुन्हा कामकाज सुरू झाले, तरीही वादाची धार कमी झाली नव्हती. सायंकाळी ६.३० वाजता बैठक आटोपती घेण्यात आली. सायंकाळच्या सत्रात साईनाथ राऊळ आणि प्रकाश भिवशेट यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली. यावेळी भिवशेट यांनी काही असंसदीय शब्दांचा प्रयोग केल्याने वातावरण अधिकच स्फोटक बनले.
भिवशेट यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत, तारक आरोलकर, शशांक नार्वेकर आणि राऊळ यांनी आक्रमक पवित्रा घेतला. उपनगराध्यक्षांवर कारवाई करून त्यांना सभागृहाबाहेर काढावे किंवा त्यांनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. बराच वेळ चाललेल्या या गदारोळानंतर, अखेर उपनगराध्यक्ष भिवशेट यांनी “मी उच्चारलेले शब्द मागे घेतो,” असे स्पष्ट केल्यावर वादावर पडदा पडला. दरम्यान, मागील बैठकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासून सर्व मुद्दे इतिवृत्तात समाविष्ट करण्याचे आदेश नगराध्यक्षांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.