Manoj Parab Rejoin RGP: मनोज परब पुन्हा 'आरजी'च्या मैदानात! 22 नोव्‍हेंबरला पक्षप्रवेश; दोन्‍ही गटांतील संघर्ष आणखी चिघळण्‍याची शक्‍यता

Manoj Parab party entry November 22: रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) पक्षातील अंतर्गत वाद विकोपाला गेल्‍याने पक्षाच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा देत राजकीय संन्‍यास घेतलेले मनोज परब येत्‍या २२ नोव्‍हेंबर रोजी पक्षात पुन्‍हा परतणार आहेत.
Manoj Parab party entry November 22
Manoj Parab party entry November 22Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स (आरजी) पक्षातील अंतर्गत वाद विकोपाला गेल्‍याने पक्षाच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा देत राजकीय संन्‍यास घेतलेले मनोज परब येत्‍या २२ नोव्‍हेंबर रोजी पक्षात पुन्‍हा परतणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर ही घडामोड घडत असल्‍याने पक्षाचे आमदार तथा स्‍वत:ला पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष घोषित केलेले वीरेश बोरकर आणि परब यांच्‍यातील संघर्ष शिगेला पोहोचण्‍याची शक्‍यता आहे.

पणजीतील पक्ष कार्यालयात मंगळवारी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत सरचिटणीस विश्‍‍वेश नाईक यांनी मनोज परब २२ नोव्‍हेंबरला ‘आरजी’त प्रवेश करणार असल्‍याचे घोषित केले. उपाध्‍यक्ष सेबी फर्नांडिस, खजिनदार अजय खोलकर, महिला विभागाच्‍या अध्‍यक्षा देवदिता क्‍वाद्रोस, रोहन कळंगुटकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्‍थित होते.

संस्‍थापक अध्‍यक्ष या नात्‍याने मनोज परब यांनी ‘आरजी’ पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवला. लोकांना संघटित करून युवावर्गाला सोबत घेऊन त्‍यांनी गोव्‍याची ओळख, अस्‍मिता जपण्‍याचे काम केले. परब अध्‍यक्षपदी असताना पक्षाने दिलेला प्रत्‍येक लढा यशस्‍वी ठरला.

त्‍यांनी अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर मात्र परब यांनीच घडविलेले आमदार वीरेश बोरकर यांनी पदाधिकाऱ्यांच्‍या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप विश्‍‍वेश नाईक यांनी केला. पक्षाची प्रतिमा, विचारधारा, ओळख पुसण्‍याचे काम बोरकर आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांकडून सुरू आहे. त्‍यामुळेच मनोज परब पुन्‍हा पक्षात परतत आहेत, असा दावाही त्‍यांनी केला.

मनोज परब, विश्‍‍वेश नाईक, अजय खोलकर यांचे काम आणि लोकांप्रती असलेली त्‍यांची तळमळ पाहूनच आम्‍ही ‘आरजी’त प्रवेश केला. पक्षाला बळकट करण्‍यात मनोज परब यांची भूमिका महत्त्‍वपूर्ण होती. पक्षाची सध्‍याची स्‍थिती पाहून आम्‍ही त्‍यांना पुन्‍हा पक्षात येण्‍याची विनंती केली. त्‍यानुसार ते पक्षात परतत आहेत, असे देवदिता क्‍वाद्रोस यांनी सांगितले.

Manoj Parab party entry November 22
Goa Political Alliances: गोव्यात युतीचे चाक रुतले, निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले! भाजपसह विरोधी पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न

राजकारण्‍यांमुळे पक्षाची लागली वाट

‘आरजी’ ही सुरुवातीला संघटना होती. त्‍यानंतर या संघटनेचे राजकीय पक्षात रुपांतर झाले. तरीही आम्‍ही कधी राजकारणी म्‍हणून वावरलो नाही. जेव्‍हा आम्‍ही राजकारणी झालो, तेव्‍हापासून पक्षाची वाट लागण्‍यास सुरुवात झाली, असा टोला विश्‍‍वेश नाईक यांनी आमदार वीरेश बोरकर यांना लगावला.

नवा अध्‍यक्ष जानेवारीत ठरणार

मनोज परब पक्षात परतल्‍यानंतर अध्‍यक्षपद पुन्‍हा त्‍यांच्‍याकडेच जाणार का? असा प्रश्‍‍न पत्रकारांनी विचारला असता, पक्षाचा अध्‍यक्ष आमसभा ठरवते. कोअर समितीचा कार्यकाळ येत्‍या १३ जानेवारीला संपुष्‍टात येणार आहे. त्‍यानंतर आमसभा घेऊन नव्‍या अध्‍यक्षांची नेमणूक केली जाईल, असे अजय खोलकर यांनी सांगितले. तोंडावर आलेल्‍या विधानसभा निवडणुकीत मनोज परब यांची पक्षाला आणि गोव्‍याला नितांत गरज होती. त्‍यानुसारच ते पक्षात येत आहेत, असेही त्‍यांनी नमूद केले.

Manoj Parab party entry November 22
Bison In Goa: लाखेरेत गव्यांचा धुमाकूळ, बागायती पिकांची नासधूस; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

मनोजचे पक्षात स्‍वागतच : वीरेश

‘आरजी’ आमच्‍याकडेच आहे. पक्षाची खातीही आमच्‍याकडेच आहेत. यातून पक्ष कुणाकडे आहे हे दिसून येते. मनोज परब पक्षात पुन्‍हा येत असतील, तर त्‍यांचे स्‍वागतच आहे, असे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. अजय खोलकर यांनी नोटिशीला उत्तर दिलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍यावरील कायदेशीर कारवाई सुरू होईल, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.