

सासष्टी: मालभाट, मडगाव येथील अरब साब सुन्नी जामिया मस्जिदमधील राजकारण शुक्रवारी पुन्हा उफाळून आले. गेल्या तीन वर्षांपासून मस्जिदमधील निवडणुकांवरून राजकारण चालू आहे. ७९२ सदस्य असलेल्या या मस्जिदमधील कादर शाह यांनी निवडणुकांची मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत उपोषण सुरू केले. मात्र अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता उद्भवली आहे.
शाह यांनी हे उपोषण सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्या निवासस्थानाच्या बाजूलाच सुरू केले होते. मस्जिदमधील राजकारणात मंत्री कामत हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप कादर शाह यांनी यावेळी केला.
शहा यांनी यावेळी सांगितले की, २०२३ साली उर्फान मुल्ला यांनी बळजबरीने या मस्जिदचा ताबा स्वतःकडे घेतला व २३ जणांची समिती निवडल्याचा दिखावा केला. आम्ही या निवडणुका घेतल्याच नसल्याचे व विद्यमान समिती बेकायदेशीर असल्याचे मडगावचे पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा निबंधकाकडे व शेवटी मंत्री दिगंबर कामत, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापर्यंत संदेश पोहोचविला.
मात्र कोणीही याची गंभीर दखल घेतली नाही, असा त्यांचा दावा होता. याबाबत उच्च न्यायालयाने योग्य व संबंधित अधिकारणीकडे जाण्याचा आदेश दिला. त्यामुळे परत एकदा जिल्हा निबंधकांकडे गेलो, मात्र जिल्हा निबंधक आदेश देत नाही. यावेळी रियान बंदकुडा, शरीफ शेख, शफी शेख आदी उपस्थित होते.
कादर शाह यांनी ज्यासाठी बेमुदत उपोषणाचा दिखावा करण्याचा प्रयत्न केला, त्याची मुळीच गरज नव्हती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे व न्यायालयाच्या आदेशापर्यंत त्यांनी वाट पाहणे योग्य ठरले असते.
स्वत: कादर यांनीच हे प्रकरण न्यायालयात नेले आहे, त्यामुळे त्यांचे आजचे वर्तन हा केवळ स्टंट असल्याचा दावा अरब साब सुन्नी जामिया मस्जिदचे सरचिटणीस मोहमद जाफर शेख यांनी मडगाव पोलिस स्थानकाबाहेर पत्रकारांशी बोलताना केला. सदस्य मून्ना टक्कर यांनी सांगितले की, हे प्रकरण केवळ जामिया मस्जिदसंदर्भात आहे. त्यामुळे यात दिगंबर कामत किंवा मुख्यमंत्र्यांना घुसडविणे योग्य नाही, असे आम्हाला वाटते.
बेमुदत उपोषणाला बसून अवघीच मिनिटे होतील, तेवढ्यात मडगाव पोलिसांनी तिथे येऊन कादर खान यांना ताब्यात घेतले व पोलिस स्टेशनवर नेले. याबाबत पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांनी सांगितले की, आम्ही त्यांना भारतीय न्याय संहितेच्या १७० व्या कलमाखाली प्रतिबंधात्मक अटक केली आहे. त्यांच्याकडे योग्य परवानगी नव्हती. तसेच शुक्रवार असल्याने व नमाज पढण्याचा दिवस असल्याने परिसरात कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला असता असेही त्यांनी स्पष्ट केले
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.