Goa Politics: खरी कुजबुज; महाआंदोलनाचा पुढचा टप्पा काय?

Goa Latest Political News: राजकारणात कोण कोणाचा कायमच मित्र नसतो आणि कोण कायमचा शत्रूही नसतो. राजकारणात तत्वे चालत नाहीत.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

महाआंदोलनाचा पुढचा टप्पा काय?

महाआंदोलनाला रंग चढला आहे, पण पुढे त्याचा रंग उडणार की अजून गडद होणार, याचीच सध्या चर्चा सुरू आहे. आंदोलनाची धग पाहून काही जण म्हणतात, ‘हा तर फक्त ट्रेलर होता, पिक्चर तो अभी बाकी है!’ तर काही अनुभवी मंडळी पुटपुटतात, ‘अरे, आंदोलनाची वाफ जास्त असते, पण शेवटी शिट्टी वाजली की कुकर शांतच होतो!’ नेतृत्व करणारे राजकीय नेते पुढची चाल आखत आहेत की लोकच आता सूत्रे हातात घेणार, हा मोठा प्रश्न आहे. काहींच्या मते, रणनीतीच्या बैठका गुपचूप सुरू आहेत; तर काहींच्या मते, ‘रणनीती’ हा शब्द फक्त पत्रकार परिषदेत शोभतो! आंदोलन अधिक तीव्र होणार का? की अचानक एखाद्या घोषणेनंतर सगळे शांत होणार? की एखादा नवा मुद्दा येऊन या आंदोलनाचा विषयच बदलणार? हे मात्र कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. सध्या तरी सर्वांचे लक्ष पुढच्या ‘घोषणे’कडे आहे कारण आंदोलनात घोषणाच जास्त, आणि निष्कर्ष थोडे, अशीच परंपरा राहिली आहे! आता पुढील वाटचाल काय असेल, हे काळच ठरवेल. तोपर्यंत चर्चा मात्र थांबायची नाही, हे नक्की ∙∙∙

सांगेचे अविश्वास ठराव नाट्य !

राजकारणात कोण कोणाचा कायमच मित्र नसतो आणि कोण कायमचा शत्रूही नसतो. राजकारणात तत्वे चालत नाहीत.म्हणूनच कदाचित राजकारणी हे संधीसाधू असतात. सांगे नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांवर सात नगरसेवकांनी अविश्वास ठरावाची नोटीस बजावून मंत्री सुभाष फळ देसाई यांनाच आव्हान दिले आहे. अविश्वास ठरवाला सामोरे जाणारे उपनगराध्यक्ष संगमेश्वर नाईक हे सुभाष फळ देसाईंचे जवळचे मित्र. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी ते सुभाष यांच्या विरोधात होते. सुभाषनी विरोधात असलेल्या माणसाला उपनगराध्यक्षपद दिले. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या कार्यक्रमाचे प्रमुखपद दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पाटीवर नगरसेवकांचे नाव टाकले नाही, म्हणून भाजप समर्थक नगरसेवकांनी विरोधी नगरसेवकांच्या सहयोगाने संगमेश्वर नाईक यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला. आता पालिका बरखास्त होण्यासाठी मोजकेच दिवस बाकी असताना नगरसेवकांनी मंत्री सुभाष फळ देसाई व भाजप पक्षाशी वैरत्व स्वीकारण्याचे कारण मात्र समजले नाही, बुवा! ∙∙∙

सरदेसाईंचा निर्णय!

युनिटी मॉल आणि प्रशासकीय स्तंभाविरोधात चिंबलकरांनी निर्णायक आंदोलन केले. त्यांनी ज्याप्रकारे एकजुटीने लढा दिला तो खरोखरच कौतुकास्पद आहे. या आंदोलनादरम्यान तेथील आंदोलकांनी लोकप्रतिनिधींच्या घरावर मोर्चा काढला. ग्रामपंचायत स्तरावर ती बाब कदाचित नेत्यांना पटली असावी. परंतु आझाद मैदानावर सर्व लोक जमताच मंत्र्यांच्या निवासावर मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला जातो, तो निर्णय विजय सरदेसाई यांना पटला नाही. कारण विरोधकांत ज्येष्ठ आमदार असलेले आमदार सरदेसाई यांनी ज्याप्रकारे तात्काळ मैदानावरच आपली भूमिका स्पष्ट केली आणि युरी, एल्टन यांना आपण कोणत्याही मंत्र्यांच्या खासगी निवासाकडे येणार नाही, असे स्पष्ट बजावले. त्यांनी यावेळी यामागील कारणही स्पष्ट केले. आमदार वेन्झी यांनीही त्यांची मनधरणी केली. पण सरदेसाई ठाम राहिले, त्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने जो काही निर्णय घेतला, त्याचीच चर्चा आंदोलकांत होती. ∙∙∙

पोलिसांचा धडाका, की राज्यकर्त्यांचा गोंधळ?

राजधानीत झालेलं आंदोलन पाहता, पोलिसांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली नसती तर चित्र अजून वेगळं दिसलं असतं! जमावावर नियंत्रण ठेवताना पोलिसांनी घाम गाळला, आदेश पाळले आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही, याचं श्रेय त्यांना द्यायलाच हवं, असं लोक हळूच म्हणताहेत. पण चर्चा इथेच थांबत नाही. ‘वेळेवर योग्य निर्णय घेतला असता, तर पोलिसांना एवढी कसरत करावी लागली असती का?’ असा टोलाही काही जण हाणताना दिसतात. राज्यकर्त्यांनी ताकद दाखवण्याऐवजी विचारच करत बसल्याने अखेर मैदानात उतरावं लागलं ते पोलिसांनाच, अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, आंदोलनाच्या गडबडीत वाहतूक कोलमडली, नागरिक हैराण झाले आणि या सगळ्यात दोष नेमका कुणाचा, हा प्रश्न हवेतच राहिला. ‘पोलिस सगळं करू शकत नाहीत, निर्णय वरूनच यायला हवेत,’ अशी मिश्किल टिपणी ऐकू आली. आता ∙∙∙

व्हेंझी यांची हिंदी घोषणाबाजी!

एरव्ही बाणावली आणि हिंदी भाषा यांचा मेळ काही बसत नाही, पण कदाचित परत परत दिल्लीवाऱ्या करत असल्यामुळे असेल कदाचित, बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांची हिंदी बरीच सुधारली आहे, याचा प्रत्यय काल आला. काल पोलिसांनी आझाद मैदानावर जाणाऱ्या बसेस बाणवलीच्या दांडो मैदानावर आडविल्यानंतर वेन्झी चक्क हिंदीतून घोषणा देऊ लागले. ‘जब सरकार लोगोसे डरती है, तो पुलिस को आगे करती है!’ अशा घोषणा देऊन व्हेंझी यांनी आपली हिंदी तशी कच्ची नाही, याचा प्रत्यय आणून दिलाच. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: 'वीरेश बोरकरना पोलिसांनी का हटवले'? CM सावंतांनी दिले उत्तर; लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याबाबत केले आवाहन

काब्रालांची समयसूचकता

आमदार नीलेश काब्राल हे पूर्वी पर्यावरणमंत्री होते. पर्यावरण खात्यावर कुडचडेवासीयांनी काल मोर्चा आणला तेव्हा काब्राल तेथे पोचले. एकेकाळी तेच मंत्री असलेल्या खात्याचे कार्यालय धेंपो टॉवरच्या चौथ्या मजल्यावर होते. आंदोलक तळ मजल्यावर होते. तेथून ते निघून गेल्यावर पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा तसाच मागे राहिला होता. काब्राल यांच्यासोबत असलेल्यांना त्यांनी तो उचलण्यास सांगितला व स्वतःही पाण्याच्या रिकाम्या बाटल्या त्यांनी गोळा केला.आपण कधीकाळी पर्यावरणमंत्री होतो, हे ते विसरलेले नाहीत हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिले होते. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Politics: भाजपविरोधात संयुक्त आघाडीची पुन्‍हा हाक, 'आरजी'कडून युतीसाठी खुले आमंत्रण

मनोजबाबने विजयचे नाव का टाळले?

सध्या आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी ‘३९ए’ कलम रद्द करावे म्हणून आंदोलन सुरू केले आहे. त्याला सर्व विरोधकांचा पाठिंबा आहे. विजय सरदेसाई सह सर्व विरोधी आमदार आझाद मैदानावर उपस्थित आहेत. रविवारी ‘आरजी’चे अध्यक्ष मनोजबाब परब यांचे जोरदार भाषण झाले. यात त्यांनी कॉंग्रेस व आम आदमी पक्षांच्या सर्व आमदारांची नावे घेतली. वीरेश बाब यांच्या सोबत सर्व विरोधी आमदार असतात, असे त्यांचे म्हणणे होते. विजय बाबही बरोबर असतात. पण मनोज बाबने त्यांचे नाव घेतले नाही. त्यामुळे सर्वांनाच आश्र्चर्याचा धक्का बसला व उलट सुलट चर्चांना उधाण आले. आरजी, काँग्रेस, गोवा कॉंग्रेस यांची युती मोडण्यासाठी विजय जबाबदार आहेत असे मनोजने म्हटले होते. त्यामुळे या दोघांमध्ये कडवटपणा आला. हा कडवटपणा अजूनही मनोज बाब बाळगून आहेत का?, हाच प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com