मगोपचे भाजप गटनेत्यांना सडेतोड उत्तर

मगोने भाजपला सरकार स्थापनेस बिनशर्त पाठिंबा दिला.
Maharashtrawadi Gomantak Party & BJP
Maharashtrawadi Gomantak Party & BJPDainik Gomantak

गोवा: विधानसभा निवडणुकीत भाजपला काठावरचे का असेना बहुमत मिळाले असल्याने भाजपचे नेते गटनेते भलतेच तोऱ्यात बोलताना आढळत आहेत. केंद्रीय नेत्यांनी म. गो.च्या नेत्यांना पाठिंब्याविषयी फोन केल्याने म. गो.ने भाजपला सरकार स्थापनेस बिनशर्त पाठिंबा दिला. असे असले, तरी खुद्द भाजपच्या अनेक गटनेते आणि आमदार या पाठिंब्याच्या विरोधात असून ते जाहीर प्रतिक्रियाही देत आहेत. यावर म.गो. नेत्यांनी आज सडेतोड उत्तर देत स्थानिक भाजप गटनेत्यांना आपण विचारात घेत नाही, त्यांना हवी ती प्रतिक्रिया देऊ द्या. आपल्याला त्यांचे काही पडलेले नाही, असे सडेतोड उत्तर देत सुदिन ढवळीकर हेही जोरातच होते. त्यांच्या या सडेतोड आणि आक्रमक उत्तरामुळे भाजप गटनेत्यांची मात्र बोलती बंद झाली हे नसे थोडके.∙∙∙

Maharashtrawadi Gomantak Party & BJP
गोवा विधानसभेत 39 आमदारांची नवी टीम!

आरजीच्या आमदाराने कायदा मोडला?

‘करायला गेलो एक आणि झाले भलतेच’ असे म्हणण्याची पाळी आरजीचे नवनिर्वाचित आमदार विरेश बोरकर व आरजीचे प्रमुख मनोज परब यांच्यावर आली असणार. विरेश बोरकर व कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार वाझ मोटारगाडीने विधानसभेत गेले म्हणून दोघांची बरीच स्तुती होत आहे. सोशल मीडियावर दोघांचे गुणगान होत आहे. मात्र, आरजीचे विरेश व मनोज आता ट्रोल व्हायला लागले आहेत. विरेश व मनोज ज्या दुचाकीने विधानसभेत गेले त्या दुचाकीला पुढे दोन आरसे असायला हवेत ते नव्हते. कायद्याने असे आरसे नसणे हा गुन्हा ठरतो. आता आरजी विरोधक विरेशवर टीका करायला लागले असून आमदाराने पहिल्याच दिवशी कायदा मोडला म्हणून त्यांना मोटार कायद्यानुसार दंड आकारावा अशी मागणी नीज गोंयकार गट करीत आहे. ∙

त्या आमदाराची आई भडकली!

सगळे राजकारणी व त्यांचे कुटुंबीय एकसारखेच नसतात याची अनुभूती दक्षिण गोव्यातील ग्रामीण भागातून आलेल्या काही अनुसूचित जमातीच्या युवकांनी निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी घेतली. पूर्वीच्या आमदारांच्या घरातच काय बेडरूमपर्यंत जायला मिळायचे हे त्या युवकांना माहीत होते. नवीन आमदाराला निवडून आणण्यास झटलेले हे युवक म्हणे भल्या पहाटे आपल्या नवीन आमदारांचे अभिनंदन करण्यासाठी आमदाराच्या घरी गेले. सकाळी सकाळी त्या युवकांना दारात पाहून आमदाराच्या मातोश्री म्हणे भडकल्या. तुम्हाला वेळ काळ काही कळते की नाही म्हणत त्या युवकांना म्हणे नेत्याच्या आईने फैलावर घेतले. बिचारे युवक ‘हेचि फळ काय मम तपाला’ म्हणत आल्या पावली माघारी परतले. ∙∙∙

Maharashtrawadi Gomantak Party & BJP
गोव्यात 12 ते 14 वयोगटातील मुलांचे आजपासून लसीकरण

दोतोरांना अनुकूलता

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपला विजयाप्रत नेले हे त्यांचे विरोधकही मान्य करत आहेत. मात्र, भाजपमधील व विशेषतः मंत्रिमंडळातील एक दोघांना ते पटत नाही व म्हणून ज्येष्ठत्वाच्या मुद्यावर ते मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहेत, पण पर्रीकरांनंतर ज्या पध्दतीने दोतोरांकडे भाजपने नेतृत्व सोपवले त्यावरून आता त्यात बदल होणे कठीण आहे. त्यांनी भाजपला पुन्हा सत्ता मिळवून दिली, शिवाय ते संघाच्या मुशीतून तयार झालेले आहेत व त्यांच्यावर कोणताच किटाळ नाही या त्यांच्या जमेच्या बाजू असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. ∙∙∙

काँग्रेसचे ये रे माझ्या मागल्या

निवडणुकीच्या निकालाचा सर्वात जास्त हादरा कोणाला बसला असेल, तर तो काँग्रेसला व अजूनही ते नेते त्यातून सावरलेले नाहीत हे सोमवारच्या त्यांच्या झालेल्या बैठकीतून दिसून आले. 2017 मधील निवडणुकीनंतरही अशी बैठक झाली होती, पण त्या पक्षाचे खरे दुखणे म्हणजे आत्मचिंतन करण्याची कोणाचीच तयारी नाही. ती असती तर आजची वेळ आलीच नसती. अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी आवश्यक ती मदत मिळाली नसल्याचा ठपका ठेवला. आता त्यांना तक्रारींचा लेखी अहवाल देण्यास सांगितले आहे. त्याने काय साधणार असे हे पराभूत उमेदवारच विचारू लागले आहेत.

प्रियोळातले पाच हजार

सुरवातीला ‘एक दोन’ व शेवटी ‘पाच पाच’ अशी पाकिटातील आकड्याविषयी खमंग चर्चा मतमोजणीच्या आदल्या दिवसापर्यंत प्रियोळात चालू होती. याच जोरावर आपला नेता कमीत कमी अडीच हजार मताधिक्याने नक्की जिंकणार अशी फुशारकी गोविंद गावडे व दीपक ढवळीकर या दोघांचेही समर्थक मारत होते. प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली, तेव्हा एकटा काठावर येऊन बुडाला, तर दुसरा बुडता बुडता केवळ दोनशे मतांनी वाचला. मागच्या निवडणूक निकालाच्या तुलनेत दीपक यांची मते नाममात्र वाढली, तर गोविंद यांची तब्बल चार हजार मते कमी झाली.

आता थोडक्यात वाचला त्याचे समर्थक “जो जिता वही सिकंदर” असे म्हणत वेळ मारून नेतात हा भाग वेगळा. “चिमटीभर कामाची मूठभर जाहिरात” अशा भाषेत गोविंद गावडेंच्या “हर बोले” जाहिरातीचा जाहीर पंचनामा करीत आरजीने अडीच हजार मते काढली, तर तेवढीच मते कथित स्वाभिमानी भाजप बंडखोरांनी काढली. यापुढे ‘तू तू मै मै’ राजकारणाला प्रियोळात भविष्य नाही हे त्या दोघांनाही दाखवून देणाऱ्‍या या पाच हजार मतदारांचे कौतुक करणारी पोस्ट सध्या समाज माध्यमांवर गोवाभर फिरत आहे. ∙∙∙

दाम्पत्याचा विरस

गोवा विधानसभेत यावेळी तीन दांपत्ये निवडून आली आहेत. प्रत्यक्षात ती संख्या चारवर जाणार होती, पण केपेच्या बाबूंचा घोडा अडखळला. अन्यथा भाजपचीच तीन दांपत्ये झाली असती व दोतोरांची डोकेदुखी वाढली असती, पण मुद्दा तो नाही. आता भाजपश्रेष्ठींनी म्हणे वेगळीच भूमिका घेतली आहे व ती म्हणजे एका घरात एकच मंत्रिपद. उमेदवारी वाटताना मवाळ असलेले श्रेष्ठी निकालानंतर तसे राहिलेले नाहीत.

निकालानंतर लगेच दिल्लीत धावलेल्या बाबांनाही म्हणे त्यांनी त्याची कल्पना दिलेली आहे. पद कुणाला ते म्हणे सदर दांपत्याने ठरवावयाचे आहे. यामुळे खरी अडचण होणार ती बाबूशची. त्यातून आणखी धुसफूस तर वाढणार नाही ना? ∙∙∙

ही संधी भाजपने सोडली असती का?

राज्यात सरकार स्थापनेचा तिढा अजून सुटता सुटेना. दावेदार अधिक झाल्याने गुंता वाढला आहे. गेल्यावेळी काँग्रेस पक्षाची हीच स्थिती निर्माण झाली असताना चलाख भाजपने संधी साधून सरकार घडविले. काँग्रेसजन तोंडात बोटे घालून बसले, पण ‘परिस्थितीतून बोध घेत नाही त्याला काँग्रेस म्हणतात’ असे लोक आता बोलू लागले आहेत. भाजपाकडे वीस, तर विरोधात वीस अशी संधी असताना काँग्रेस नेतृत्व आंधळे होऊन बसले आहे.

नेतृत्व कोणीही करो, पण सरकार व्हायला हवे असल्यास पुढे येणाऱ्यांना संधी दिली पाहिजे आणि काँग्रेस पक्षाने तसे केले नसल्यास अकराची संख्या एक व्हायला उशीर लागणार नाही अशी खोचक टीका आता काँग्रेसमन करू लागले असून जो पुढाकार घेईल तो नेता म्हणून मान्य करून काँग्रेस पक्षाने सरकार घडवावे अशी अपेक्षा लोक करू लागले आहेत. भाजपा गोटात आग लागलेली असताना काँग्रेस शांत बसल्यास यावेळीही काँग्रेस संपणार असल्याची भीती लोकांत व्यक्त होऊ लागली आहे. ∙∙∙

Maharashtrawadi Gomantak Party & BJP
डिचोलीच्या विकासासाठी आमदारांनी घेतली पालिका मंडळाबरोबर बैठक

गडकरींवर मगोचा विश्‍वास

यावेळी ‘किंग मेकर’ नव्हे, तर ‘किंग’ बनणार या आविर्भावात वावरणाऱ्या मगोची स्थिती सध्या ‘बाप्पाय ना आनी पुडवेंय ना’ या कोकणी म्हणीप्रमाणे झाली आहे. निकालानंतर इतकी दारुण अवस्था आजवर अन्य कुणाची झाली नव्हती व म्हणूनच कदाचित असेल त्यांनी न मागता भाजपला पाठिंबा देऊन टाकला, पण भाजपवालेही वस्ताद निघाले. त्यातील पात्रांव व त्यांच्या शिष्याने तेथे मगो विरुध्द मोर्चेबांधणी केली व त्यामुळे आता नितीन गडकरीच काहीतरी वाट काढतील असा भरंवसा ढवळीकरांना वाटू लागला आहे.∙∙∙

आंतोनियो वाझ यांची स्कूटी एंट्री

कुठ्ठाळी मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आंतोनियो वाझ यांनी आज विधानसभेच्या विशेष अधिवशनासाठी विधानसभा परिसरात आपल्या स्कूटीवरून एंट्री घेतली. या अनोख्या एंट्रीने सारेच अचंबित झाले. आपण मतदारसंघात याच दुचाकीवरून फिरत असल्याने आणि रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी कायम होत असल्याने आपण स्कूटीचा वापर केल्याचे त्यांनी यावेळी प्रांजळपणे सांगितले. नम्र आणि साधेपणाने जगणारे आंतोन जिल्हा पंचायतीमध्ये मोठ्या फरकाने निवडून आले आणि विधानसभा निवडणुकीत तर त्यांनी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसह माजी आमदार एलिना साल्ढाणा यांना पराभूत करून विजयी झाले आहेत. त्यामुळे विधानसभा परिसरात त्यांची ही अनोखी एंट्री चर्चेचा विषय बनली होती.

तवडकर उपमुख्यमंत्री की सभापती?

रोजगार देताना राजकारणी प्रशासकीय व्यवस्थेत उमेदवाराचा सर्व तपशील घेतात. मात्र, राजकारणात शैक्षणिक पात्रता, कौशल्य, क्षमता याचा विचार केला जात नाही. त्यामुळेच मतदार आपला प्रतिनिधी निवडताना हा खरोखरच विचार करतात काय हा लाख मोलाचा प्रश्न आहे. राजकारण्यांचे कार्यकर्ते मात्र जरूर विचार करतात. त्यामुळे काणकोणमधील नवनिर्वाचित आमदार रमेश तवडकर यांना उपमुख्यमंत्रिपद किंवा सभापतीपद देण्याची मागणी करू लागले आहेत. त्यात श्रीस्थळ पंचायतीचे माजी सरपंच गणेश गावकर यांच्यासहीत आता सर्वजण ही मागणी करू लागले आहेत. तसेच ही मागणी चक्क कॉंग्रेसचे उमेदवार जनार्दन भंडारी यांनीही केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com