Kasthashilpa Art: प्राचीन कलेला आधुनिकतेची जोड! निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी मधूभाईंची 'बहुरूपी' कलाकृती

Kasthashilpa Art Madhu Gaonkar: रानावनात भटकंती करत निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे मधू गावकर ऊर्फ मधूभाई यांनी काष्ठशिल्पाच्या माध्यमातून एक वेगळेच भावविश्व उभे केले आहे.
Kasthashilpa Art Madhu Gaonkar
Kasthashilpa Art Madhu GaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

रानावनात भटकंती करत निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते जपणारे मधू गावकर ऊर्फ मधूभाई यांनी काष्ठशिल्पाच्या माध्यमातून एक वेगळेच भावविश्व उभे केले आहे. तळे, झरे, नद्या-नाले, डोंगर-दऱ्यांमधून सतत भ्रमंती करताना त्यांच्या नजरेस पडणाऱ्या लाकडांच्या मुळांना त्यांनी कल्पकतेने आकार देत बहुरूपी काष्ठशिल्प साकारले आहे.

मधूभाईंची भटकंती ही केवळ फिरण्यासाठी नसून, निसर्गाचे सूक्ष्म निरीक्षण आणि संवर्धनाची जाणीव यातूनच त्यांच्या कलेचा उगम झाला आहे. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे ते सतत विविध ठिकाणी फिरत असतात. या भटकंतीत त्यांना सापडणाऱ्या उस्की लाकडाच्या मुळांमध्ये ते दडलेले आकार, रेषा आणि भाव ओळखतात. त्यानंतर अत्यंत संयम, कौशल्य आणि कल्पकतेच्या जोरावर त्या मुळांना ते कलात्मक रूप देतात.

Kasthashilpa Art Madhu Gaonkar
Goa Weather: थंडीने पल्लवित केलेल्‍या आशा उष्‍म्‍याने मावळल्‍या! काजू, आंबा बागायतदारांची व्‍यथा; दुसरा मोहोर करपला

या काष्ठशिल्पांत प्राणी, पक्षी, सर्पटणारे जीव तसेच मानवी चेहरे आणि हालचाली यांचे अप्रतिम दर्शन घडते. काहींना त्यात वन्यजीवांची हालचाल जाणवते, तर काहींना मानवी भावभावना. प्रत्येक पाहणारा आपल्या अनुभव, कल्पना आणि संवेदनांनुसार या शिल्पांचा अर्थ लावतो आणि म्हणूनच प्रत्येक कलाकृती जणू वेगळी कथा सांगत राहते.

काष्ठशिल्प ही लाकडावर कोरीव काम करून साकारली जाणारी प्राचीन कला असली, तरी मधू गावकर यांनी तिला आधुनिक दृष्टिकोनातून नवे रूप दिले आहे. गोव्यात अलीकडच्या काळात सातत्याने काष्ठशिल्प निर्मिती करत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कामाची राज्यपातळीवर दखल घेण्यात आली असून पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ आणि मेधा पाटकर यांनीही त्यांच्या कलेचे कौतुक केले आहे.

Kasthashilpa Art Madhu Gaonkar
Illegal Gambling Goa: होंडा येथे गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा; 9 जणांना अटक, 52,300 रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्यही जप्त

गेल्या दोन महिन्यांपासून मधूभाई या बहुरूपी काष्ठशिल्पाच्या निर्मितीत पूर्णपणे रमले होते. लाकडाच्या मुळांची स्वच्छता, टिकावूपणासाठी पारंपरिक प्रक्रिया आणि सूक्ष्म कोरीव काम या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी विशेष मेहनत घेतली. बागायती कामे सांभाळत असतानाही त्यांनी या कलेसाठी वेळ काढला.

या परिश्रमांतून साकारलेले काष्ठशिल्प हे केवळ कलाकृती नसून निसर्गाशी संवाद साधणारे एक सजीव माध्यम ठरले आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, निसर्गातील सौंदर्य नव्या दृष्टीने उलगडून दाखवणारे हे बहुरूपी काष्ठशिल्प सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मधू गावकर यांच्या या अनोख्या कलाकृतींमुळे त्यांच्या कलागुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संजय घुग्रेटकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com