सासष्टी : मडगावच्या रवींद्र भवनाचा पंधरावा वर्धापनदिन सोहळा आज गुरुवारी (२० जुलै) उत्साहात साजरा करण्यात आला. सरकारने अध्यक्ष व उपाध्यक्षांची नियुक्ती केल्यानंतर योगायोगाने आजच जनरल कौन्सिलची बैठक झाली व तीत आणखी १८ सदस्यांची नियुक्ती करुन कौन्सिलचा विस्तार करण्यात आला.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले, अशी माहिती बैठकीनंतर अध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यंदाच्या इफ्फीतील किमान ३० चित्रपट या रवींद्र भवनात दाखविण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जनरल कौन्सिलमध्ये ज्या नऊ संस्थांच्या प्रतिनिधींना स्थान देण्यात आलंय, त्यात सम्राट क्लब मडगाव, दैवज्ञ समाज मडगाव, टुगेदर फॉर मडगाव, सिद्धांत गडेकर डान्स ॲण्ड फिटनेस अकादमी, फातोर्डा युवा क्लब, नवयुवक हौशी मंडळ, श्री दामबाबाले घोडे, कला रंग व अश्र्वमेध या संस्थाचा समावेश आहे.
त्याच प्रमाणे समिरा शेख, प्रतिमा बांदेकर, शिवानी पागी, अभिषेक काकोडकर, शीला काकोडकर, आग्नेल फुर्तादो, लक्ष्मण परब, महेश पै काणे व जॉन डिसिल्वा यांचाही समावेश आहे. यातील सम्राट क्लब, सिद्धांत गडेकर डान्स अकादमीचे प्रतिनिधी तसेच लक्ष्मण परब, महेश पै काणे व जॉन डिसिल्वा यांना कार्यकारी समितीत स्थान दिले जाईल, असे तालक यांनी सांगितले.
यंदाच्या इफ्फीतील ३० चित्रपट मडगाच्या रवींद्र भवनात दाखवावेत यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे. लवकरच गोवा मनोरंज सोसायटीचे अधिकारी सुविधांची पाहणी करतील. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनीही याकामी मदत करणार असल्याचे सांगितल्याचे तालक म्हणाले.
रवींद्र भवनाची दुसरी इमारत, जी अजूनही सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आहे, ती ताब्यात घेऊन तेथे वेगवेगळे उपक्रम राबविले जातील. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तालक यांनी सांगितले. स्वांतत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी रवींद्र भवन व अवारात विद्युत रोषणाई केली जाईल, असेही तालक यांनी स्पष्टकेले.
मडगाव रवींद्र भवन लोकाभिमुख करण्यासाठी अनेक निर्णय घेण्यात आले असून, विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. लवकरच वेबसाईट कार्यरत केली जाईल, सूचनापेट्या ठेवल्या जातील, शौचालये स्वच्छ ठेवली जातील, बांधकामासंदर्भात जी दुरुस्ती करायची आहे, ती पावसाळ्यानंतर केली जाईल. ज्या संस्था वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात, त्यांच्याकडून प्रस्ताव मागविले जातील. आयोजनासाठी रवींद्र भवनाचे पूर्ण सहकार्य लाभेल.
- राजेंद्र तालक,अध्यक्ष, मडगाव रवींद्र भवन
१.११ कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक
यंदा रवींद्र भवनमध्ये वर्षभर कार्यशाळा, परिसंवाद, स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी १ कोटी १० लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक निश्र्चित करण्यात आल्याचे तालक यांनी सांगितले. गेल्या कित्येक काळापासून बंद असलेले कँटिन १० ऑगस्टपर्यंत सुरू केले जाईल. पुढील दोन दिवसांत त्यासाठी निविदा जाहीर केल्या जातील. इच्छुक स्वयंसाहाय्य गटांनी त्या भरून दिल्या पाहिजेत. ही प्रक्रिया ३ ऑगस्टपर्यंत पूर्ण केली जाईल, असे तालक म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.