

म्हापसा: हडफडे येथील बहुचर्चित ‘बर्च बाय रोमियो लेन’ अग्निकांडातील संशयित आरोपी गौरव लुथरा, सौरभ लुथरा आणि अजय गुप्ता यांना सोमवारी (ता. १४) न्यायालयात आत्मसमर्पण करण्याचे आदेश म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. आरोपींच्या वैद्यकीय उपचारांसंदर्भातील अर्जावर न्यायालयाने त्यांना आवश्यक दिलासाही मंजूर केला.
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने या तिन्ही आरोपींचा जामीन रद्द केला होता. या निर्णयाविरोधात आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावत दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आरोपींनी पुढील प्रक्रिया आणि निर्देशांसाठी म्हापसा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला.
सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी त्यांच्या वैद्यकीय गरजांचा दाखला देत दिलासा देण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने विनंती मान्य करत आरोपींना १४ सप्टेंबर रोजी शरण येण्याचे निर्देश दिले.
दरम्यान, ६ डिसेंबर रोजी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमियो लेन’ रेस्टॉरंटमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी हणजूण पोलिसांनी गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांना अटक केली होती, तर अजय गुप्ता याला दिल्लीतून ताब्यात घेऊन गोव्यात आणले होते. त्यानंतर आरोपींनी १८ डिसेंबर रोजी जामिनासाठी अर्ज केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.