

पणजी: ‘एनडीपीएस‘ कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या लायबेरिया देशातील नागरिक पॅट्रिक बह (२५) याचा जामीन अर्ज मेरशी येथील विशेष ‘एनडीपीएस’ न्यायालयाने फेटाळून लावला आहे. संशयिताचा जामिनासाठीचा हा पाचवा प्रयत्न होता. मात्र, न्यायालयाने विविध कायदेशीर मुद्दे आणि गुन्ह्याचे गांभीर्य विचारात घेऊन अर्ज फेटाळला.
२४ ऑक्टोबर २०२४ रोजी शिवोली येथील मधलाभाट रस्ता परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पॅट्रिक बहला अटक केली होती. त्याच्याकडून ७.६८ ग्रॅम वजनाच्या एक्सटसी गोळ्या आणि २३.९८ ग्रॅम वजनाचा मेथॅम्फेटामाइन असा अमलीपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी त्याच्यावर ‘एनडीपीएस’ कायद्याच्या कलम २२(ब) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.
संशयिताच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की, जप्त करण्यात आलेला अमलीपदार्थांचा साठा हा व्यावसायिक निकषांपेक्षा कमी असल्याने ‘एनडीपीएस’ कायद्याच्या कलम ३७ मधील कडक अटी त्याला लागू होत नाहीत. मात्र, संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि पळून जाण्याची शक्यता पाहता हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला.
संशयित पसार होण्याचा धोका
संशयिताविरुद्ध यापूर्वीही अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल असून, तो सराईत गुन्हेगार असल्याचे न्यायालयाने नमूद केले. आरोपी विदेशी नागरिक असून, त्याच्याकडे गोव्यातील निश्चित रहिवासाचा पुरावा नाही. तसेच त्याच्याकडे वैध व्हिसा किंवा प्रवास परवाना नसल्याने तो जामिनावर सुटल्यास पसार होण्याचा मोठा धोका आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.