Konkani Drama Competition: कोकणी नाट्यस्पर्धा रंगणार 20 फेब्रुवारीपासून, वीस नाटकांचा सहभाग

49th Konkani Drama Competition: कोकणी नाट्य स्पर्धा ही कला अकादमीची महत्त्वाची स्पर्धा मानली जात असल्यामुळे या स्पर्धेत नेहमीच मोठी चुरस असते.
49th Konkani Drama Competition 2025
Konkani Drama Competition 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

49th Konkani Drama Competition 2025

फोंडा: आजचे पिजगाळ प्रियोळ - फोंडा या संस्थेचे' भोगपर्व ' हे नाटक रद्द झाल्यामुळे आता राजीव गांधी कलामंदिर फोंडा इथे आज पासून सुरू होणारी ४९ वी कोकणी नाट्य स्पर्धा गुरुवार २० फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिलेच नाटक रद्द झाल्यामुळे आता स्पर्धेत भाग घेतलेल्या नाटकांची संख्या २० झाली आहे.

कोकणी नाट्य स्पर्धा ही कला अकादमीची महत्त्वाची स्पर्धा मानली जात असल्यामुळे या स्पर्धेत नेहमीच मोठी चुरस असते. गेल्या काही कोकणी नाट्य स्पर्धेतील नाटके पाहता या स्पर्धेचा दर्जा दर वर्षा गणिक उंचावताना दिसत आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेत एकूण ३१ प्रवेशिका आल्या होत्या. पण काही नाटके रद्द झाल्यामुळे शेवटी २३ नाटकांचेच प्रयोग होऊ शकले.

नाटके रद्द होणे हा या स्पर्धेला लागत असलेला 'डाग'च म्हणावा लागेल. गेल्या वर्षी एक नाटक तर ऐनवेळी रद्द करण्यात आले होते. यामुळे आयोजकाबरोबरच प्रेक्षकांचीही कुचंबणा होत असते हे विसरता कामा नये. अर्थात नाटक म्हटले म्हणजे अनेक अडचणी असतात हे जरी मान्य केले तरी एकदम घाऊक पद्धतीने नाटके रद्द होणे हे मनाला पटत नाही.

त्यामुळे मग स्पर्धेची लय बिघडत जाते. प्रेक्षकांचाही विरस होतो. स्पर्धेच्या वेळापत्रकावरही परिणाम व्हायला लागतो. त्यामुळे संस्थानी स्पर्धेत प्रवेशिका दाखल करण्यापूर्वीच योग्य नियोजन केले पाहिजे. काही अडचणी गृहीत धरून त्याची पर्यायी व्यवस्थाही करून ठेवली पाहिजे.

पण स्पर्धेतील काही नाटके रद्द होऊनही गेल्या वर्षी मनाला साद घालू शकणारे असे काही चांगले प्रयोग बघायला मिळाले हेही तेवढेच खरे... रंग खेव, बर्थ ऑफ डेथ, काळमाया, द ट्रॅप, हय वदन, तो आणि दोन पिसे, कन्यादान, कर्मयोगी, तू दु इस्ता बे, निमनो पेलो सारख्या नाटकांच्या प्रयोगाने स्पर्धेची लय अचूक पकडली. त्याचबरोबर अभिनयात, दिग्दर्शनातही प्रगल्भताही जाणवली. मात्र खटकणारी गोष्ट होती ती लेखन.

49th Konkani Drama Competition 2025
Kala Academy: अपुरे वर्ग, सुविधांची वानवा! ‘तडजोडी’ची हद्द गाठलेले कला अकादमीचे नाट्यमहाविद्यालय

बहुतेक नाटके ही एक तर अनुवादित होती नाहीतर पूर्वी प्रयोग झालेली होती. यामुळे दर्जेदार नाट्यसंहिता लिहिणारे लेखक कोकणी रंगभूमीला का मिळत नाहीत हा प्रश्न आता निर्माण व्हायला लागला आहे. या पार्श्वभूमीवर यंदाच्या स्पर्धेकडे बघायला हवे. गेल्या वर्षाच्या मानाने यावर्षी स्पर्धेतील नाटकाची संख्या बरीच कमी वाटते.

आता याचे कारण काय याचाही अभ्यास व्हायला हवा. गेल्या वर्षी चांगले प्रयोग सादर केलेल्या काही संस्था यावर्षी नाही ही बाब खटकल्याशिवाय राहत नाही. पण त्याचबरोबर गेल्या वर्षी काही कारणास्तव रिंगणात उतरू न शकलेल्या अंत्रुज घुडयो, नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्य मंडळ सारख्या आघाडीच्या संस्था स्पर्धेच्या पटलावर आहेत ही दिलासा देणारी बाब ठरावी.

49th Konkani Drama Competition 2025
Konkani Drama : ‘डबल रोल’चा गोंधळ, कासांळी आनी घोसाळीं; संदर्भहीन शेवट

पण खरं सांगायचं म्हणजे आताच्या स्पर्धा म्हणजे संस्थेपेक्षा कलाकार, दिग्दर्शक यांना महत्त्व देणाऱ्या ठरत आहेत. आयपीएल मध्ये कसे चांगल्या खेळाडूंना आणून संघ बांधला जातो तसेच काहीसे आताच्या स्पर्धात व्हायला लागले आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता संस्थेच्या 'टॅगा' पेक्षा नाटकाला असलेले कलाकार वा दिग्दर्शक यांची बिरुदे जास्त अधोरेखित व्हायला लागली आहेत.पण शेवटी नाटक म्हणजे एक प्रदीर्घ प्रक्रिया असते.

महिना दोन महिने तालमी मारल्यानंतरच स्पर्धात्मक रंगभूमीवर उभे राहण्याचे धाडस होऊ शकते. तांत्रिक बाबीवरही बरेच लक्ष द्यावे लागते. त्यामुळे स्पर्धात्मक रंगभूमीवर उतरणे हे एक आव्हानच असते. आता गावागावात कोकणी नाट्य स्पर्धेच्या तालमी सुरू झालेल्या बघायला मिळत आहेत. यातून काय हाताला लागते याचे दर्शन आपल्याला प्रयोगाच्या वेळी होईलच. तोपर्यंत सर्व संस्थांना 'ऑल द बेस्ट'. बक्षीस मिळण्यापेक्षा प्रेक्षकांच्या बुद्धीला खाद्य देणारे प्रयोग या स्पर्धेत सादर होतील किंवा व्हावे हीच अपेक्षा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com