Konkani Drama : ‘डबल रोल’चा गोंधळ, कासांळी आनी घोसाळीं; संदर्भहीन शेवट

Konkani Drama : सादरीकरणातील त्रुटींमुळे प्रभाव कमी; कलाकारांचा अतिआत्मविश्‍वासपूर्ण अभिनय
Konkan Drama
Konkan DramaDainik Gomantak

Konkani Drama :

‘तुका म्हणे उगी राहावे जे जे होईल ते ते पाहावे’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाचे काही नाट्यप्रयोग बघताना आठवण यायला लागते.

नाटकाचा पडदा उघडला की जे-जे रंगमंचावर सादर होते ते-ते बघण्यापलीकडे प्रेक्षकांच्या हाती दुसरा पर्यायच राहत नाही.

श्री शंभो महादेव कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ बिठ्ठोण-बार्देश या संस्थेने सादर केलेल्या ‘कासांळी आणि घोसाळीं’ या नाटकाचा प्रयोग पाहताना या हतबलतेचा प्रत्यय येत होता.

दारिओ फो-फ्रँका रॅमे हे या संहितेचे मूळ लेखक असल्याचे श्रेय नामावलीत नमूद करण्यात आले आहे. मूळ संहिता वाचनात आली नसली तरी या संहितेचा वसंत सावंत यांनी कोकणीत अनुवाद केल्यामुळे अपेक्षा मोठ्या होत्या. सावंत हे कोकणी नाट्यक्षेत्रातील एक प्रचलित नाव. अनेक नाटके व नाटकांचे अनुवाद त्यांच्या नावावर आहेत.

कासाळकर हे एक मोठे उद्योगपती. घोसाळकर हा एक कामगार नेता. तो कासाळकरांच्या एका आस्थापनात काम करत होता व त्याला कासळकरांनी नोकरीवरून काढून टाकलेला असतो. असे असूनही एका अपघातामुळे कासाळकर व घोसाळकराची भेट होते.

कासाळकरांचे काही नक्षलवादी अपहरण करतात आणि अपहरण करून नेताना त्यांच्या गाडीला अपघात होतो व त्यात कासाळकर गंभीर जखमी होतात. जखमी झालेली व्यक्ती कासाळकर हे माहीत नसल्यामुळे तिथे पोहोचलेला घोसाळकर त्यांना इस्पितळात नेतो. नेताना त्यांना आपले जॅकेट घालतो.

जॅकेटमुळे व त्या जॅकेटच्या खिशात असलेल्या ओळखपत्रांमुळे सगळेजण जखमी कासाळकरांनाच घोसाळकरच समजतात. त्याचा चेहरा ओळखण्यापलीकडचा झाल्यामुळे घोसाळकराची बायको माणिक हीसुद्धा त्यांना आपला नवरा समजते. नंतर प्लास्टिक सर्जरी करून कसाळकरांना घोसाळकर बनविले जाते.

त्यामुळे दोन घोसाळकर होतात. एक असली तर दुसरा नकली. नंतर एक इस्पितळातून पळून तर दुसरा लोकांच्या नजरा चुकवत घोसाळकरांच्या घरी येतो. नंतर जो काही गोंधळ होतो तो या नाटकाचा उत्तरार्ध.

यात विवाहित घोसाळकरांची एक प्रेयसी आहे, पोलिस, न्यायाधीश, डॉक्टर सर्व काही आहे. अगदी सिक्रेट एजंटही दाखवला आहे. पण एवढे सगळे असूनही मामला ताणल्यासारखा वाटतो. न्यायाधीश दारात आल्यावर त्याला पोलिस इन्स्पेक्टरची गोळी लागणे,

इन्स्पेक्टरने डोक्याला पिस्तूल लावल्यानंतर घोसाळकरांची बायको माणिक हिने अतर्क्य असे काहीतरी बडबडणे, टीव्ही लावल्यानंतर त्यातून माणसाने येणे, डॉक्टरने परत परत इन्स्पेक्टरालाच इंजेक्शन लावणे, इन्स्पेक्टरने अनावश्यक हातवारे करणे यासारखे नाटकातील प्रसंग संदर्भहीन व नाटकाला बाधा आणणारे वाटले. न्यायाधीश परत परत इस्पितळात व घोसाळकरांच्या घरी का येतात, हेही समजू शकले नाही.

खरे तर संहितेची कल्पना चांगली होती. कसाळकर व घोसाळकर एकाच घरात आलटून पालटून येतात या प्रसंगात रंजकता होती, यात शंकाच नाही. माणिक खऱ्या घोसाळकरला फुनेलमधून चिकन व अंडी भरवते हा प्रसंग तसा धमाल होता.

कासाळकर व घोसाळकरांचा डबल रोल उत्कंठावर्धक होता. नाटकातील बहुतेक पात्रे मात्र ‘ओव्हर ॲक्टिंग’ करताना दिसत होती. अपवाद फक्त घोसाळकर व कसाळकर हा ‘डबल रोल’ निभावणारे प्रथमेश केरकर यांचा.

Konkan Drama
Bicholim News : विद्यार्थ्यांनी शिवरायांचे गुण आत्‍मसात करावेत : ॲड. हरिश्‍‍चंद्र नाईक

दोघेही घरात असताना एका बाजूला जाऊन लगेच दुसऱ्या बाजूने दुसऱ्या भूमिकेत कपडे बदलून येणे यातून केरकर यांनी आपल्या अभिनयातील कौशल्याबरोबर चपळता ही प्रगट केली. इतर पात्रांबद्दल उल्लेख करावा, असे काही आढळले नाही. नाटकाचा शेवटतर अगदीच सपक व रसहीन वाटला.

नाटकाच्या दिग्दर्शिका म्हणून रविना शेट बऱ्याच कमी पडल्या. अनावश्‍यक ‘सुपर फास्ट मुव्हमेंट्स’ करणाऱ्या पात्रावर त्यांनी नियंत्रण ठेवायला हवे होते. त्यांनी माणिकची प्रमुख भूमिका साकार केल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी अधिक होती.

ही भूमिका निभावतानाही त्यांनी हेच तारतम्य पाळायला हवे होते. स्पर्धेच्या नाटकांचा एक वस्तुनिष्ठ असा निकष असतो. त्यामुळे स्पर्धेतील नाटकांना हात घालताना हा निकष पाळणे आवश्‍यक असते याचे या स्पर्धेत उतरणाऱ्या प्रत्येक कलाकाराने तसेच दिग्दर्शकाने भान ठेवायला हवेच. नाहीतर ती स्पर्धेची थट्टा होऊ शकते.

प्रेक्षकांकडून हशा - टाळ्यांचा प्रतिाद

या नाटकाला इतर नाटकांच्या मानाने बऱ्यापैकी गर्दी होती. पण विशेष म्हणजे नाटकातील काही प्रसंगांना हशा-टाळ्यांचा प्रतिसाद मिळत होता. खासकरून माणिक झालेल्या रविना शेट यांना अधिक प्रतिसाद मिळाला.

याबाबतीत मध्यंतरात काही प्रेक्षकांशी बोलल्यावर त्यांनी हे नाटक ‘टाइमपास’ व दोन घटकांची करमणूक म्हणून बरे असल्याचा अभिप्राय दिला. स्पर्धेच्या मूल्याबाबत विचारल्यावर बरेचजण निरुत्तर झाले.

तरीही अशा अनावश्‍यक हशा-टाळ्यांमुळे प्रेक्षागृहात रसभंग होत होता यात शंकाच नाही. मात्र, या मिळालेल्या प्रतिसादामुळे हे नाटक हौशी रंगभूमीवर ‘सुपरहिट’ ठरू शकेल, असे संकेत मिळत होते.

ये जो पब्लिक है...

सध्या प्रेक्षकांकडून स्पर्धेत आतापर्यंत सादर झालेल्या नाटकांचा क्रम लावायला सुरवात झाली आहे.

यावेळी गोमंतकीय नाट्यक्षेत्रातील अनेक दिग्गजांबरोबर नाटकावर अतोनात प्रेम करणाऱ्या रसिकांनीही हा ‘क्रम’ सांगितला. अर्थात अजून नाट्यस्पर्धा संपली नसल्यामुळे हा क्रम बदलूही शकतो. शेवटी प्रेक्षकांचा कौलही तेवढाच महत्त्वाचा असतो. ‘ये पब्लिक है, ये सब जानती है’ हेच खरे नाही का?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com