Assembly 2022- खरी कुजबूज
व्यापाऱ्यांच्या काळा व्यापार!
‘दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ अशी मराठीत एक म्हण आहे. कुंकळ्ळीतील काही व्यापारी जे नगराध्यक्ष लक्ष्मण नाईक यांना हुकूमशहा म्हणतात. पण, त्यांनी आधी स्वतःच्या पायाखाली काय जळते हे आधी पहावे असे आम्ही नव्हे तर लक्ष्मण समर्थक नगरसेवक म्हणतात. कुंकळ्ळी पालिकेच्या व्यापारी संकुलात चण्याच्या भावात दुकाने मागणारे व्यापारी पालिकेला नुकसान करून स्वतःचे खिशे भरण्यासाठी खटपट करीत असल्याचा आरोप होत आहे. जे दुकानदार नगराध्यक्षांवर आरोप करीत आहेत त्या दुकानदारांनी स्वतः पालिकेची दुकाने घेऊन मोठ्या रकमेवर भाड्याने दिली आहेत. मालकी पालिकेची, खर्च पालिकेचा, दुकाने पालिकेची व फायदा दुकानदारांचा हे होणार नाही, असा इशारा नगराध्यक्ष समर्थक देतात. व्यापाऱ्यांनो असा काळा व्यापार खपवून घेणार नाहीत, असा इशारा आता नगरसेवक द्यायला लागले आहेत. ∙∙∙
नवी सकाळ येणार का?
तिमिरातून उजेडाकडे जाण्याचा संदेश देणारी आपली संस्कृती. राजकीत क्षेत्रात नवीन सकाळ आणण्याचा व दोन फुलांचा काळ आणण्याचा संकल्प तृणमूल काँग्रेसने(TMC) सोडला आहे. कुंकळ्ळी मतदारसंघात डॉ. जोर्सन फर्नांडिस नवी सकाळ आणण्यास पुढे सरले आहेत. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर कुंकळ्ळीचे सुपूत्र असलेले डॉ. जोर्सन हे दिव्य साधू शकणार का? दोतोर युरी, क्लाफास, प्रशांत, संतोष यांसारख्या खोडांना हलवू शकणार का? कुंकळ्ळीत तृणमूलची नवी सकाळ उगवेल का? दोतोर जोर्सनने दोन पाने सोडून दोन फुलांना स्विकारले तो फायदा त्यांना होणार का?प्रश्नांची उत्तरे निवडणुकीनंतर कळणार असली तरी दोतोरनी मोठे पाऊल उचलले आहे, हे मात्र खरे. ∙∙∙
क्लाफासने जिंकली अर्धी लढाई!
कुंकळ्ळी मतदारसंघात भाजपाची उमेदवारी क्लाफास डायस यांना मिळणार नाही, अशा अफवा गेल्या काही दिवसांत जाणून बुजून पसरविल्या जात होत्या. भाजपाची उमेदवारी सुदेश भिसेना मिळणार असा दावा काही भाजपावालेच करीत होते. मात्र, याला आता पूर्ण विराम पडला असून, क्लाफास डायस यांनी रविवारी देवी देवतांचे आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. जे आमदार काँग्रेस (Congress) सोडून भाजपात गेले होते त्या ख्रिस्ती आमदारांपैकी क्लाफास हे साष्टीतील एकमेव ख्रिस्ती आमदार आहेत. ज्यांनी कमळावर निवडणूक लढण्याचे धाडस केले आहे. हे धाडस क्लाफासना फायद्याचे की नुकसानीचे हे निवडणुकीनंतरच कळणार. एक मात्र खरे, क्लाफास अर्धी लढाई जिंकलेत, असे बोलले जात आहे. ∙∙∙
रवींचे कसब...
बऱ्याच काळानंतर फोंड्यात महिलांचा भव्य मेळावा झाला. या महिला मेळाव्याला किमान दोन हजार महिला उपस्थित होत्या, असा अंदाज आहे. आताच्या काळात आणि एवढ्या मोठ्या संख्येने महिला, असा सवाल उपस्थित होणे साहजिक आहे. मात्र हा महिला मेळावा खुद्द आमदार रवी नाईक यांनी भरवला होता, आणि या मेळाव्याला एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली म्हटल्यावर त्यांच्या विरोधकांत धडकी भरणार हे नक्की. यापूर्वीही रवी नाईक यांनी राजधानी पणजीत साधारण पस्तीस हजार महिलांचा मेळावा भरवला होता. तर कुर्टी - फोंडा येथे साधारण सोळा हजार महिला उपस्थित होत्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना गोळा करण्याचे कसब कसे काय बुवा रवींना साधते याचे गणित भल्याभल्यांना सोडवता आलेले नाही, हे विशेष. ∙∙∙
सांगेत राजकीय खतखते
सांगेतील राजकारणात खऱ्या अर्थाने खतखते निर्माण झाले आहे. भाजपात उभे दोन गट. काँग्रेस पक्षातही दोन गट निर्माण झाले आहेत. आम आदमी पक्षातही तीच स्थिती. अन्य पक्षाचे काही खरे नाही. आणि जर या लोकांच्या मनासारखं झालं नाही तर मग सर्व बंडखोर एकत्र येऊन नक्कीच खतखते करुन सांगे मतदारसंघाची वाट लागणार आहे. शिवाय ठराविक नेते इकडून तिकडे धावा धाव करुन आपले इप्सित साद्य करतात ते केवळ समाजसेवेसाठी की स्वतःच्या फायद्यासाठी हे जनतेला आता कळून चुकले आहे. ∙∙∙
सर्वेक्षण कि चाचपणी?
निवडणूक तोंडावर आली की, सर्व कथीत नेत्यांना त्यांचा समाजाची आठवण होते, एरव्ही ते त्या समाजाकडे ढुंकूनही पहात नाहीत. गोव्यातील बहुसंख्य भंडारी समाजाची व्होट बॅंक कॅश करण्यासाठी सर्वच पक्ष टपून बसले आहेत. गेल्या कांही दिवसांपासून अनेकांना तुम्ही भंडारी आहात का? अशी विचारणा करणारे कॉल येत आहेत. अर्थातच ते निवडणुकीच्या सर्वेक्षणासाठी आहेत, हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.भंडारी समाज संघटनेकडून बोलत असल्याचे पलिकडचा अनामिक सांगतो. पण, नक्की ही चाचपणी कोण करीत आहे, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. हे सर्वेक्षण आहे की चाचपणी? याचाही थांगपत्ता लागू दिला जात नाही, त्यामुळे हे एखाद्या पक्षाचे कारस्थान असल्याची चर्चा आहे. ∙∙∙
मतांच्या भ्रमात ‘आप’
आम आदमी पक्षाने दिल्लीतील लोकांना झुलवत ठेवून गोव्यात मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासनांचा धडाका लावला आहे. सत्तेवर आल्यास पक्ष तरुण व महिलांसाठी विविध योजना आखणार अशा विविध घोषणा गोव्यातील प्रत्येक भेटीवेळी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे करत आहेत. गोव्यात त्यांचे आगमन झाले की गोमंतकियांना आशा दाखविणारी घोषणा करत सुटतात. भ्रष्टाचार बंद करून सरकारकडे जमा होणाऱ्या त्या महसुलातून लोकांना विविध योजना लागू केल्या जातील असे सांगत आहेत मात्र त्यांच्या या घोषणा सत्तेवर आल्यानंतर लागू होणार आहेत त्यामुळे लोकही त्या ऐकतात व सोडून देतात. केजरीवाल लोकांच्या भावनांना हात घालून आपल्या पक्षाकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करत असले तरी ‘गोवा के लोक अजीब’ है हे त्यांना अजून कळलेले नाही. ‘मोफत’ तसेच आर्थिक सहाय्याच्या घोषणांनी मते मिळतील या भ्रमात हा पक्ष आहे. ∙
हेची फळ मम काय तपाला?
2017 मधील निवडणुकीनंतर भाजपला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणाऱ्या मगो आणि गोवा फॉरवर्ड या गोव्यातील दोन्ही स्थानिक पक्षांवर सध्या उर बडविण्याची वेळ आलेली आहे. त्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन आमदार निवडून आले होते; पण आज नव्या निवडणुकीला सामोरे जाताना एकाकडे एक तर दुसऱ्याकडे भविष्यात एकच आमदार शिल्लक राहण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांकडे उपमुख्यमंत्रीपदही होते. शिवाय एका पक्षाचे तिघेही मंत्रीमंडळात होते. पण, म्हणतात ना दैव देते अन् कर्म नेते. शत्रूवरही अशी वेळ येऊ नये म्हणतात ती अशी. त्यांची कथा ऐकल्यास हेही फल काय तव तपाला असे म्हणावेसे वाटते! ∙∙∙
मोठा मासा गळाला
असे सांगतात की, लहान-सहान मासळीनंतर आता विरोधी पक्षांतील एक मोठा मासा भाजपाच्या गळाला लागणार आहे. तो म्हणे सर्वात शेवटी सत्ताधारी पक्षात डेरेदाखल होणार आहे. वास्तविक अनेकांना पूर्वीपासून हा संशय होता. निवडणुकीचे वेध लागल्यापासून गेल्या काही महिन्यात आनेक जण सत्ताधाऱ्यांच्या कळपात दाखल झाले आहेत. या नेत्यामुळे भाजपाने आजवर प्रतिष्ठेचा बनविलेला मतदारसंघावर भगवा फडकणार असला तरी या नेत्याला सतत विरोध करत आलेल्यांचे काय हा मुद्दा रहाणारच. हे खरेच होणार की याही भाजपने पसरविलेल्या वावड्या हेही लवकरच कळणार म्हणा! ∙∙∙
दोस्त, दोस्त ना रहा!
अस्वलाचा हल्ला आणि मित्र ही कहाणी सगळ्यांनाच माहिती आहे. संकटकाळात मदत करतो, तोच खरा मित्र असे त्या कहाणीचे तात्पर्य आहे. अशीच कहाणी आपचे नेते ॲड.अ मित पालेकर यांनी सांगितली. प्रत्यक्षात त्या कहाणीला सत्याची किनार आहे हे मान्यच करावे लागेल. परवापर्यंत (शुक्रवार) उपोषण करीत असताना मला अनेकजन भेटत. काही आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तर काहीजण माझ्या प्रकृतीच्या काळजीमुळे भेटले. लोकप्रतिनिधी असलेले खूप कमी लोक मला भेटले. त्यातही आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे माझे जवळचे मित्र असतानाही आणि ते शुक्रवारी जुने गोव्यातील चर्चला आले असतानाही त्यांना मला भेटावेसे वाटले नाही याचे खूप दुःख वाटले, अशी कैफियत पालेकर यांनी मांडली. एकूणच ‘ए रिश्ता क्या कहलाता है?’ पासून ‘दोस्त-दोस्त ना रहा’ इथपर्यंत हे प्रकरण पोहचले आहे. ∙∙∙
गौडबंगाल काय?
जुने गोव्यातील ‘त्या’ वादग्रस्त बांधकामावरून राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. त्यात सरकारमधील मंत्र्यांमध्येही एकवाक्यता नसल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी कायद्याची कास धरली आहे. पण, मंत्री आणि त्यांचे आमदार बांधकाम पाडण्याचे समर्थन करून जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर ढकलत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पंचायत निर्णय घेईल असे म्हटले असतांना कचरा व्यवस्थापन मंत्री मायकेल लोबो मात्र निर्णय टीसीपी घेणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे यामागचे नेमके गौडबंगाल काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. ∙∙∙
घनःश्यामही तृणमूलच्या वाटेवर!
दिगंबर कामत यांच्यापासून फारकत घेतलेले मडगावचे नगरसेवक घनःश्याम शिरोडकर मडगावात भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात शड्डू ठोकणार अशी अटकळ व्यक्त केली जात होती. मात्र, त्यांची आणि भाजपची सोयरीक काही जमलीच नाही. त्यामुळे शिरोडकर यांच्या भोवती तृणमूलने आपला गळ घालून ठेवला होता. पण मागचे कित्येक दिवस त्यांनी तृणमूललाही डॉज केले. पण आता ते तृणमूलच्या गळाला लागल्याचे सांगितले जाते. येत्या दोन-तीन दिवसांत ते कदाचित या पक्षात सामील होतील असेही सांगितले जाते. घनश्याम हे चर्चिल आलेमाव यांना जवळ असलेले राजकारणी हे सर्वांनाच माहिती आहे. कदाचित घनश्याम यांना आधी पाठवून मग आपण दिदींच्या पक्षात एन्ट्री मारण्याचे चर्चिलने ठरविले तर नाही ना? ∙
पुरावे कसले मागता?
मडगाव पालिकेच्या बाजार समितीच्या बैठकीत मार्केटमधील दुकानांच्या हस्तांतरणावरुन खडाजंगी झाली व मुख्याधिकाऱ्यांनी पुरावे द्या कारवाई करतो असे आश्वासन दिले. खरे तर हे तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. कारण पालिकेने दुकानदार, गाडेवाले सोपोधारक यांना ओळखपत्राची सक्ती केलेली आहे व त्या आधारे सत्यता पडताळून पहाता येते. पण, पालिकेला खरेच ते हवे आहे का? ∙∙∙
आणखी एक आजगावकर
उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे सध्या राज्याच्या राजकारणात असताना त्यांचे बंधू आणि मडगावचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र आजगावकर हे आपली कन्या रोनिता आजगावकर हिला नगरसेविका बनवून मडगावच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाले आहेत. हेही नसे थोडके म्हणून आणखी एका आजगावकरांना राजकारणात येण्याचे वेध लागल्याचे कळते. बाबूचे आणखी एक बंधू डॉ. श्रीकांत आजगावकर, जे या वर्षीच सरकारी नोकरीतून निवृत्त होऊन आपली खासगी प्रॅक्टीस सुरू केली आहे. त्यांनाही आता राजकारणात येण्याचे वेध लागले आहेत. डॉ. आजगावकर यांना म्हणे माडगावातून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांनी चाचपणी सुरूही केली आहे. कुठल्या पक्षाकडून बरे ते निवडणूक लढविणार? ∙∙∙
‘प्रतिमाताई खूश’
नावेली मतदारसंघातून ‘आप’च्या उमेदवार प्रतिमा कुतिन्हो आज खूश झाल्या असतील. नावेलीत आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी गृहआधार योजनची घोषणा केली. केजरीवाल गोव्यात आले की योजनांचा ‘बॉम्ब’ टाकतीलच, हे आता सगळ्यांनाच कळून चुकले आहे. त्यामुळे या सभेकडे लक्ष लागले होते. सभेसाठी महिलांची इतकी गर्दी पाहून केजरीवालांना समाधान लाभले. त्यांचा उत्साह भाषणातून जाणवलाही. दुसरीकडे, आपल्या मतदारसंघात केजरीवालांची ही घोषणा आत्मविश्वास वाढविणारी ठरली, असे कुतिन्हो म्हणाल्या. सभागृह पूर्णपणे भरले होते आणि सभागृहाबाहेर काही लोक होते. त्यामुळे आपल्याला मिळालेला हा प्रतिसाद पाहता प्रतिमाताई नक्कीच खूश झाल्या असतील. ∙∙∙
त्यांची दिवाळी संपेनाच
समाजसेवेच्या नावाने शहरात ठीक-ठिकाणी लावण्यात आलेले शुभेच्छा फलक अजून दिवाळी संपून नाताळ आला तरी हटविण्यात आलेले नाहीत. शुभेच्छांच्या नावाने फुकटात राजकारण करता येते म्हणून आणि बाजारात परत फलक लावण्यासाठी जागा मिळणार नाही म्हणून या नेत्यांनी बॅनर्स, होर्डिंग अजूनही हलविले नाहीत. फुकटात जाहिरात करणाऱ्या या बॅनर्सची लोकांना मात्र कीव येत आहे. नाताळ जवळ आल्याने आतातरी दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फलक काढून टाका, अशी टीका आता सर्वत्र होऊ लागली आहे.∙∙∙
तृणमूल रॉक्स!
सध्या गोव्याची सर्वात अधिक मक्तेदारी कुठल्या राजकीय पक्षाने घेतली आहे तर तृणमूल काँग्रेस पक्षानेच असे निदान दिल्लीत संसदेत गोव्याच्या प्रश्नांना वाचा फोडत असल्याने वाटते. काही दिवसांपूर्वी लुईझिन फालेरो यांनी राज्यसभेत गोव्यातील बेकायदेशीर खनिज व्यवहारावर आवाज उठवून आपली छाप सोडली होती. काल तृणमूलच्या आणखी एक खासदार आणि गोव्याच्या प्रभारी महुवा मोईत्रा यांनी ओल्ड गोवा येथील बेकायदेशीर बांधकामावर आवाज उठवून हे बांधकाम मोडण्याची मागणी केली. तृणमूलचा हा गोंयचो मोग सासणाचो उरू हीच गोंयच्या सायबाच्या पायाशी मागणी..!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.