खरी कुजबुज: ‘सनबर्न’च्‍या मागे रेजिनाल्‍ड?

Khari Kujbuj Political Satire: विरोधी पक्षातील नेतेही सभापती रमेश तवडकर यांच्या ‘श्रमधाम’ योजनेच्या प्रेमात पडले आहेत
Khari Kujbuj Political Satire: विरोधी पक्षातील नेतेही सभापती रमेश तवडकर यांच्या ‘श्रमधाम’ योजनेच्या  प्रेमात पडले आहेत
khari kujbujDainik Gomantak
Published on
Updated on

‘सनबर्न’च्‍या मागे रेजिनाल्‍ड?

कुडतरीचे आमदार आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स यांचे सध्‍या ग्रह फिरलेत की, काय कुणास ठाऊक. पण त्‍यांच्‍यावर एका पाठोपाठ एक आरोप होऊ लागलेत एवढे खरे. निवडणुकीच्‍या काळात रेजिनाल्‍ड यांनी भाजपच्‍या उमेदवार पल्‍लवी धेंपे यांना मुद्दामहून चर्चमध्‍ये नेले, असा आरोप केला जात होता. आता त्‍यांचे विराेधक त्‍यांच्‍यावर दक्षिण गोव्‍यात ‘सनबर्न’ आणण्‍यामागे रेजिनाल्‍ड यांचाच हात आहे ,असा आरोप करू लागलेत. कुडतरी येथे झालेल्‍या ग्रामसभेच्‍यावेळी रेजिनाल्‍ड यांना सनबर्न बद्दल प्रश्‍न केला असता त्‍यांनी ‘नो कॉमेंट्‌स’ अशी प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली होती. त्‍यामुळे ‘सनबर्न’ दक्षिण गोव्‍यात आणण्‍यामागे रेजिनाल्‍ड हेच आहेत, असा आरोप केला जातो. यावर रेजिनाल्‍ड काही खुलासा देणार का? ∙∙∙

अन् पोलिस जागे झाले

मध्यंतरी ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन पोलिस करत होते. ज्येष्ठ नागरिकांच्या निवासस्थानी पोलिस भेट देत असत. ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वाटावे, असे वातावरण तयार करण्यावर भर देण्यात येत असे. नंतर त्यात मरगळ आली. ज्येष्ठ नागरिक हा विषय पोलिस खात्याच्या प्राधान्यक्रमातून मागे पडला. त्यानंतर आता कांदोळी येथे ज्येष्ठ नागरिकाचा खून झाला आणि पोलिसांना ज्येष्ठ नागरिकांची आठवण आली आहे. सडा वास्को परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन पोलिसांनी विचारपूस केली आहे. हळूहळू राज्यभरात पोलिस सक्रिय होतील आणि काही महिन्यांनी त्यांना या उपक्रमाचा विसरही पडेल. त्यांना जागे होण्याठी एखाद्या गुन्हा घडल्याचीच गरज का भासावी? ∙∙∙

‘किस्सा दोस्ताना’चा

२०१२ मधील निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवार निवडून आले होते, त्यातील काहींना भाजपचा पाठिंबा होता. फातोर्ड्यातही त्यावेळी अपक्षाचीच सरशी झाली होती व त्या अपक्षाने नंतर अन्य अपक्षांना एकत्र आणून वेगळे समीकरण करण्याचाही प्रयत्न केला होता. या सर्व अपक्षांनी त्यावेळी एक दिवस बुलेटवरून विधानसभेत जाण्याचा प्रकार केला होता व त्यांनी त्यावेळी न घातलेल्या हेल्मेटवरून वादही झाला होता. पण मुद्दा तो नाही. त्यावेळी पर्वरीतून रोहन खवंटे अपक्ष म्हणून निवडून आले होते, ते वेगळ्या कारणास्तव. ते एरवी भाजपचेच पण त्यावेळी त्या पक्षातील एका गटाने त्यांना विरोध केला व ते अपक्ष म्हणून लढून निवडून आले. त्यावेळी त्यांची व अपक्ष असलेल्या विजय सरदेसाई वगैरेंनी पाच वर्षे पर्रीकरांना विविध कारणास्तव सळो की पळो करून सोडले होते. काळाचा महिमा असा की, आज ते भाजपचे मंत्री आहेत व कॉंग्रेस तसेच त्यांचे एकेकाळचे सहकारी असलेले सरदेसाई त्यांना विविध कारणास्तव असेच धारेवर धरताना दिसत आहेत. २०१२ मधील त्यांचा ‘दोस्ताना’ आता संपुष्टात आला असावा, असे राजकीय गोटात बोलले जात आहे. ∙∙∙

धास्ती संरक्षक भिंतींची!

गोव्यात पावसाने यंदा अक्षरशः थैमान माजवले आहे.जुलैमध्येच तो इंचांचे शतक पार करेल, अशी चिन्हे दिसत आहेत. या वादळी पावसाने मोठ्या प्रमाणात पडझड तर झाली आहेच पण मानवी बळीही गेले आहेत. घरे व भिंती, त्याही संरक्षक भिंती कोसळून मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. फातोर्ड्यात तळसांझर येथे तर अनेक सदनिका अशी भिंत कोसळून धोक्यात आलेल्या आहेत. तेथील रहिवाशांनी त्या भिंतीबाबत सदर यंत्रणांना कळवूनही त्यांनी कोणतेच उपाय योजलेले नाहीत की, कारवाई केलेली नाही, असे सांगितले जाते.यापूर्वी कुंडई औद्योगिक वसाहतीत अशीच भींत कोसळून तीन कामगार मरण पावलेले आहेत तर पेडणे महामार्गावर रस्त्याची संरक्षक भिंत व दरड कोसळलेली आहे. त्यामुळे एकंदरीत लोकांनी अशा भिंतीची धास्ती घेतलेली दिसते. डोंगर कपारींच्या जवळ राहणारे तर पावसाचा जोर वाढला की, देवाचा धावा करताना दिसतात. यामुळे अशा संरक्षक भिंतीची कंत्राटे घेतलेले ठेकेदारही म्हणे बिथरलेले आहेत. ∙∙∙

विरोधी पक्षही ‘श्रमधाम’च्या प्रेमात

विरोधी पक्षातील नेतेही सभापती रमेश तवडकर यांच्या ‘श्रमधाम’ योजनेच्या प्रेमात पडले आहेत. ‘गोवा फॉरवर्ड’चे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी विधानसभेत गृहनिर्माण मंडळाला मूळ गोवेकरांसाठी घरे बांधण्यासाठी अनुदान देत असतानाच सभापतींच्या ‘श्रमधाम’ योजनेसाठी खास तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. या त्यांच्या विधानसभेतील मागणीवरून विरोधी आमदारांच्या भुवया उंचावल्या. मात्र, तुम्ही सभापतींचा इन्सल्ट आम्ही करतो, असे म्हणत होता आता ‘श्रमधाम’ साठी आम्ही सभापतींचे अभिनंदन करतो, असे विजय सरदेसाई यांना म्हणायचे होते. पण, मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांना अडवले. सरदेसाई यांनी बेंबीच्या देठापासून सभापतींच्या ‘श्रमधाम’ योजनेची इतकी वाहवा केली अन् मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या गृहनिर्माण मंडळाला मूळ गोंयकारासाठी घरे उभारण्यास अनुदान देण्याच्या घोषणेची खिल्ली उडविली. ‘श्रमधाम’चे कौतुक हा मात्र चर्चेचा विषय बनला आहे. ∙∙∙

महापौरही आले गटार सफाईला

आज सकाळी सकाळी महापौर रोहित मोन्सेरात महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन शहरात गटारे सफाईच्या कामाला आल्याचे दिसले. त्यामुळे गटारे का तुंबतात, याची कारणेही महापौरांना सकाळी कळाली असावीत. या कामाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे तत्काळ समाजमाध्यमांत व्हायरल झाली. नेटकऱ्यांनी मात्र त्यावर टीकाही केली. लवकर शहरात येण्याची उशिरा का होईना महापौरांना पावसाने सुबुद्धी दिली, असेही काहीजण म्हणू लागले. पण महापौर मोन्सेरात यांनी एवढ्या सकाळी उपमहापौर संजीव नाईक यांना का बोलावले नाही, हाही एक प्रश्नच. ∙∙∙

जे दहा वर्षांत जमले नाही, ते पंधरा दिवसांत!

काणकोण तालुक्यातील गावडोंगरी,खोतीगावात गावणे धरण उशाला असूनही उन्हाळ्यात नदी पात्रात खड्डे खणून पेयजल मिळवावे लागते. काही ठिकाणी अनियमित टॅंकरची वाट पहावी लागत आहे. हे गावडोंगरीवासीयांच्या अनेक पिढ्यांच्या पाचवीला पूजलेले आहे. मात्र, ‘आरजी’ चे वीरेश बोरकर यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्यानंतर जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे ‘छुमंतर’ म्हणून मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसांत गावडोंगरी भागाला २४X७ पाणी पुरवठा करण्याचे वचन विधानसभेत दिले. आता पावसाळा सुरू आहे, पर्यटन हंगामही नाही, त्यामुळे चापोली धरण जलाशयावरील ताण कमी आहे, हे पाणी गावडोंगरी पंचायत क्षेत्रात वळविण्याची नामी शक्कल पाणी पुरवठा खात्याच्या कुणी तरी बिरबलाने त्यांना शिकवली असावी, अशी चर्चा काणकोणात होत आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: विरोधी पक्षातील नेतेही सभापती रमेश तवडकर यांच्या ‘श्रमधाम’ योजनेच्या  प्रेमात पडले आहेत
खरी कुजबुज: मुख्‍यमंत्र्यांना सनबर्नचे एवढे कौतुक का?

मुख्यमंत्रीसाहेब कुंकळ्ळीला फेरी माराच !

‘इफ यू फेल टू प्लॅन, इट इज शुअर यू प्लॅन टू फेल’, असे इंग्रजीत एक बोध वाक्य आहे.आपल्या सरकारला व गलेलठ्ठ वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांना नियोजन काय असते, प्लॅनिंग कसे करावे हे कळत नाही, असे खेदाने म्हणावे लागते. योग्य नियोजन नसल्याने ‘स्मार्ट सिटी’ करायला घेतलेल्या पणजीला म्हातारी केली. तीच गत कुडचडे अन् कुंकळळी नगरांचीही झाली आहे. पाऊस सुरू झाला असताना सरकारने नेमलेल्या अनाडी कंत्राटदाराने भूमिगत वीज वाहिन्यांचे काम सुरू करण्यासाठी रस्ते खोदल्यामुळे कुंकळ्ळीची जनता फोंडकुलात (खड्ड्यात) पडली आहे. कुंकळ्ळी बाजारात भलेमोठे खड्डे खोदून ठेवल्यामुळे बाजारात येणाऱ्यांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कसरत करत व जीव् घोक्यात घालून चालावे लागते. कुंकळ्ळी ते औद्योगिक वसाहत पर्यंतच्या रस्त्या बद्दल तर न विचारलेले बरे. भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खोदून ठेवल्यामुळे हा रस्ता खड्डेमय तर झालाच आहे, रस्ता मृत्यूचा सापळाही बनलाय.या रस्त्यावर दुचाकी चालविणे धोक्याचे बनले आहे. जाब विचारल्यास कुंकळ्ळीचे आमदार युरी बाब व त्यांचे समर्थक नगरसेवक व भक्त म्हणतात चांगली वीज हवी, मग कळ सोसा. कुंकळ्ळीतील पीडित मात्र म्हणताहेत मुख्यमंत्री साहेब व विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळी पालिका क्षेत्रातील रस्त्यावर एक पासय मारून ‘आँखो देखा हाल’ पहावा. डॉ. साहेब चला तर या एक दिवस बहिणीच्या घरी, अन् अनुभवा थरार फोणकुलांनी भरलेल्या रस्त्याचा!. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: विरोधी पक्षातील नेतेही सभापती रमेश तवडकर यांच्या ‘श्रमधाम’ योजनेच्या  प्रेमात पडले आहेत
खरी कुजबुज: निधी नसेना, घोषणा तरी झाली!

आनंद नाईकना लॉटरी

फोंडा पालिकेचे नगरसेवक आनंद नाईक यांना नगराध्यक्षपदाची लॉटरी लागली. आनंद नाईक हे दुसऱ्यांदा पालिकेवर निवडून आले आहेत, त्यामुळे नगराध्यक्षपदी बसण्याचा त्यांनाही हक्क आहेच की...! आनंद नाईक हे मितभाषी, पण काम जास्त करून दाखवणारे अशी त्यांची ख्याती आहे. रवी नाईक यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. एवढी वर्षे रवी पात्रावांबरोबर असल्याने त्यातच आपल्या प्रभागात कामांचा धडाका लावून पालिका निवडणुकीतही त्यांनी बहुमत घेतले होते, त्यामुळे आनंद नाईक यांना ही रास्त संधी मिळाली, अशाच प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com