खरी कुजबूज! ...अरे देवा आता किती कोटींचा चुराडा..?

अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावरही (इफ्फी) 15 कोटी मोडल्याची माहिती
Goa Assembly 2022 Khari Kujbuj
Goa Assembly 2022 Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly 2022 : चर्चिल कुणाबरोबर?

तृणमूल काँग्रेसच्या (TMC) वाटेवर असलेले बाणावलीचे आमदार चर्चिल अलेमाव यांची कुंकळ्ळीत बरीच फजिती होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. कुंकळ्ळीत कॉंग्रेसच्या उमेदवारीवर त्यांचे पुतणे युरी आलेमाव निवडणूक लढवण्याच्या बेतात आहेत. युरीच्या विरुद्ध तृणमूलमधून डॉ. जोर्सन फर्नांडिस निवडणूक लढणार आहेत. तर चर्चिल यांचे चेले प्रशांत नाईक आपच्या उमेदवारीचे इच्छुक आहेत. चर्चिलना तृणमूलचे उमेदवार जोर्सन यांच्या प्रचारासाठी उतरवावे लागेल यात शंका नाही. पण, त्यामुळे युरी आणी ज्योकीमची नाराजी त्यांना पत्करावी लागेल. युरींना पाठिंबा दिला तर पक्षाशी गद्दारी ठरेल आणि या दोघांनाही वगळून चर्चिलनी जुने चेले प्रशांत नाईक यांना पाठिंबा दिल्यास पक्ष आणि बंधूप्रेमाला त्यांना मुकावे लागेल. बाणावलीपेक्षा कुंकळ्ळीतील निवडणूक चर्चिल आलेमाव यांच्यासाठी खडतर आव्हान ठरणार आहे. त्यातून ते कासे मार्ग काढतात, हा विषय सर्वत्र चर्चेचा बनलेला आहे. ∙∙∙

गणेशभाऊंच्या वाढदिनी सरपंच गायब

सावर्डेचे माजी आमदार गणेश गावकर यांनी आपला वाढदिन सोहळा थाटात साजरा केला. त्यांच्या शिक्षण संस्थेच्या महाविद्यालय वास्तूचा पायाभरणी समारंभही झकास झाला. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी उपस्थिती लावली. लोकांचीही तुडुंब गर्दी होती. सगळं कसं थाटात झालं. मात्र, व्यासपीठावर सावर्डे मतदारसंघातील बहुतांश सरपंचांची अनुपस्थितीत प्रकर्षाने जाणवली. हे सरपंच गणेश भाऊवर नाराज आहेत काय, की कुणी त्यांना फुसलावले आहे, की एखादी आपत्कालीन वेळ आल्याने हे काही सरपंच या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही, ते काही कळायला मार्ग नाही. मात्र कार्यक्रमाला लोकांची तुडुंब उपस्थिती होती, त्यामुळे भाऊंचे शक्तीप्रदर्शन यशस्वी झाले असेच म्हणावे लागेल. ∙∙∙

बिचारे निष्ठावान कार्यकर्ते!

वट वृक्षाच्या सावळीत इतर झाडे वाढू शकत नाहीत तसेच मोठ्या नेत्याच्या छायेत लहान कार्यकर्ता पुढे जाऊ शकत नाही हे सत्य प्रत्येक कार्यकर्त्याने जाणले पाहिजे. मोठे राणे गेल्या पन्नास वर्षांपासून आमदार आहेत या दरम्यान किती कार्यकर्त्यांनी आपल्या इच्छा आकांक्षा मारल्या असणार? दिगंबरमुळे किती सावियोंना शेडो बनावे लागले असणार? बाबुशमुळे सिद्धार्थाला अकाली सेवानिवृत्ती घ्यावी लागली. ज्योकीममुळे एल्विस, आलतीन, मारियो, कितीजणांना राजकीय सन्यास घ्यावा लागला. बाबूमुळे खुशालीची मजल झेडपी पर्यंतच सीमित राहिली. कार्यकर्त्यांनी केवळ झेंडेच नाचवावे का? कार्यकर्त्यांनी केवळ पालखीचे भोयीच व्हावे का? केवळ गळ्यात मफलर घालून धोलच बडवावे का? हे प्रश्न आता कार्यकर्ते विचारायला लागले आहेत. प्रामाणिकता व निष्ठेपेक्षा व्हिनेबिलिटी भारी झाली म्हणजे हे अशेच होणार म्हणून कार्यकर्त्यांनो शहाणे व्हा असा सूर आता ऐकायला येत आहे. ∙∙∙

बांदोडकर मैदानावर पुन्हा क्रिकेट!

कांपाल येथील पणजी जिमखान्याचे भाऊसाहेब बांदोडकर मैदान हे गोव्यातील (Goa) क्रिकेटचे ऐतिहासिक केंद्र. मात्र, तेथील नूतनीकरण कामामुळे या ठिकाणचे क्रिकेट मागील काही वर्षे बंदच होते. आता याठिकाणी पुन्हा एकदा क्रिकेट बहरू लागलेय. बांदोडकर करंडक बाद फेरी स्पर्धेनिमित्ताने मैदानावर स्पर्धात्मक क्रिकेट अवतरले. नव्या वर्षाच्या सुरवातीस या मैदानावर भव्यदिव्य स्वरूपात मेंबर्स लीग क्रिकेट स्पर्धा खेळली जाईल. या स्पर्धेची लिलाव प्रक्रिया झगमगाटात झाली, त्यामुळे स्पर्धेबाबत उत्सुकता वाढली आहे. पणजी जिमखान्याशी केलेल्या सामंजस्य करारांतर्गत गोवा क्रिकेट असोसिएशनचेही याठिकाणी अद्यायावत क्रिकेट अकादमी सुरू करण्याचे नियोजन आहे. एकंदरीत राज्यातील या जुन्या क्रीडा वास्तूवर अव्याहतपणे क्रिकेट दिसणार आहे, ती गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्यासाठी आदरांजलीच असेल. ∙∙∙

आता किती कोटींचा चुराडा?

राज्यातील सत्ताधारी भाजपा सरकार मतदारांना आकृष्ट करण्यासाठी विविध कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. या कार्यक्रमांमधून त्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश कार्यान्वित करण्याऐवजी भाजपचा प्रचारी थाटच जास्त दिसतोय. महिला युवक आणि पंचायत सदस्यांसाठी झालेल्या संसदांमधून मूळ उद्देश किती साध्य झाला, हे कळायला मार्ग नाही. पण करदात्यांच्या करोडो रुपयांचा चुराडा झाला. आता आंतरराष्‍ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची जागृती किती होईल, हा अलाहिदाचा प्रश्न आहे. मात्र, सरकारच्या तिजोरीतील चार-पाच कोटी रुपये मोडले जाणार हे स्पष्ट आहे. अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावरही (इफ्फी) 15 कोटी मोडल्याची माहिती आहे. ∙∙∙

वदनी कवळ घेता..!

‘आप’ (AAP), ‘तृणमूल’च्‍या एन्‍ट्रीनंतर काँग्रेस काहीसा पिछाडीवर गेला होता. राहुल गांधी यांच्‍या पायलटस्‍वारीनंतर आता प्रियांका गांधी यांनी थेट मोरपिर्लातील ग्रामीण जीवनाशी समरस होत तेथील लोकांशी संवाद साधला. तेथील लोकसंस्‍कृती व सांस्‍कृतिक संचित पाहून त्‍या एवढ्या भारावल्‍या की, नृत्‍यावर ठेका घेण्‍याचा मोह त्‍यांना आवरता आला नाही. पंगतीमध्‍ये जेवणावळीचा अनुभव काय असतो? वदनी कवळ घेता, नाम घ्‍या... असे श्‍लोक म्‍हणताना अन्न हे पूर्णब्रह्म असल्‍याचा अनुभव खुद्द त्‍यांनी घेतला. त्‍यांच्‍यासोबत पंगतीत बसणारेही सुखावले, जेवण वाढणारेही आठवणींची शिदोरी घेत तृप्‍त झाले. गोमंतकीय शहाळ्यांतील शुद्ध नैसर्गिक पाण्‍याची चव काही औरच होती, असेही त्‍या सांगण्‍यास विसरल्‍या नाहीत. काॅंग्रेसच्या प्रमुख नेत्या असलेल्या प्रियांका गांधी यांच्या या गोवा दौऱ्याचा मतदानावर फरक पडेल काय हे निवडणुकीनंतरच कळणार आहे.∙∙∙

काँग्रेसच्या मळनेक बी ना भात

शुक्रवारी काँग्रेसच्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांची सभा म्हणजे नियोजन कमी आणि गोंधळ जास्त अशीच परिस्थिती होती. एमसीसी हॉल मध्ये मोलेच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद झाला. मात्र, तट सभेला प्रसार माध्यमांना आत सोडले नाही. ही बंददार बैठक असे सांगण्यात आले. यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिगंबर कामत आणि गिरीश चोडणकर यांच्यासमोर कैफियत मंडळी असता त्यांनीही हतबलता दाखविली. पी. चिदंबरम यांना विचारले असता, मी या कार्यक्रमाचा आयोजक नाही असे ते म्हणाले. हा एकंदर प्रकार पाहता काँग्रेसच्या या मळणीला बी ना भात अशीच परिस्थिती दिसून आली. ∙∙∙

रस्ता खुला केला नसता तर?

फर्मागुढी-ढवळी चौपदरी रस्त्याचा काही भाग लोकांच्या उपस्थितीत आमदार सुदिन ढवळीकर यांनी खुला केला. मात्र, हा विषय प्रतिष्ठेचा बनवत भारतीय जनता पक्षाने सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना पाचारण करून अजून काही कामे शिल्लक असल्याचे सांगत बंद केला. आता बंद केलेला रस्ता येत्या १५ तारखेला खुला केला जाईल असे मंत्र्यांनी जाहीर केल्याने सध्या शिल्लक काम जोरात सुरू आहे. आता तुम्ही सांगा, हा रस्ता सुदिन आणि लोकांनी खुला केला नसता तर या खात्याला जाग तरी आली असती काय? असा सवाल येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे. ∙∙∙

भाजपचे इच्छुक नाराज

फोंड्यात रवी नाईक यांच्या भाजप प्रवेशावेळी फोंड्यातीलच काही भाजप मंडळाचे आणि अन्य इतर पदाधिकारी अनुपस्थित होते. यामागे काय राजकारण आहे ते माहीत नाही, पण रवी नाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे या इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारीवर पाणी फेकले गेलेय हे नक्की. एक मात्र खरे, रवींनी भाजप प्रवेशावेळी गर्दीचा पूर आणला. गर्दी झाली खरी. पण खुद्द भाजप मंडळातीलच काही कार्यकर्ते नाराज असल्याचे समजते. आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे या नाराजांची कशी काय समजूत घालणार देव जाणे..! ∙∙∙

आतातरी पालिकेने लक्ष द्यावे!

फोंडा शहर नेहमीच गजबजलेले असते. शहरात दुकानेही वाढलेली आहेत. आता जागाच कमी पडत असल्याने फुटपाथवरही दुकानदारांचे अतिक्रमण सुरू आहे. फोंड्यातील मुख्य दादा वैद्य चौकात तर भर रस्त्यावर काही दुकानदारांनी आपले सामान मांडले आहे. अवघ्या काही अंतरावरच फोंडा पालिका कार्यालय आहे. येथून पालिकेचे नगरसेवक आणि अधिकारी यांची नेहमी ये-जा असते. पण, फुटपाथवर ठेवलेले सामान हटवण्याची तसदी कुणी घेत नाही. आता व्यापार हाकरायलाच हवा, त्याला कुणाची ना नाही. गोमंतकीय व्यापाऱ्यांना तर आमचा पाठिंबा आहे. मात्र, व्यापाऱ्यांच्या नावावर कमरेचे सोडून डोक्याला बांधण्याचा हा प्रकार कितपत योग्य आहे, याचा विचार पालिकेने करायला नको का? ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com