खरी कुजबुज: घोषणा करा, पण विचाराने!

Khari Kujbuj Political Satire: रेजिनाल्ड यांचे बोलणे झाल्यावर तिथे सरकारविरोधात बोलण्यासाठी शेतकरी तयार होता, पण आलेक्सनी आपल्या हातातील माईक सोडला नाही
Khari Kujbuj Political Satire:  रेजिनाल्ड यांचे बोलणे झाल्यावर तिथे सरकारविरोधात बोलण्यासाठी शेतकरी तयार होता, पण आलेक्सनी आपल्या हातातील माईक सोडला नाही
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

घोषणा करा, पण विचाराने!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी किमान पाच देशी गायी पाळा आणि दर दिवशी चारशे रुपये कमवा अशी नवी घोषणा केली आहे. या घोषणेची चिकणमाती होऊ नये. कारण यापूर्वी सरकारने मूर्ती कलाकारांना अनुदान देण्याची घोषणा केली, पण गणपती विसर्जनानंतर ठिकठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती महिनोन महिने पाण्यात तरंगत असल्याचे दिसून येत असतात. सरकारने जर प्लास्टर ऑफ पॅरीसवर बंदी घालून मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्यांना अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे, तर विसर्जन केलेल्या मूर्ती पाण्यात का तरंगतात त्या विरघळत का नाहीत याची चौकशी करावी. म्हणजे योजनेचा फायदा लुटला जात आहे किंवा सरकारचे अशा प्रकारांवर लक्ष नसल्याचे सिद्ध होत आहे. असाच प्रकार देशी गायीसंदर्भात होणार नाही कशावरून? आपल्या पाच नव्हे दहा गायी आहे म्हणून अनुदान लाटले जाणार आहे, पण त्या गायी गोठ्यात नसून मोकाट फिरणाऱ्या नसतील कशावरून? अशा लोकप्रिय घोषणा करून सवंग लोकप्रियता घेता येते, पण अंमलबजावणी केली जात नसते. त्यापेक्षा मुख्यमंत्री साहेब मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी गावात गोशाळा वाढविण्यास अनुदान द्या. जेणेकरून मोकाट गुरे बंद होऊन अपघात टळतील आणि योजना सफल होईल. ∙∙∙

रेजिनाल्ड का गरजले?

शनिवारी रवींद्र भवनात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान तसेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधला. तिथे कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यावर रेजिनाल्डनी सरकारच्या कृषी धोरणाची प्रशंसा केली व दिखाव्यासाठी काही प्रमाणात टीकाही करताना सूचना केल्या. रेजिनाल्ड यांचे बोलणे झाल्यावर तिथे सरकारविरोधात बोलण्यासाठी शेतकरी तयार होता, पण आलेक्सनी आपल्या हातातील माईक सोडला नाही. एका प्रेक्षकाने अरे त्यालासुद्धा आपली बाजू मांडू दे असे म्हटल्यावर रेजिनाल्ड यांचा पारा चढला. हे ठिकाण व वेळ काहीही बरळण्यासाठी नाही असे रेजिनाल्डनी सांगितले व आपले सरकारला असलेल्या पाठिंब्याचे एकप्रकारे प्रदर्शनच केले. २०२२ साली भाजप सरकारला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांच्या मतदारसंघातील काही लोक अजूनही नाराज आहेत हेसुद्धा यावेळी दिसून आले. रेजिनाल्डनी आवाज वाढवून विरोधकांनी आपल्यासमोर गोंधळ घालू नये असा सरळ इशारासुद्धा दिला असे लगेच त्यांचे समर्थक तेथे बोलत होते. ∙∙∙

पैसे गेले खड्ड्यात अन् पाण्यात..!

खड्डे अन् रस्त्यांची चाळण हा सध्या कळीचा मुद्दा आहे. सामान्यांच्या कष्टाचा अन् कराचा पैसा कुठं मुरतोय, हे रस्तोरस्ती दिसणाऱ्या खड्ड्यांतून स्पष्टपणे दिसते. रस्त्यांवरून वाहन हाकणे म्हणजे जणू चंद्रावर चालण्याची कसरत करणे अशीच समजूत आता सर्व लोकांची झाली आहे. म्हापशात संतप्त रहिवाशांनी रस्त्यांवरच्या खड्ड्यांत साचलेल्या पाण्यात खोट्या नोटा टाकून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला, पण पाण्यात जरी खोट्या नोटा सोडल्या, तरी त्या कष्टकरी जनतेचे खरेखुरे रुपये खड्डे डागडुजीच्या नावे सरकारने पाण्यात घालवले, असेच दिसत होते. एका खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी १६ हजार रुपये खर्चले जातात, असेही वृत्त वाचनात आले होते. एकंदर रस्ते दुरुस्तीसाठी तकलादू साहित्य वापरून जनतेच्या सुरक्षेची हेळसांड करणं जणू सरकारचं कामच झालंय, अशी लोकांची भावना झाली आहे.∙∙∙

अनेकांचा अपेक्षाभंग

उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी काही नवरदेव बाशिंग बांधून बसले होते, परंतु भाजपने निवड करताना पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला अध्यक्षपदे दिल्याने अनेकांचा अपेक्षाभंग झाला. उत्तर गोव्यात शंकर अनंत चोडणकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने काही जणांच्या पचनी पडलेले नाही. ही मंडळी आता अध्यक्षपदी आरूढ होऊन २०२७ च्या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याची स्वप्ने पाहात होती, परंतु अखेर या मंडळींचे आता ‘तेलही गेले आणि तूपही गेले, हाती आले धुपाटणे’ असे झाले आहे. त्यामुळे अपेक्षाभंग झालेल्या मंडळीला पुढील निवडणुकीत उमेदवारी तरी दिली जाईल का यावरून चर्चा रंगत आहे. ∙∙∙

कारवाई की दिखावा?

मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीयांना यंदा हरित चतुर्थी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी केलेले आवाहन हे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य आहे. राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींना बंदी आहे. त्यासंदर्भातचा फतवा सरकारने यापूर्वीच काढलेला आहे. अशा मूर्तींविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. अशा मूर्ती खरेदी न केल्यास प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीही गोव्यात विक्रीसाठी आणल्या जाणार नाहीत. मात्र, गोव्यात एका महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणात या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे आगमन झाले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ मूर्तींची तपासणी करत आहे याबाबतच शंका आहे. बहुतेक प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती गोव्याबाहेरून आणल्या जातात. त्यामुळे त्या चेकनाक्यावर का तपासल्या गेल्या नाहीत हा प्रश्‍न अनुत्तरित राहतो. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीविरुद्ध आता गणेश चतुर्थीला काही दिवस बाकी असताना कारवाई झाल्यास ऐनवेळी मूर्तींची कमतरता गोव्यात होऊ शकते. त्यामुळे ही कारवाई होईल याबाबतच शंका आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती सुबक व आकर्षक असतात. त्यामुळे काहींना या मूर्तीच हव्या असतात. त्यामुळे सरकारची ही कारवाई कठोर असेल की फक्त दिखावा हे अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कारवाईवरून दिसेल. ∙∙∙

काँग्रेसचे केवळ आरोपच

राज्यात बेकायदेशीर डोंगरकापणी व चिरेखाणीचे प्रकार गेल्या काही दिवसांत उघडकीस येऊ लागले आहेत. त्यामुळे काँग्रेसनेही त्याचा फायदा घेत सरकारवर टीका करत झोड उठवण्यास सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी पेडण्यातील डोंगरकापणीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र, कुडचिरे येथे बेकायदेशीर चिरेखाणी सुरू असल्याचा पर्दाफाश झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष त्याच नेटाने त्याच्या कारवाईसाठी सरसावले नाहीत याबाबत आश्‍चर्य वाटते. सरकारने गोवा विक्रीस काढला आहे असे आरोप काँग्रेसकडून केले जातात. मात्र, त्याला विरोध करताना काँग्रेसची भूमिका फक्त टीका व आरोप करण्याइतपतच समिती आहे का असा प्रश्‍न पडतो. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यासाठी काँग्रेसने काय पावले उचलली आहेत का याबाबतही साशंकता आहे. संबंधित मंत्री किंवा सरकारला कारवाईचे आव्हान देण्याइतपतच काँग्रेसने काम केले आहे. विधानसभेत त्यांच्या आमदारांनी अनेक विषय हाताळले. मात्र, त्याचे पुढे काय झाले? ∙∙∙

व्हेंझी व्हिएगस यांचे गणेशप्रेम

बाणावली ख्रिश्चनांचे वर्चस्व असलेला मतदारसंघ. या मतदारसंघात तीन ते चार हजार हिंदू असतील, पण आता बाणावलीतील आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस हे तेथील हिंदू समाजाशी जवळीक साधू पाहात आहेत. त्यांचे गणेशप्रेम उफाळून आले आहे. गणपती विसर्जनासाठीच्या जागांवर ते सुविधा उपलब्ध करून देण्यास तत्परता दाखवत आहेत. यापूर्वी बाणावलीतील कुठल्याही आमदाराने हा प्रश्र्न हाताळला नव्हता, पण व्हेंझी यांनी दूरदर्शीपणा दाखवून मतदारसंघातील हिंदू समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न चालविल्याचे बोलले जात आहे. २०२७ ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसही आपला उमेदवार ठेवणार आहे हे नक्की. त्यामुळे व्हेंझीबाबना हिंदूच्याही मतांची गरज लागेल की हो अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire:  रेजिनाल्ड यांचे बोलणे झाल्यावर तिथे सरकारविरोधात बोलण्यासाठी शेतकरी तयार होता, पण आलेक्सनी आपल्या हातातील माईक सोडला नाही
खरी कुजबुज: दोघांचे भांडण, तिसऱ्याचा...

कुंकळ्ळीतील धोकादायक झाडे

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव संपूर्ण राज्यातील विविध प्रश्न घेऊन सरकारवर आसूड ओढत असतात, पण त्यांचे आपल्या मतदारसंघाकडे म्हणजे कुंकळ्ळीतील समस्यांकडे दुर्लक्ष होते अशा तक्रारी तेथील मतदार अधून मधून करतात. कदाचित कुंकळ्ळीतील भाजपवाले सक्रिय नसतात हेही त्यामागील कारण असावे. गेल्या काही दिवसांत मडगावातील रस्त्यावर कलंडलेल्या झाडांबाबत तेथील एका युवा नेत्याने, जो सध्या काँग्रेसला जास्त जवळ पोचला आहे, त्याने आवाज उठविला होता. पण कुंकळ्ळीत बाळ्ळीपर्यंतच्या हमरस्त्यावर कलंडलेल्या झाडांबाबत ना भाजपवाले काही बोलतात ना काँग्रेसजन पावले उचलतात. त्यामुळे पाऊस व वारे यामुळे ही झाडे कधीही कोसळण्याचा धोका वाहनचालक व्यक्त करत आहेत. मागे गोव्याच्या विविध भागांत अशी धोकादायक झाडे कापली वा छाटली गेली, पण कुंकळ्ळीत मात्र तशी हालचाल झाली नाही. तेथील नगरपालिका युरी पात्रांवाच्या हातात असतानाही त्यांनी या झाडांबाबत हेळसांड का केली असा सवाल आता केला जात आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com