खरी कुजबुज: दोघांचे भांडण, तिसऱ्याचा...

Khari Kujbuj Political Satire: ज्याअर्थी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हा विषय काढला, त्याअर्थी दिगंबर बाबांना मंत्रिपदापासून दूर तर ठेवायचे नसेल ना?
Khari Kujbuj Political Satire: ज्याअर्थी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हा विषय काढला, त्याअर्थी दिगंबर बाबांना मंत्रिपदापासून दूर तर ठेवायचे नसेल ना?
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

दोघांचे भांडण, तिसऱ्याचा...

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी ‘गोमन्तक टीव्ही’ला दिलेली मुलाखत चांगलीच गाजतेय. त्यात त्यांनी ‘यापुढे जमीन रूपांतरे बंद’ असल्याचे जाहीर केले. ते विश्‍वजीत राणेंना चांगलेच लागले. त्यांनी सकाळी सकाळीच त्यांना फोन लावला. मुख्यमंत्रीही वेळ मारून नेण्यात पटाईत झाले आहेत. सावंत व राणे एकाच मंत्रिमंडळात आहेत, पण एकमेकांचे प्रतिस्पर्धी. गंमत म्हणजे दोघेही पक्षश्रेष्ठींना निकट. राणेंचा जोश पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांना गेल्या तीन वर्षांत सतत कोणत्या ना कोणत्या राज्यातील निवडणूक मोहिमेवर पाठविले आहे. पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही चुचकारत आपले ईप्सित साध्य करणे चालविले आहे. दोघांनाही वाटते, पक्षश्रेष्ठी आपल्यावरच खूष आहेत. ∙∙∙

दिगंबरांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाबद्दल संभ्रम?

गोव्याच्या मंत्रिमंडळात दिगंबर कामत यांचा समावेश होईल अशी गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा चालू आहे. आता चतुर्थीनंतर मंत्रिमंडळात फेरफार होईल असे बोलले जात आहे, पण मध्येच मुख्यमंत्र्यांनी २००७ ते २०१२ दिगंबरबाब मुख्यमंत्री होते त्याकाळी भ्रष्टाचार फोफावला होता अशी टीका केली व सर्वांनाच धक्का दिला. मुख्यमंत्र्यांना नेमके काय सांगायचे आहे याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. ज्याअर्थी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हा विषय काढला, त्याअर्थी दिगंबर बाबांना मंत्रिपदापासून दूर तर ठेवायचे नसेल ना? असेही बोलले जात आहे. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांचे शिंतोडे

काँग्रेस पक्ष भ्रष्ट आणि त्यांचे गोव्यातले सरकार सर्वात भ्रष्ट होते, असे विधान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी करून एका दगडात दोन पक्षी मारले असे म्हणतात. एक म्हणजे त्यांनी काँग्रेसला भ्रष्ट म्हटले आणि दुसरे म्हणजे काँग्रेसमधून जे नेते भाजपात आले, त्यांच्यावरही शिंतोडे उडविले. असे म्हणतात की प्रमोद सावंत यांना हवे असते तर त्यांनी कधीच मंत्रिमंडळात बदल करून टाकला असता, परंतु त्यांना वेळ जाऊ द्यायचा आहे. नवे मंत्री घ्यायचे म्हणजे त्यांना आपल्याकडीलही खाती द्यावी लागतील, इतरांचीही काढून घ्यावी लागतील... त्यामुळे नव्या कटकटी उद्‍भवणार आहेत. त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर जर आपोआपच टीका होऊन ते बदनाम झाले तर ते तसे घडलेले त्यांना हवेच असेल. ∙∙∙

विश्वजीतांच्या प्रांतात रंगतेय प्रभू - भाटीकरांची दोस्ती

उसगाव आणि सत्तरीत मंत्री विश्वजीत राणेंचा एकहाती अंमल आहे. पूर्वी उसगाव भाग फोंडा मतदारसंघात समाविष्ट होता. विश्वजीत राणे सहसा आपल्या मतदारसंघात राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या व्यक्तीला डोके वर काढण्यास देत नाहीत. विरोधकांनाही ते हर एक मार्गाने नामोहरम करून सोडतात. मात्र, आता उसगावात मिलिंद प्रभू राजकीय महत्त्वाकांक्षेने सामाजिक उपक्रम राबवत असल्याची जोरदार चर्चा आहे. अशात त्यांना साथ मिळतेय ती फोंड्याचे युवा नेते डॉ. केतन भाटीकरांची. हल्लीच प्रभू यांनी आयोजित केलेल्या एका क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात प्रभू - भाटीकरांची मंचावरील दोस्ती पाहायला मिळाली. आता यावर मंत्री राणे भविष्यात काही उतारा काढतात का हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. ∙∙∙

सिंघमगिरी भोवली

कोलवा पोलिसांच्‍या मारहाणीच्‍या घटना हा सगळीकडे चर्चेचा विषय बनलेला असतानाच काल मडगावच्‍या महिला पोलिस उपनिरीक्षक अनुष्‍का परब यांच्‍याविरोधात मडगावचे ज्‍येष्‍ठ वकील ॲड. जयंत प्रभू यांना आत्‍महत्‍येला प्रवृत्त केल्‍याप्रकरणी गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. असे म्‍हणतात की, गोवा पोलिसात नव्‍याने भरती झालेले हे नवीन उपनिरीक्षक स्‍वत:ला सिंघमच समजतात आणि पोलिस स्‍थानकात आलेल्‍या लोकांशी तसे वागतात. मात्र, ही सिंघमगिरी सिनेमात चालते. प्रत्‍यक्षात चालत नाही हे आता तरी त्‍यांच्‍या लक्षात येईल का? ∙∙∙

बॅनर्स पुरे आधी खड्डे बुजवा!

सध्या फोंडा शहरात गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्सचे पेव फुटले आहे, पण त्याचबरोबर रस्त्यांची चाळण झालेलीही दिसते आहे. रस्ते खड्डेमय झाल्यामुळे रस्त्यावरून जाताना लोकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्ड्यात पडून कधी कपाळमोक्ष होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे कागदी शुभेच्छांपेक्षा रस्त्यावरचे खड्डे बुजवल्यास आमची गणेशचतुर्थी अधिक सुखासमाधानाने जाईल असे लोक बोलायला लागले आहेत. त्यांचं खरंच आहे म्हणा. खड्ड्यांमुळे शारीरिक इजा झाल्यास गणेशचतुर्थी साजरी करायची तरी कशी हो? ∙∙∙

कोकणीची गोची

कोकणीच्या नाकाकडे सध्या रोमीवाल्यांचा व दुसरीकडे मराठीवाद्यांचा आगडोंब उसळत आहे. एका कोकणीवाद्याने आपल्या स्वभावाला जागून एक मोठा विश्लेषणात्मक निबंध वादग्रस्त विधानकाराचं लटकं समर्थन करत फेसबूकवर लिहिला. अशी उथळ प्रतिक्रिया देण्यात हा वीर पटाईत. त्याला बापट सरांनी खडसावून विचारलं की त्या ज्ञानपीठकाराचं समर्थन इतकं करण्याची व्याकुळता लागण्याचं कारण तू सुध्दा ज्ञानपीठ मिळवण्याची लॉबी लावलीय काय? हे विचारल्यावर तो कोकणी समर्थक घाबरला व त्याने माफी मागून मी काहीच लिहीत नाही अशी घोषणा तिथं करून आरंभशूरपणा, अभ्यासपूर्व वृत्ती तिथं दाखवून दिली आणि आणखीन एकदा स्वतःचं हसं करून घेतलं. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: ज्याअर्थी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी हा विषय काढला, त्याअर्थी दिगंबर बाबांना मंत्रिपदापासून दूर तर ठेवायचे नसेल ना?
खरी कुजबुज: ...आणि रवींच्या बॅनरवर अवतरले ‘कमळ’!

बोला फुलाला गाठ?

मडगावातील हॉस्‍पिसियो इस्‍पितळातील रुग्‍णवाहिकांची कमतरता यावर मडगावचे युवा नेते प्रभव नायक यांनी आवाज उठविला होता. त्‍याशिवाय मडगावच्‍या या जिल्‍हा इस्‍पितळात पुरेशा सुविधा नाहीत याकडेही त्‍यांनी लक्ष वेधले होते. मडगावातील काही प्रतिष्ठित नागरिकांच्‍या सह्या असलेले एक निवेदनही शुक्रवारी त्‍यांनी आरोग्‍यमंत्र्यांच्‍या कार्यालयात दिले होते. त्‍यानंतर अवघ्‍या २४ तासांत आरोग्‍यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मडगावच्‍या जिल्‍हा इस्‍पितळाचा दर्जा वाढविणार अशी घोषणा करतानाच या इस्‍पितळासाठी पुरेशा रुग्‍णवाहिका उपलब्‍ध करून देणार असे जाहीर केले. त्‍यानंतर लगेच प्रभव नायक यांनी एका ट्विटद्वारे आरोग्‍यमंत्र्यांचे आभारही मानले. आरोग्‍यमंत्र्यांनी केलेली ही घोषणा आणि त्‍यापूर्वी प्रभव नायक यांनी दिलेले निवेदन याचा एकमेकांशी काही संबंध आहे का? की या दोन्‍ही घटना म्‍हणजे बोला फुलाला पडलेली गाठ असे म्‍हणायचे? की यामागे आणखीही काही राजकारण आहे? ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com