
फोंडा: कुर्टी-म्हाळसे परिसरात वनविभागाच्या गस्तीदरम्यान खैर लाकडांची मोठी तस्करी उघडकीस आलीये. २६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास, वनविभागाचे कर्मचारी गवळीवाडा म्हाळसे-कुर्टी येथे गस्त घालत असताना, त्यांना सरकारी वनक्षेत्राजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या. बारकाईने पाहणी केल्यानंतर, GA-04-T-6515 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या टाटा इंट्रा रिक्षा-चारचाकीमध्ये ०.७२० घनमीटर खैर लाकडांचे ओंडके आढळले.
फोंड्यात कुर्टी या भागात अशी संशयास्पद घटना आढळून आल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वाहनातील लोकं पळून गेले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी देखील मागे न फिरता त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला, यात तिघांना पकडण्यात आले. वन अधिकारांच्या कारवाईत हाती लागलेल्या तस्करांची नावे रामू कोनु शेळके, विटू मोलू शिंदे आणि विटू नवू पाटकारे अशी आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार हे तिघे कारवार, कर्नाटकचे रहिवासी आहेत.
तसेच, बाबू विठ्ठल जोशी नावाचा व्यक्ती बजाज पल्सर दुचाकीसह घटनास्थळी आढळून आला होता. जवळच्या परिसरात याबद्दल तपासणी केली असता चाव्या नसलेली एक बेवारस दुचाकी अधिकाऱ्यांना सापडली आहे.
या घटनेची माहिती तातडीने बीट गार्ड संदेश घाष्टी यांना देण्यात आली. GA-04-T-6515 क्रमांकाचे वाहन आणि खैर लाकडांचे ओंडके ढवळी फोंडा येथील वनविभागाच्या कार्यालयात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. KA-31-EF-0132 आणि GA-04-J-2973 क्रमांकाच्या दुचाकी जवळच्या स्थानिक नागरिक जीवन खेडेकर यांच्याकडे जमा करण्यात आल्या आहेत.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वनविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. खैर लाकडांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. या तस्करीमध्ये आणखी कोण सहभागी आहे, याचा शोध घेतला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.