Goa Politics: खरी कुजबुज: चर्चिलनाही वेध स्‍वगृही परतण्‍याचे!

Khari Kujbuj Political Satire: भंडारी समाज सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिला आहे. या समाजात सध्या अनेक स्वयंभू नेते तयार झाले आहेत.
Khari Kujbuj
Khari KujbujDainik Gomantak
Published on
Updated on

चर्चिलनाही वेध स्‍वगृही परतण्‍याचे!

मागच्‍या विधानसभा निवडणुकीत ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसला आलिंगन दिलेले बाणावलीचे माजी आमदार आणि माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांना या राजकीय बदलाचा काहीच फायदा झाला नाही. तृणमूल काँग्रेसकडून लढताना त्‍यांनी व त्‍यांची कन्‍या वालंका या दोघांनीही आपटी खाल्‍ली. त्‍यानंतर चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल काँग्रेसला दोष देताना या पक्षाची उमेदवारी घेतल्‍यामुळेच आपल्‍याला पराभव स्वीकारावा लागला असे सांगून सर्व दोष तृणमूलच्‍या डोक्‍यावर थापला. मात्र आता चर्चिल यांनाही काँग्रेस पक्षात प्रवेश करण्‍याचे वेध लागले आहेत असे सांगण्‍यात येते. चर्चिल आलेमाव यांनी त्‍यासाठी दिल्‍लीतील आपले कॉन्‍टेक्‍टस्‌ वापरण्‍यास सुरुवात केली आहे. चर्चिलचे हे मनसुबे कामयाब होतील का? हे आता येणारे २०२५ सालच स्‍पष्‍ट करेल. ∙∙∙

भंडारी समाजातील राहू-केतू सक्रिय!

भंडारी समाज सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिला आहे. या समाजात सध्या अनेक स्वयंभू नेते तयार झाले आहेत. परंतु काही काळापासून या समाजात राहू-केतूचा असणारा वावर चर्चेत राहिला होता. त्यांच्या सांगण्याने यापूर्वी राजकीय पक्ष काढण्यासाठी काहीजण सरसावले होते, पण हात-पाय पोळायच्या आत त्यांना त्याची उपरती झाली. आता हे राहू-केतू आमदारांच्या दारोदारी हेलापाटे घालत आहेत. त्यामागेही त्यांचा काहीतरी स्वार्थ असल्याची चर्चा आता समाजात सुरू आहे. म्हणे रुद्रेश्वर देवस्थानची रथयात्रा काढावयाची आहे आणि त्या रथयात्रेला ही आमदार मंडळींना कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लावावी, म्हणून त्यांचा खटाटोप सुरू आहे. मात्र, यामागे केवळ आमदारांचीच उपस्थिती नव्हे तर त्यामागे ते दोघे आपले इप्सित साध्य करणार एवढे नक्की, असे आता समाजातील धुरिणींना वाटत आहे. ∙∙∙

रेजिनाल्‍डचे स्‍वप्‍न पूर्ण होणार का?

आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स हे चारवेळा कुडतरी मतदारसंघातून आमदार म्‍हणून निवडून आले. त्‍यातील दोन टर्म सत्ताधारी गटाबरोबर होते. पण तरीही त्‍यांना कधीच मंत्रिपद मिळाले नाही. यावेळी त्‍यांनी मोठ्या उमेदीने सत्ताधारी भाजपला पाठिंबा दिला होता. मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी कित्‍येकवेळा रेजिनाल्‍ड आपले चांगले मित्र असा उल्‍लेख केला. पण त्‍यांना मंत्रिपद मात्र कधीही दिले नाही. याचीच खंत सध्‍या रेजिनाल्‍ड यांना सतावते. २०२४ मध्‍ये त्‍यांची मंत्री होण्‍याची मनीषा काही पूर्ण झाली नाही. आता २०२५ साली त्‍यांच्‍या मनातील ही सुप्‍त इच्‍छा पूर्ण होईल का?

फोंडा शहरातील ‘पे-पार्किंग’ रखडले!

फोंड्यातील ‘पे-पार्किंग’ सध्या सार्वजनिक बांधकाम खात्यामुळे अडले आहे. पालिकेने सगळे काही केले आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सूचना फलक आणि इतर काही बाबी पूर्ण केलेल्या नाहीत, त्यामुळे ‘पे-पार्किंग’ अडकले आहे. यासंबंधी खुद्द नगराध्यक्षच बोलले. ते म्हणाले, ‘पे-पार्किंग’ आम्ही जानेवारीच्या सुरुवातीला करणार असे जाहीर केले होते, पण काही बाबी अजून पूर्ण झालेल्या नाहीत, त्यामुळे हे काम जरा पुढे गेले आहे. फोंडा शहर परिसरातील वाहनांच्या पार्किंगचा शिस्त यावी यासाठी ‘पे-पार्किंग’ करण्यात येत असून पालिकेचे महसुलावर लक्ष नाही तर शिस्त महत्त्वाची आहे, असे नगराध्यक्षांनी सांगितले. ∙∙∙

पणजीत धुळीचा आरोग्याला फटका!

स्मार्ट सिटी तसेच मलनिस्सारणाच्या कामासाठी पणजी शहरामध्ये खोदकाम सुरू आहे. वारंवार करण्यात येत असलेल्या या खोदकामामुळेही लोक कंटाळले आहेत. शहरातील कोणता रस्ता कधी खोदला जाईल, याचा नेम नाही. त्यामुळे लोकांना वाहन घेऊन येताना उद्या कोणता रस्ता बंद असेल याचा विचार करतच यावे लागते. या खोदकामासंदर्भात आगाऊ कल्पना दिली जात नाही. कंत्राटदारावर कोणाचेच नियंत्रण नसल्याने सर्व काही आलबेल सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कंत्राटदाराचे पर्यवेक्षकही नसतात. फक्त मजूर त्या ठिकाणी असतात व त्यांना कंत्राटदार कोण आहे? हे सुद्धा माहीत नसते. गेल्या चार - पाच वर्षापासून शहरात अनेक ठिकाणी डांबरीकरण केलेले रस्ते खोदले जातात. नियोजनशून्य प्रकारामुळे लोकांना त्याचा मात्र नाहक त्रास सहन करण्याची पाळी येत आहे. या धुळीमुळे अनेकांना श्‍वसनाचा आजार होऊ लागला आहे. शहराचा विकास होण्यासाठी लोकांना थोडा फार त्रास सहन करावा लागणार असे स्पष्टीकरण आमदार देऊन मात्र मोकळे होतात. हे खोदकाम कधी कायमचे पूर्ण होणार की असेच सुरू राहणार असा प्रश्‍न लोकांना पडत आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Tourism: पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरवली तर ती नागरिकांसाठी आनंदाची बातमी का असते?

बापरे, २८ पोलिस अधीक्षक!

पोलिस खात्यात नव्या सहा अधीक्षकपदांना सरकारने मंजुरी दिली आहे त्यामुळे सध्या पोलिस उपअधीक्षक पदावर असलेल्यांना अधीक्षक होण्याची स्वप्ने दिसू लागली आहेत. गोवा हे छोटे राज्य असूनही सध्या २२ पोलिस अधीक्षक आहेत व त्यात आणखी ही ६ पदे भर पडल्यावर ती संख्या २८ होणार आहे. शेजारील राज्यात असलेल्या जिल्ह्याच्या तुलनेत गोवा राज्य छोटे आहे. ज्या ठिकाणी एक पोलिस अधीक्षक जिल्ह्यात असतो तेथे गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी २८ अधीक्षक आहेत. एकिकडे सरकारने दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांच्या लाभार्थ्यांची संख्या सिमित केली आहे. या योजनेवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने ही संख्या मर्यादित केली आहे. मात्र नव्या पोलिस अधीक्षक व उपअधीक्षक पदे भरण्यासाठी तिजोरीत सरकारकडे पुरेसा निधी आहे. सरकारच्या विविध योजना आहेत. मात्र त्यातून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर मिळत नाही. या ज्येष्ठ नागरिकांना मात्र बँकांमध्ये हेलपाटे मारावे लागतात ही वस्तुस्थिती आहे. ∙∙∙

Khari Kujbuj
Goa Tourism: दिलासा! गोव्यात तुडुंब गर्दी; शॅकमालक सुखावले

सात महिन्यांनी तालांव!

‘सदैव तत्पर’ हे पोलिसांचे ब्रिद असते. मात्र आपल्या वाहतूक पोलिसांची गाडी कासवगतीने चालते, याचा अनुभव आता जनतेला यायला लागला आहे. उत्तर गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक कार्यालयातून सासष्टीतील एका वाहन चालकाला सात महिन्यांनी तालांव मिळाला असून जो तालांव (दंड) पाठविण्यासाठी पोलिसांना सात महिने वेळ घ्यावा लागला. तो दंड भरण्यासाठी पोलिसांनी वाहन चालकाला केवळ सात दिवसांची वेळ दिली आहे. दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयाजवळ वाहन धोकादायक पार्क केल्याचे कारण सांगून उत्तर गोवा वाहतूक पोलिसांनी सात महिन्यांनी तालांव पाठविला. हा तालांव सात दिवसांच्या आत पणजी वाहतूक पोलिसांत भरण्याचे फर्मान काढले आहे. बिचाऱ्या वाहनचालकाला कामधाम सोडून पाचशे रुपये भरायला पणजीला खेप मारावी लागली. पाचशे रुपये दंडाचे आणि हजार रुपये पणजीला जायचे, म्हणजे लहानशा चुकीसाठी त्या माणसाला दीड हजार रुपये खर्च तर करावा लागलाच आणि एक सुटीही गमवावी लागली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com