

अवित बगळे
पणजी: कदंब वाहतूक महामंडळाच्या इतिहासात प्रथमच महिला बसचालकाची निवड झाली आहे. डिचोली येथील पूजा वायंगणकर यांची बसचालक पदासाठी निवड झाली असून, नव्याने भरती करण्यात आलेल्या १०० चालकांमध्ये त्या एकमेव महिला आहेत. महामंडळाचे अध्यक्ष उल्हास नाईक तुयेकर यांनी ही माहिती दिली.
पूजा वायंगणकर यांना बेळगाव येथून ट्रकमधून भाजी वाहतूक करण्याचा अनुभव आहे. वैद्यकीय व पोलिस प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर त्यांना नियुक्तिपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे कदंबच्या बसचे स्टेअरिंग प्रथमच महिलेच्या हाती येणार आहे.
कदंबच्या नव्या भरती मोहिमेत सुमारे ३६० कर्मचाऱ्यांची निवड झाली आहे. त्यात २५० वाहक, १०० चालक आणि १० वाहतूक नियंत्रकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वाहतूक नियंत्रक पदावरही प्रथमच महिलांना संधी देण्यात आली आहे.
वाहतूक नियंत्रकांकडे बसच्या वेळापत्रकाचे नियोजन, बस सुटण्याच्या वेळेवर देखरेख, आगारातील शिस्त तसेच प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असते. नव्या कर्मचाऱ्यांना वेळापत्रक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कर्नाटकातील उत्तर पश्चिम कर्नाटक परिवहन महामंडळाकडून कदंबच्या वाहतूक नियंत्रक आणि सहाय्यक वाहतूक निरीक्षकांना हे प्रशिक्षण दिले जात आहे.
सध्या ४० हून अधिक महिला वाहक
कदंब वाहकांच्या ताफ्यात यापूर्वीपासून महिलांचा सहभाग आहे. नव्या भरतीत किमान १० महिला वाहकांचा समावेश झाला असून, सध्या ४० हून अधिक महिला वाहक कार्यरत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.