मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना मंत्रिमंडळात जरी स्थान मिळाले नसले तरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मांद्रे मतदारसंघावर लक्ष असल्याने विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
आरोलकर यांच्या आमदारकीच्या एका वर्षाच्या कारकिर्दीत तब्बल दोनशे कोटींहून जास्तीचा निधी वापरून विकास कामे सुरू आहेत आणि याला आमदार आरोलकर यांनी दुजोरा दिला.
विरोधी पक्षाचा आमदार असताना विकास होत नाही, असा काहींचा समज आहे. त्यात तथ्यही असेल, परंतु मांद्रे मतदारसंघातील जनतेने सरकारच्या बाजूने कौल न देता आरोलकर यांच्या बाजूने कौल देत आमदारकी त्यांना बहाल केली. तेव्हाच विकासाला खो बसेल, असा समज मांद्रेवासीयांचा झाला होता. मात्र, तो आमदार आरोलकर यांनी कामांचा धडाका लावल्याने फोल ठरला.
मांद्रेत भूमिगत वीज वाहिनीसाठी शंभर कोटीहून जास्तीचा निधी खर्चला जात आहे. शिवाय 52 कोटी खर्चून मांद्रे जुनसवाडा नवीन वीज उपकेंद्र येथे उभारले जात आहे.शिवाय मोरजी फिल्डर पर्यंत भूमिगत वीजवाहिनीसाठी 18.65 कोटी रुपये खर्चण्यात येत आहेत.
शिवाय मांद्रेत भूमिगत वीजवाहिनीसाठी 24.6 कोटी रु. खर्च करण्यात येत आहेत. शिवाय मालपे इथून तुये पर्यंत 6.42 कोटी खर्चण्यात येत आहेत,अशी माहिती आमदार आरोलकर यांनी दिली.
तुयेत जलप्रकल्पाची प्रक्रिया सुरु
मांद्रे मतदारसंघातील पाणीप्रश्न सध्या गंभीर आहे. चांदेल प्रकल्पातून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने समस्या उद्भवली आहे. भविष्यातही ही समस्या भेडसावू नये, त्यादृष्टीने 68 कोटी खर्चून तुये येथे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीची प्रक्रिया सुरू आहे.
केरी येथील आजोबा मंदिर परिसरातील किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात दर पावसाळ्यात आणि भरतीच्या वेळी धूप होते. त्यामुळे किनाऱ्याला संरक्षण देण्यासाठी ट्रेट पॉट द्वारे 8 कोटी रुपये खर्चून या कामाची सुरुवात केलेली आहे.
"मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सर्व मंत्र्यांच्या सहकार्यामुळे विकासकामांना निधी मिळत आहे. भविष्यात तुये येथील इलेक्ट्रॉनिक सिटी तसेच पाणी प्रकल्प मार्गी लागेल. तसेच पेडणेत रवींद्र भवनाचे लवकरच भूमिपूजन होईल. मांद्रे येथे पोलिस स्टेशन, अग्निशमन दलाचे कार्यालय, याही योजना मार्गी लागतील."
- जीत आरोलकर, आमदार मांद्रे
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.