
डिचोली: गर्दीचे ठिकाण मग ते कोणतेही असो तेथे जमाव हाताळणारी सक्षम यंत्रणा असणे आवश्यक असते. त्यावेळी भक्त व इतर लोक असा भेदभाव करता येत नाही. जमावाला शिस्त घालता येत नसेल तर चेंगराचेंगरी होणे हे ठरून गेलेलेच असते, असे माजी अग्निशमन अधिकारी गोपाळ भिसो शेट्ये यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. त्यांना अग्निशमन दलात काम करण्याचा ४० वर्षांचा अनुभव आहे, विशेष म्हणजे शिरगावलगतच्या डिचोली येथेही त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे.
फक्त शिरगाव जत्रोत्सवच नव्हे तर गोव्यातील भाविकांची गर्दी बघता गावागावांत भरणाऱ्या जत्रांबरोबरच जांबावली गुलाल, फातर्पे जत्रा (सलग ९ दिवस), चंद्रनाथ जत्रोत्सव पारोडा-केपे अशा प्रमुख व नावाजलेल्या उत्सवात अग्निसुरक्षेबरोबरच दुकानांचे, भाविकांचे (गर्दी) व्यवस्थापन या गोष्टी महत्त्वाच्या असतात. ज्यात तात्पुरता वीजपुरवठा, स्वयंपाक गॅस हे प्रमुख विषय असतात. त्यामुळे त्या-त्या ठिकाणी पुरेशी रंगीत तालीम घेणे आवश्यक असते, त्यातून त्रुटी दिसू शकतात.
अग्निशमन दलाची भूमिका समन्वयाची असते. अग्निसुरक्षेचे उपाय सुचवले तरी दल दबाव टाकू शकत नाही. तरी आपत्कालीन व्यवस्थापन, पोलिस आणि इतर घटकांनीही यावर लक्ष देणे तितकेच गरजेचे असते. कारण व्यक्ती सुरक्षेला प्राधान्य देणे महत्त्वाचे असते.
खरेतर प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवक असावेत जे आपत्कालीन परिस्थितीत दलाला उपयुक्त ठरतील; पण याबाबतीत मात्र अंधार आहे. कारण साधारण २०१२ मध्ये दलाने काही ग्रामीण तालुके (पेडणे, डिचोली, सत्तरी) लक्षात घेऊन दलाच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते; पण प्रतिसाद निराशाजनक होता.
खरेतर अग्निशमन दलाच्या संपर्कात कोणी आले तरी दलाला एकावेळी अग्निशमन आणि आणीबाणीच्या घटना सांभाळताना यावर लक्ष द्यावे लागते. त्यामुळे अधिकारी आणि जवान, यंत्रसामग्री यावर बंधने येतात. वाईटातील वाईट स्थिती काय असू शकते याचा अंदाज अंमलबजावणी यंत्रणेला असणे आवश्यकच असतो. त्यानुसार धोका टाळण्यासाठी पावले टाकणे ठरवता येते.
वरील सगळ्या यंत्रणा एकत्र बैठकीत आल्या तरी अग्निशमन दलाच्याही काही जबाबदाऱ्या आहेत, यावर बैठकीतील ज्येष्ठ अधिकारी लक्ष देत नाहीत, असा माझा अनुभव आहे. कित्येक वेळा प्रत्यक्ष दुर्घटनेवेळीही मदतीवर लक्ष केंद्रित करून या लोकांची मनधरणी करावी लागते. त्याचबरोबर आवश्यक मदत जमवताना तुम्ही इथे फोन करायला आलात की मदत करायला, अशी बोलणी खावी लागतात. पण आशुतोष आपटे, नीना नाईक गोलतेकर, दशरथ रेडकर, सुधीर केरकर, कै. सुदिन नातू हे अधिकारी म्हणजे आपत्काळात अगदी तरबेजपणे सहकार्य करतात, असा अनुभव आहे.
अशा गर्दीच्या ठिकाणी आपापली जबाबदारी घेत, हजर असलेल्या पोलिस यंत्रणेची मदत घेत, त्यांच्या सूचनांचे पालन करत (वाहने चालवताना आणि वाहनतळावर योग्य ठिकाणी लावताना) इतरांना आपल्यापासून तसदी पडणार नाही याचे भान ठेवले तरी कोणताही कार्यक्रम यशस्वी होतोच.
वार्षिक कार्यक्रमकर्त्यांनी महिनाभर अगोदर संबंधित यंत्रणेला कळवून प्रत्येकाकडून आलेल्या सुरक्षाविषयक सूचनांवर काम करावे. आठवडाभर आधी सुरक्षा सूचनांवर किती अंमलबजावणी झाली याचा लेखाजोखा सादर करावा. शिवाय येणाऱ्या भाविक जनतेला वारंवार सहकार्याचे आवाहन करत आपापले कार्यक्रम कोणतेही गालबोट न लागता पार पाडावेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.