Goa Stampede: लईराई जत्रोत्सवात योग्य काळजी घेतली असती तर..? गोव्यातील वाढते घात-अपघात ही ज्वलंत समस्या

Lairai Jatra Stampede: देवी लईराईच्या जत्रोत्सवात अनेक समस्या आहेत. अनेक छोट्यामोठ्या दुर्घटनासुद्धा तिथे होऊन गेल्या आहेत. पण या घटनांकडे काणाडोळा केल्यामुळेच निरपराध भाविकांना जीव गमवावा लागला.
Lairai Jatra Stampede
Lairai Jatra StampedeDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

गेला आठवडा हा राज्यातील दुर्घटनांचा आठवडा म्हणून गणला जाईल यात शंकाच नाही. घात काय, अपघात काय यावर कहर म्हणून शिरगाव येथे झालेली ती भीषण दुर्घटना काय, सगळ्याच कशा अगदी मनाला व्यथित करून टाकणाऱ्या घटना.

तसे पाहायला गेल्यास गोव्यात घात-अपघातांची कधीच कमतरता नव्हती. राज्यात दर दिवशी सरासरी एक तरी अपघात घडतोच. या अपघातांमुळे अनेक युवक मृत्युमुखी पडले आहेत, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. खून मारामाऱ्यांची प्रकरणेही वाढत चालली आहेत. गेल्या आठवड्यात याचेच प्रात्यक्षिक परत एकदा बघायला मिळाले.

पण सोमवारी झालेला दोन बालकांचा अपघाती मृत्यू कोणत्याही सुजाण माणसाला व्यथित करून टाकणारा होता. त्याचप्रमाणे दारूच्या नशेत मेहुण्याने केलेला भाऊजीचा खून तसेच पाणी न दिल्याने पित्याकडून झालेला मुलीचा खूनही हादरवून टाकणारे होते.

आज राज्यात कायदा सुव्यवस्थेबरोबर नातेसंबंधाचे कसे धिंडवडे निघत आहेत याचा प्रत्यय आणून देणाऱ्या अशा या लाजिरवाण्या घटना. पण यावर कहर म्हणजे शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगराचेंगरीपोटी झालेले सहा भाविकांचे मृत्यू.

आता याला जबाबदार कोण, यावर चर्वितचर्वण होत राहीलच पण ज्यांचे मृत्यू झाले आहेत त्यांच्या नातेवाइकांचे नुकसान भरून येणे जवळजवळ अशक्यच. मुळात घात वा अपघातापोटी जे मृत्यू होतात ते अनपेक्षितच असतात. घराबाहेर गेलेला धडधाकट माणूस अपघातापोटी मृत्युमुखी पडणे हा त्यांच्या नातेवाइकांकरता जबर धक्का असतो. त्याचे पडसाद नंतर बराच काळ उमटत असतात. पण अजूनही प्रशासनाला अपघातांवर नियंत्रण ठेवता आलेले नाही हेही तेवढेच खरे.

Lairai Temple
Lairai TempleX

दीड वर्षांपूर्वी फोंडा तालुक्यातील बाणस्तारी येथे झालेल्या अपघातात तीन निरपराधांचा बळी गेला होता. त्यावेळी बाणस्तारी पुलावर, ‘अशी काळजी घेतली जाईल’, ‘तशी काळजी घेतली जाईल’ असे सरकारकडून आश्वासन देण्यात आले होते.

पण आता तिथे गेल्यास कोणताही धरबंध दिसत नाही. म्हणजे याचा अर्थ आणखी एखादा भीषण अपघात होईपर्यंत शासन डोळे बंद करून राहणार, असाच होऊ शकतो. आपण एखादी दुर्घटना झाली की जागे होतो. ’प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर’ या इंग्रजीतील उक्तीचा आपल्याला विसर पडला असावा असेच सध्या जे काही चालले आहे ते बघून वाटायला लागले आहे.

Lairai Jatra Stampede
Shirgao Stampede: तथ्य शोध समितीचा अहवाल; शिरगाव चेंगराचेंगरीत माजी उत्तर गोवा एसपी, जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीला धरले जबाबदार

आता शिरगावचे उदाहरण घ्या. शिरगावचा लईराई देवीचा जत्रोत्सव म्हणजे गोव्यातील पारंपरिक महत्त्व असलेला उत्सव. पण ज्या ठिकाणी हा उत्सव भरतो तिथे गेली कित्येक वर्षे अनेक समस्या आहेत. अनेक छोट्यामोठ्या दुर्घटनासुद्धा तिथे होऊन गेल्या आहेत.

पण या घटनांकडे काणाडोळा केल्यामुळेच गेल्या शनिवारी सहा निरपराध भाविकांना आपला जीव गमवावा लागला. आता मृतांच्या नातेवाइकांना भरपाई देणे, चौकशी समिती नेमणे, पुढील वर्षी प्रतिबंधात्मक उपाय योजणे, अशी पावले उचलण्याचे जाहीर झाले आहे.

Lairai Jatra Stampede
Lairai Jatra Stampede: श्री लईराईच्या जत्रोत्सवातील दुर्घटनेचे 'गांभीर्य' खरंच कळले आहे का?

पण आधीच जर काळजी घेतली असती तर अशी भीषण दुर्घटना झाली नसती. शेवटी सगळ्यात महत्त्वाचा असतो तो जीव, हे विसरता कामा नये. कितीही पैसे दिले वा कितीही शब्दांचे बुडबुडे फोडले तरी गेलेल्या जिवाचे मूल्य होत नसते. आता मुख्यमंत्र्यांनी अपघात रोखण्याकरता एक ठोस अशी उपयोजना तयार करण्याचे जाहीर केले आहे. तिचे स्वागत करत असताना ही योजना म्हणजे अपघातांकरता स्वल्पविराम न ठरता पूर्णविराम ठरेल, अशी आशा करूया.

सध्या राज्यात बेकारीइतकीच वाढते घात-अपघात ही ज्वलंत समस्या बनली आहे. त्याचकरता एखाद्या भीषण दुर्घटनेची वाट न पाहता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे अपघात रोखण्याची मोहीम अमलात आणल्यास तसेच होणाऱ्या घातांवर नियंत्रण आणण्याकरता राज्यातील कायदा सुव्यवस्था काटेकोरपणे राबवल्यास नागरिक सुखाने श्वास घेऊ शकतील, एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com