
पणजी: गोवा सरकार लवकरच राज्यातील सर्व समुद्रकिनारे आणि सार्वजनिक इमारती (Public Buildings) दिव्यांगांसाठी अधिक सुलभ बनवण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी (9 ऑक्टोबर) आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2025 (International Purple Fest 2025) या कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. हा महोत्सव गोव्यामध्ये आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून 'समावेशक गोवा, समावेशक भारत' (Inclusive Goa, Inclusive Bharat) हा संदेश अधिक दृढ होत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पर्पल फेस्ट 2025 मध्ये बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांबाबत आणि त्यांना समाजात समान संधी देण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "गोवा केवळ पर्यटनासाठीच नाही, तर समावेशक विकासासाठी (Inclusive Development) देखील ओळखला जावा, यासाठी आमचे सरकार प्रयत्नशील आहे."
पर्पल फेस्टसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमुळे दिव्यांग व्यक्तींच्या समस्या आणि त्यांच्या गरजांकडे समाजाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधले जाते. या महोत्सवात जगभरातील आणि देशभरातील दिव्यांग व्यक्ती सहभागी होतात.
राज्यात अनेक सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांना अडथळे येतात. विशेषतः, गोव्याची ओळख असलेल्या समुद्रकिनाऱ्यांवर व्हिलचेअर वापरणाऱ्यांसाठी वावरणे कठीण होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकार टप्प्याटप्प्याने (Phase by Phase) गोव्यातील प्रमुख समुद्रकिनारे दिव्यांग-सुलभ बनवणार आहे. यासोबतच, सर्व शासकीय कार्यालये, रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था यांसारख्या सार्वजनिक इमारतींमध्ये आवश्यक रॅम्प (Ramps), लिफ्ट्स (Lifts) आणि इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील.
दरम्यान, या उपाययोजनांमुळे दिव्यांग व्यक्तींना कोणत्याही अडथळ्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी प्रवास करणे आणि सरकारी सेवांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. 'आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट'च्या माध्यमातून गोव्याने सर्वसमावेशकतेचा संदेश देशभरात दिला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.