डिचोली: श्रावण मासारंभा (Shravan) बरोबर डिचोलीत (Bicholim) फुलांचा (Flowers) बाजार फुलला असून, आता डिचोलीत फुलांना मागणी असल्याचे चित्र दिसून येत आहे. श्रावण मासारंभालाच पहिल्या श्रावणी सोमवारी काल डिचोली बाजारात फुलांना प्रचंड मागणी होती. काल एकाच दिवशी बाजारात जवळपास एक टन फुलांची विक्री झाल्याचा अंदाज आहे. फुलांना मागणी असल्याने फूल बाजारातील वातावरणही खुलून उठले असून, फुलांना 'अच्छे दिन' आल्याचे संकेत मिळत आहेत. (Increase in sales of flowers in Bicholim)
'कोविड' महामारीनंतर बऱ्याच काळानंतर फुलांचा खप वाढल्याने फूल विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही किंचितसे हास्य फुलू लागले आहे. येत्या चतुर्थीपर्यंत फुलांना मागणी कायम राहणार असून, पुढील आठवड्यापर्यंत फुलांना तेजी येण्याचे संकेत मिळत आहे. विक्रेत्यांनाही तसा विश्वास असला, तरी फुलांची तेवढीच उपलब्धता होणे गरजेचे आहे. असे मत फूल विक्रेते व्यक्त करीत आहेत. नाही म्हटले तरी मागील काही महिन्यांपासून डिचोलीत फुलांचा बाजार सुरु झाला असला, तरी लग्न आदी शुभकार्ये आणि ठराविक सणावेळीच फुलांना मागणी असायची. मात्र आता फुलांचा नियमित खप होण्याचे संकेत मिळाले आहेत. श्रावण महिन्याच्या काल पहिल्याच दिवसांपासून फुलांची समाधानकारक विक्री झाल्याचे बाजारातील काही महिला फूल विक्रेत्यांनी सांगितले.
सण, उत्सवांचा महिना
श्रावण म्हणजे सण, उत्सवांचा महिना. हिंदू संस्कृतीत या महिन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. या महिन्यात विविध देवस्थानांसह बहूतेक घरोघरी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु असते. नागपंचमी, नारळीपौर्णिमा, अष्टमी आदी सणही याच महिन्यात येतात. त्यामुळे साहजिकच श्रावण महिन्यात फुलांना प्रचंड मागणी असते. कालपासून डिचोलीत फुलांच्या बाजारात ग्राहकांचा गजबज वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
फ़ुलांचे दर वाढण्याचे संकेत.
सध्या डिचोलीत कर्नाटक राज्यातून झेंडू, शेवंती, लहान गुलाब या ठराविक फुलांची आवक होत असून, स्थानिक जाईची फुलेही बाजारात उपलब्ध होत आहेत. या फुलांना सध्या मागणी आहे. सध्या झेंडू फ़ुलांचे दर 100 ते 120 रूपये किलो असे आहेत. तर सफेद शेवती, लांब देठाची शेवती आणि लहान गुलाब 280 ते 300 रुपये किलो याप्रमाणे विकण्यात येत आहेत. फुलांच्या हारांनाही प्रचंड मागणी आहे. आकाराप्रमाणे 40 रुपयांपासून पुष्पहार विकण्यात येत आहेत. फुलांचा तुडवडा निर्माण झाल्यास फुले महागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
चतुर्थी काळात तेजी येणार
सध्या बाजारात फुलांना पुन्हा चांगले दिवस आले आहेत. चतुर्थीपर्यंत ही स्थिती अशीच राहणार आहे. 'कोविड'ची स्थिती नियंत्रणात राहिल्यास आणि बाजारावर निर्बंध न आल्यास चतुर्थी काळात फुलांचा खप वाढणार असून, दरही वाढण्याची शक्यता आहे. फुलांच्या उपलब्धतेवर दर निश्चित होणार आहेत.
-अनुज नार्वेकर, घाऊक विक्रेता, डिचोली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.