
सासष्टी: सध्या झेंडू फुलांची मागणी वाढलेली आहे. ही फुले इतर राज्यातून येतात. गोव्यातील या फुलांसाठीची मागणी पूर्ण व्हावी, या हेतूने कृषी खात्याने झेंडू फुलांच्या लागवडीवर जोर देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ही माहिती कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई यांनी दिली आहे.
गोव्यात या फुलांची लागवड कमी प्रमाणात होत असल्याने गोमंतकीयांना इतर राज्यातील पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे स्वयंपूर्ण गोव्याची संकल्पना लक्षात घेऊन कृषी खात्याने झेंडू फुलांच्या लागवडीवर जास्त लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे, असे फळदेसाई यांनी सांगितले आहे.
कृषी खात्यातर्फे शेतकऱ्यांना तांत्रिक सहकार्यास आर्थिक अनुदान, मार्केट व्यवस्था केली जाते. गत वर्षी २५९ शेतकऱ्यांना १.१४ कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले अशी माहिती फळदेसाई यांनी दिली. केपे तालुक्यातील १५६ शेतकऱ्यांना ३.५३ लाख रुपये तर वाळपई येथील सहा शेतकऱ्यांना १.९३ लाख रुपये अनुदान देण्यात आले.
२०२४ साली ४०० शेतकऱ्यांनी ३२ हेक्टर जमिनीत १८२ टन झेंडू फुलांचे उत्पादन केले अशी माहिती देण्यात आली. झेंडूच्या लागवडीसाठी कृषी खात्यातर्फे ७५ टक्के अनुदान किंवा प्रति हेक्टर ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येते.
आता चतुर्थीनंतर दिवाळी, दसरा या सणासाठी झेंडूच्या फुलांची मागणी वाढणार आहे. माजी कृषी संचालक नेविल आफोंसो यांनी सांगितले की, गोव्यात ५५० ते ६०० मेट्रीक टन झेंडू फुलांची गरज भासते.
तीन वर्षांत २३.७७ कोटी फुलांची आयात
गत तीन वर्षांत गोव्यात २३.७७ कोटी रुपयांची फुलांची इतर राज्यांतून आयात करण्यात आली आहे, ही माहिती विधानसभेच्या अधिवेशनात कृषी मंत्री रवी नाईक यांनी फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. २०२२-२३ साली गोव्यात ६.२३ लक्ष मेट्रीक टन फुलांची आयात करण्यात आली. त्याची किंमत ३.१८ कोटी रुपयांवर पोहोचते.
२०२३-२४ साली ८.४२ कोटी रुपये खर्चून १७.०५ लक्ष टन फुलांची आयात करण्यात आली. २०२४-२५ वर्षात ९.९६ कोटी रुपया खर्चून ३.७८ लाख टन फुलांची आयात करण्यात आली अशी माहिती देण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.