
मडगाव: मुंगूल येथे मंगळवारी पहाटे गँगवाॅरमध्ये दोन युवकांवर जो जीवघेणा हल्ला झाला, त्यामागे दाेन वर्षांपूर्वी कोलवा सर्कल परिसरात झालेल्या मारहाणीचा संबंध असल्याचे सांगितले जात असले, तरी हा हल्ला फक्त मारहाणीचा बदला घेण्यासाठी की दक्षिण गोव्यावर वॉल्टर गँगने स्थापित केलेले वर्चस्व संपविण्यासाठी, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
मुंगूल हल्ल्यानंतर गोव्यातील संपूर्ण अंडरवर्ल्ड पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे सांगितले जाते. मंगळवारी पहाटे हा सिनेस्टाईल हल्ला झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत आठजणांना अटक केली, त्यात रसूल शेख, शाहरूख शेख, विल्सन कार्व्हालो, महंमद अली, वासू कुमार, सूरज माजी, गौरांग कोरगावकर, मलीक शेख यांचा समावेश आहे.
सुडाची आग स्वस्थ बसू देईना!
सध्या जी माहिती पुढे आली आहे, त्यानुसार दाेन वर्षांपूर्वीच्या मारहाणीचा बदला घेण्यासाठीच मंगळवारी पहाटे हा फिल्मीस्टाईल हल्ला करण्यात आला. यापूर्वी मुंगूल परिसरातच वॉल्टर गँगकडून गोव्यातील अंडरवर्ल्डमध्ये असलेले कुख्यात गुंड विजय कुलाल आणि इम्रान बेपारी या दोघांना वॉल्टर गँगकडून मारहाण झाली होती.
जय कुलाल याला मारहाण करतानाचा व्हिडिओही संशयितांनी व्हायरल केला होता. यापूर्वी जी मारहाण झाली होती, त्या मारहाणीशी वॉल्टर गँगचा हात असल्याने तसेच काल ज्याला अटक केली, त्या विल्सन कार्व्हालो याच्यावरही कोलवाळ तुरुंगात स्थानबद्ध असताना वॉल्टर गँगच्या लोकांकडून हल्ला झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी हा सर्व प्लॅन रचण्यात आला होता, अशी माहिती खास सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
अन्वरनंतर वॉल्टरकडून हप्ता वसुली
दक्षिण गोव्यात पूर्वी कुख्यात गुंड अन्वर हा व्यावसायिकांकडून हप्ता वसुली करायचा. मात्र, अन्वरचा कर्नाटकात खून झाल्यानंतर दक्षिण गोव्यातील ही खंडणी बंद झाली होती. मात्र, आता अशा प्रकारची खंडणी वॉल्टर गँगकडून केली जायची.
यातूनच अधूनमधून गुंडांच्या गँगमध्ये खटके उडायचे. दक्षिण गोव्यात वॉल्टर गँगचा प्रभाव वाढत असल्यामुळे त्याचा प्रभाव कमी करण्यासाठीच गोव्यातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील चार गँग्स एकत्र येऊन त्यांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला केला असावा, अशी चर्चा आहे.
संशय वॉल्टरवर; पण
मारेकऱ्यांना त्या गाडीत वॉल्टरही असावा, अशी शंका आल्यामुळेच त्यांनी त्या गाडीचा पाठलाग केला. काेलवा-मुंगूल रोडवर युवकेशच्या गाडीला चार गाड्यांनी गराडा घालून हा हल्ला चढविला होता. हा हल्ला करण्यासाठी तीन ते चार गँग्सचे गुंड एकत्र आल्याचे सध्या सांगितले जाते.
जखमींकडून हस्तक्षेप याचिका
या हल्ल्याची पूर्वतयारी केपे आणि फोंड्यातून झाल्यामुळे काल रात्री पोलिसांनी केपे आणि फोंड्यात छापे टाकले होते. मात्र, या प्रकरणातील मुख्य संशयित तिथून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणात आपलीही बाजू ऐकून घ्यावी, यासाठी हल्ल्यात जखमी झालेले युवकेश सिंग आणि रफिक तशान यांच्याकडून न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे.
संशयितांना पाच दिवसांची कोठडी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय तलवार आणि राहुल तलवार हे दोघेही सध्या बेपत्ता आहेत. या हल्ल्यासाठी वापरलेली एक इनोव्हा आणि एक फ्राँक्स कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अटक केलेल्या संशयितांना पाच दिवसांच्या पोलिस कोठडीचा रिमांड देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.