मडगाव: रशिया-युक्रेन युद्धामुळे जगभरातील अनेक लोकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यात भारतीय नागरिकांचाही समावेश आहे. युक्रेनमध्ये फसलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून चालले आहेत. गोव्यातील काही विद्यार्थीही तेथे अडकले आहेत. बाणावली येथे राहणाऱ्या परेरा कुटुंबातील जेडन हा 19 वर्षीय विद्यार्थ्याने तर आपला जीव वाचविण्यासाठी मित्राच्या साहाय्याने बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करण्यात येत आहे.
मडगावपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या बाणावली येथील परेरा कुटुंबाने जेडन सुखरुप यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तो युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेला होता. अन्नाची कमतरता भासत असल्याने सध्या त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. सध्या या मुलाने आपल्या एका मित्राबरोबर एका बंकरमध्ये आश्रयघेतला आहे.
भारतीय दूतावासाकडून विद्यार्थ्यांना युक्रेनच्या पश्चिमी सीमेवर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या परिस्थितीत रस्त्यांवरुन फिरणंही जिथे कठीण आहे, तेथे सीमा कशी गाठायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. ठिकठिकाणी रशियाकडून हल्ले होत असल्याने रस्तेमार्गाने प्रवेश शक्यच नाही. तसेच रेल्वे स्थानकेही गर्दीने तुफान भरलेली असल्याने अडचणी वाढल्याचे जेडनची आई अनिता यांचे म्हणणे आहे. सध्या जेडन आपल्यासोबतच्या केरळ, तामिळनाडूमधील विद्यार्थ्यांसोबत हॉस्टेलखालील बंकरमध्ये लपून बसला आहे व सुटकेसाठी प्रार्थना करत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. तेथे अडकलेल्या मुलांच्या अन्य पालकांचीही स्थितीही परेरा कुटुंबियांसारखीच आहे.
16 तासांच्या प्रवासाचे आणखी एक आव्हान
जेडन हा रशियाचा सीमेपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या समी या शहरात राहतो. भारतीयांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यासाठी भारतीयांना कोणत्याही परिस्थितीत युक्रेन-रोमानिया सीमेवर पोचण्याचे आवाहन सरकारकडून केलं जात आहे. कारण तेथून त्यांना मायदेशी आणणं शक्य आहे. जेडन ज्या शहरात राहतोय, त्या शहरातून या सीमेवर पोहोचण्यासाठी जवळपास 16 तासांचा प्रवास करावा लागेल व ज्याचा रस्ताही युक्रेनची राजधानी कीवमधून जातो. त्यामुळे परेरा कुटुंबीय आणखीनच चिंतेत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.