
पणजी: उच्च शिक्षणास प्रवेश घेण्यासाठी जेईई, नीट यांसारख्या प्रवेश परीक्षा असतात, याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना देणे आवश्यक असते. अशी माहिती विद्यार्थ्यांना न देणाऱ्या शिक्षकांची कीव येते, अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांंनी शिक्षकांना फटकारले.
मुख्यमंत्र्यांनी आज ‘गोवा करिअर नेव्हिगेटर–२०२५’ या राज्यव्यापी करिअर मार्गदर्शन उपक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम गोवा शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि युनोक्यू यांच्या संयुक्त विद्यमाने कला अकादमी येथे आयोजित करण्यात आला होता.
उदघाटनप्रसंगी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर, परिषदेच्या संचालक मेघना शेटगावकर, तंत्र शिक्षण संचालक विवेक कामत, युनोक्यूचे धवल गांधी आदी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत इयत्ता ९वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन दिले जाणार आहे. लवकरच राज्यभरातील सर्व तालुक्यांमध्ये अशा प्रकारची करिअर मार्गदर्शन सत्रे घेण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, करिअरविषयी निर्णय न घेतल्यास जीवन व्यर्थ ठरेल. अभ्यासक्रमात करिअर हा विषय नाही याचा अर्थ त्याविषयी चर्चा करू नये, असा होत नाही. काही विद्यार्थी अभियांत्रिकी प्रवेशासाठी संपर्क साधत होते. त्यांना प्रवेशासाठी जेईई परीक्षा असते, हे माहीतच नव्हते, अशी माहिती विद्यार्थ्यांना देणे हे शिक्षकांचे कर्तव्य असते.
आमच्यावेळी म्हणजे १९९१ मध्ये ‘एमबीबीएस’ला प्रवेश मिळाला नाही तर ‘बीडीएस’ हाच एकमेव पर्याय होता. आता ‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’ असे पर्याय उपलब्ध आहेत. धारगळच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत निम्म्या जागा गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी आरक्षित आहेत. आज कुर्टी येथे न्यायवैद्यक शिक्षण मिळते. आंतरराष्ट्रीय कायदा संस्था आहे. फिजिओथेरपीचे शिक्षण दोन ठिकाणी मिळते. ही माहिती शिक्षकांना ठाऊक असेल का याविषयी शंका आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.