

भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवल्याच्या चर्चांमुळे तृणमूल काँग्रेसचा “गोवा अध्याय” आता पुस्तकातच राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकू येऊ लागली आहे. गोव्यात काही वर्षांपूर्वी मोठ्या थाटात एन्ट्री करणाऱ्या तृणमूल काँग्रेसने “आम्हीच पर्याय” असा सूर लावला होता. पण आता म्हणे परिस्थिती अशी झाली आहे, की “पर्याय” राहिला दूर, स्वतःचे अस्तित्व टिकवणेही कठीण झाले आहे. कारण राजकारणात विचारांइतकाच पैसा आणि पाठबळही लागते आणि जिथे मूळ गडच डळमळीत झाला, तिथे गोव्यातील पायाभरणी किती दिवस टिकणार? हा प्रश्न आता फिरतोय. त्यामुळे तृणमूल काँग्रेस खरोखरच निवडणुकीपासून दूर राहणार की शेवटच्या क्षणी पुन्हा एंट्री घेणार, यावर अंतिम शिक्कामोर्तब होईपर्यंत, ही चर्चा अशीच रंगत राहणार यात शंका नाही.
बंगाल, आसाम व पाँडिचेरी विधानसभा निवडणुकीचा निकाल बघून गोव्यातील काही काँग्रेस नेत्यांच्या मनात हा विचार येऊ शकतो. राज्यात भाजपाचे सरकार आहे. सरकारला ३३ आमदारांचे समर्थन आहे. देशात मोदी शहांची लाट आहे, अशा स्थितीत काँग्रेसच्या बुडत्या जहाजात राहून काय फायदा? असा विचार काँग्रेसी व इतर पक्षातील नेत्यांनी केल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही. मोदी यांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेस मुक्त भारत असा नारा दिला होता. भाजपाचे भगवे वादळ पाहता भाजपाचे वादळ त्याच दिशेने अग्रेसर होत आहे, अशी शंका येणे स्वाभाविक. आता पाहूया गोव्यातील विरोधी पक्ष नेते स्वतः वादळाशी जुळवून घेतात, की वादळाचा सामना करतात.
काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्य तसेच गोव्याचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना इलेक्टोरल पॉलिटीक्समध्ये अजून तरी नशिब आजमावता आलेले नाही. गोव्यात त्यांनी मडगाव व पणजीत विधानसभा निवडणुक लढवली होती, दोन्ही ठिकाणी ते हरले. त्यानंतर उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून ते पराभूत झाले. परंतू, कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे त्यांचे खास संबंध असल्याने त्यांना केंद्रिय समितीवर स्थान मिळाले. एवढेच नव्हे, तर उत्तर-पूर्वेतील काही राज्यांचे प्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले. आता तर ते दक्षिणेतील बलाढ्य अशा तामिळनाडू व पुडुचेरीचे प्रभारी होते. परंतु, तामिळनाडू आणि पुडुचेरीत कॉंग्रेसची कामगिरी अगदीच खराब झाली. त्यामुळे गिरीश विरोधातील गटात नक्कीच उकळ्या फुटलेल्या असणार आहेत. तर काहींनी गिरीश पुन्हा नापास झाले, असेही म्हणायला सुरुवात केली आहे म्हणे. ∙∙∙
आपल्या देशात शिक्षणाला उद्योग किंवा व्यवसाय मानले जात नाही, म्हणूनच शिक्षण देणाऱ्या शाळांची तुलना मंदिराशी केली जाते. दुर्दैवाने आज आधुनिक जगात शिक्षणाला व्यवसायाचे उद्योगाचे स्वरूप यायला लागले आहे. आपल्या गोव्यात शिक्षण हा फायद्याचा उद्योग म्हणतात, त्यात मोठे उद्योजक गुंतवणूक करायला लागले आहेत. राज्यात आता इंटिग्रेटेड उच्च माध्यमिक शाळांचे मोठे जाळे उभे राहायला लागले आहे. विज्ञान शाखांची अनेक इंटिग्रेटेड उच्च माध्यमिक विद्यालये उभी राहत आहेत. चार ते पाच लाख रुपये शुल्क भरून पालक आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनिअर बनण्यासाठी अशा इंटिग्रेटेड शाळेत प्रवेश घेताना दिसतात. सुमार पाच हजारांवर विद्यार्थी अशा संस्थांतून लाखो रुपये खर्च करून प्रवेश घेतात. यातील किती डॉक्टर होतात आणि किती इंजिनिअर होतात याचे संशोधन व्हायला नको का? ∙∙∙
गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक राजकारणांच्या वळचणीला कायम असतात. त्यांना ठाऊक असते, की कोणताही गुन्हा केला, तरी हे राजकारणी पोलिसांच्या आणि कायद्याच्या कचाट्यातून नक्कीच सोडवणार. राज्यात अनेक शहर परिसरात असे गुंड मवाली सापडतातच. आता फोंड्यातही हा प्रकार सरळ सरळ निदर्शनास येऊ लागला आहे. काही राजकारण्यांचे समर्थक म्हणवणारे हे गुंड प्रवृत्तीचे लोक बिनधास्त मान वर करून अशा राजकारण्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. पण बिचाऱ्या अशा राजकारण्यांना माहीत नसते, की या गुंडांमुळे आपलीही इमेज खराब होत आहे. शेवटी आपला फायदा कुठे आहे, ते पाहणारेच जास्त लोक राजकारणात असतात, त्यामुळेच अशा लोकांना ते जवळ करतात. त्यांना समजलं, तर ते नक्कीच सुधारतील, अशी अपेक्षा आहे?. ∙∙∙
गोव्याच्या राजकारणात काही खटले असे असतात, की ते संपले तरी संपत नाहीत आणि सध्या दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांच्या प्रकरणावरून अशीच मिश्कील चर्चा रंगली आहे. म्हणायला गेले तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने खटल्याला पूर्णविराम मिळाला. पण हा पूर्णविरामही थोडासा “स्वल्पविराम”सारखाच वाटतोय, असे जाणकार म्हणत आहेत. कारण आदेशातच एक छोटासा “दरवाजा” उघडा ठेवण्यात आला. जर अंमलबजावणी संचालनालयाला नव्याने पुरावे सापडले आणि आवश्यक परवानगी मिळाली, तर हा खटला पुन्हा सुरू होऊ शकतो! म्हणजेच काय, “आज सुटका, पण उद्याची खात्री नाही!” अशी परिस्थिती. त्यामुळे बाहेरून पाहता दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले, तरी आतून “पुन्हा काही तरी होईल का?” हा प्रश्न नक्कीच डोकावत असेल, अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙
ज्या राज्यात भाजपला एकेकाळी अस्पृश्य समजले जात होते, त्या पश्चिम बंगालात शेवटी भाजपने सत्ता काबीज केली. त्यासाठी वेगवेगळ्या रणनित्या वापरल्या गेल्या आणि त्यात अनेक रणनितीकार सामील झाले होते. या रणनितीकारांपैकी एक म्हणजे गोव्याचे सतीश धोंड. बंगालमधील भाजपचे कार्य स्थिरस्थावर करण्यासाठी सतीश धोंड यांना गोव्यातून पश्चिम बंगालला बोलावून घेतले होते. त्यावेळी गोव्यातील काहीजणांनी त्यांना तडीपार केले, अशा शद्बात त्यांची खिल्लीही उडवली होती. मात्र आता बंगालमध्ये भाजपने विजय मिळविल्यामुळे सतीश धोंड यांचे पक्षातील वजन बरेच वाढले आहे, यात दुमत नाही. २०२७ मध्ये गोव्यातील भाजपची गाडी रुळावर आणण्यासाठी सतीशरावांना पुन्हा एकदा गोव्यात पाठविले जाईल, असे आता सांगितले जाते. एकंदरच काय सतीशरावांचा भाजपमधील भाव खराच वाढला आहे, हेच यातून स्पष्ट होत नाही का? ∙∙∙
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा उदय झाला, तर केरळमध्ये काँग्रेसने बाजी मारली, पण बंगालमध्ये भाजपाची सरशी झालेली पाहून काँग्रेस आणि काही विरोधी नेत्यांना मात्र ते पचनी पडलेले दिसत नाही. खासदार विरियातो फर्नांडिस यांचा दावा आहे, की पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये जनता नाही, तर निवडणूक आयोगच जिंकला आहे! जेव्हा निकाल स्वतःच्या विरोधात जातो, तेव्हा निवडणूक आयोग किंवा ईव्हीएमवर खापर फोडणे, ही आता एक फॅशनच झाली आहे. पण जिथे हेच नेते निवडून येतात, तिथे मात्र निवडणूक यंत्रणा पारदर्शक आणि लोकशाही जिवंत असते! थोडक्यात काय, पराभवाचे आत्मचिंतन करण्याऐवजी घटनात्मक संस्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे, हा केवळ आपला पराभव लपवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न म्हणायचा की सोयीचे राजकारण म्हणायचे! ∙∙∙
फातोर्डा मतदारसंघात लोक रस्त्यावर येत नाहीत. याचे कारण येथील विकास कामे लोकांच्या संमतीने केली जातात, असे आमदार विजय सरदेसाई सांगतात. गत १५ वर्षांत फातोर्ड्यात जो विकास झाला आहे, त्याला तोड नाही, असे लोक बोलतात. विद्यमान आमदार सरदेसाई हे विरोधी पक्षात असूनही ते विकासकामे कशी बरे करु शकतात, हा प्रश्न कोणालाही पडणे स्वाभाविक आहेत. विजय यांची गणित त्यांनाच माहीत असावी, अशी प्रतिक्रिया लोक व्यक्त करताना दिसतात. ∙∙∙
सध्या उत्तर भारतातील लोकांसाठी गोवा हा एक विदेशी प्रांत आहे, येथे पासपोर्ट नसताना केवळ दोन ते तीन तासात पोहोचता येते. सर्व काही फ्री फॉर ऑल आहे. कॅसिनो आहेत, समुद्र किनारे आहेत व आपल्याला हवे तसे वागता येते. उत्तर भारतातील महिला आपल्या राज्यात नीट नेटक्या असतात. पण गोव्यात आल्यावर शॉर्ट पॅंट, टी शर्ट पेहराव करून सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसतात. ही वस्तुस्थिती असली आमदार विजय सरदेसाई यांनी ती टिपली आहे. एका कार्यक्रमात त्यांनी वरील माहिती दिली. त्यांच्या मते, पर्यटकांना गोमंतकीयांनी आपली संस्कृती, परंपरा, वारसाचे दर्शन घडवावे आणि आपणही संस्कृती संवर्धनासाठी कार्यरत राहायला हवे. ∙∙∙
कला अकादमीत नाटकाला जाणे जीवावर येते, कारण वातावरण विचित्र झाले आहे. प्रयोगावेळीही अनेकजण मोबाईलवर बडबडत असतात. कोणी नातीला, कोण सुनेला, कोण मुलीला आदेश देत असतो. त्या बाजूने ते मूल लाडात आल्यावर ही पण लाडात येऊन थिएटरात आहे, हे विसरून मोठ्याने बोलायला लागते. “यू टेक ज्यूस फ्रॉम फ्रीज रे बाबा. डॅड विल कम. डड्डा विल ब्रिंग आयस्क्रीम रे शान्नु. ही व्याकरणी-अशुध्द नवइंग्रजी ऐकून संताप येतो. हे लोक नाटकाला आले, की आपल्या नवश्रीमंतीचा दिखावा करायला आले, तेच कळत नाही. इसापची कथा नव्हे, हे वास्तव आहे. राज्यात मराठी, कोकणी, रोमीसाठी आंदोलने चाललीत, ती कुणासाठी? ∙∙∙
वास्तविक कुठलाही राजकारणी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे खुल्या दिलाने कधी कौतुक करत नाहीत. मात्र सावर्डेचे माजी आमदार आणि माजी मंत्री दीपक पाऊसकर हे त्याला अपवाद असावेत. रविवारी काले येथे धनगर समाजाच्या एका कार्यक्रमात बोलताना दीपक पाऊसकर यांनी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेले संकेत आर्सेकर यांचे अगदी खुल्या दिलाने कौतुक केले. आर्सेकर यांनी कुठलेही काम आपल्या अंगावर घेतले, तर ते पूर्ण केल्याशिवाय ते थांबत नाहीत, असे पाऊसकर म्हणाले. त्याचे उदाहरण देताना, कामरखण येथील एका रस्त्याचे त्यांनी उदाहरण दिले. आपण स्वत: सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री असताना स्थानिकांमध्ये एकमत होत नसल्यामुळे आपण हा रस्ता करू शकलो नाही. पण संकेत आर्सेकर यांनी दोन्ही गटांना एकत्र आणून हा रस्ता करून घेतला असे ते म्हणाले. पाऊसकर यांनी आपल्या भाषणात एकप्रकारे संकेतच्या कार्यक्षमतेला जणू कौलच दिला असे म्हटले तर ते वावगे ठरणार का? ∙∙∙
मडगावात सध्या सोपो विषय चर्चेत आहे. व्यापाऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप शहरातील व्यापारी वर्गांकडून केला जात आहे. त्यात बऱ्याच अंशी तथ्य आहे, हे आता हळूहळू उघडकीस येऊ लागले आहे. व्यापारी त्रस्त आहेत, ते या अन्यायाविरोधात आपल्या परीने आवाज काढतात. परंतु मडगाव पालिकेचे त्याचे काही पडून गेले नाही. ते आपल्या धुंदीत आहेत. त्यामुळे सोपो वसुलीवाले शेफारले आहेत. त्यांच्यावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. सोपोच्या नावे वसुलीवाले आपले उखळ पांढरे करून घेत आहेत हेच खरे. ∙∙∙
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर गोव्यात अनोख्या पद्धतीने जल्लोष साजरा करण्यात आला. राज्यातील भाजप कार्यकर्त्यांनी पारंपरिक बंगाली खाद्यपदार्थ असलेल्या झालमुडीचे वाटप करून आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार दौऱ्यादरम्यान एका स्थानिक दुकानात झालमुडीचा आस्वाद घेतला होता, त्याचीच आठवण यावेळी जागवण्यात आली. भाजपला पश्चिम बंगालमध्ये विजय मिळेल, याची खात्री असल्याने गोव्यातील प्रदेश भाजप नेत्यांनी आधीच झालमुडीची तयारी करून ठेवली होती. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात झालमुडी वाटत विजयाचा आनंद साजरा केला. यामुळे पश्चिम बंगालमधील विजयाची खात्री कशी होती हे अधोरेखित झाले. ∙∙∙
फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची आशा मावळली आहे. गेल्या पोटनिवडणुकीसाठी रवी पुत्र रितेश नाईक यांना भाजपाने संधी दिली होती, मात्र आता विधानसभा निवडणुकीत फोंड्यासाठी भाजपचे दावेदार वाढले आहेत. रितेश नाईक यांच्यासोबतच आता विश्वनाथ दळवी, नरेंद्र सावईकर अशी नावे पुढे येत आहेत. मात्र संधी दिली, पण निवडणूक झाली नाही, त्यामुळे रितेशचा दावा कायम असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत रितेशला संधी मिळणार अशी आशा रितेशचे समर्थक आणि भाजपा कार्यकर्त्यांना वाटते आहे. पाहुया नेमके काय होते ते! ∙∙∙
तियात्राला प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी होते, त्या प्रमाणात कोकणी नाटकाची व्यावसायिक उलाढाल होताना दिसत नाही. जत्रा उत्सवावेळी विनोदी कोकणी नाटकाला गर्दी असते. परंतु मराठी व्यावसायिक नाटकांना देवबाभळी किंवा प्रशांत दामलेंची नाटके यांना जसे लोक तिकीट काढून हाऊसफुल्ल गर्दी करतात, तसे प्रायोगिक गंभीर कोकणी नाटक झाले, तर अर्धेही थिएटर फूल होत नाही? स्पर्धेच्या कोकणी नाटकाची गर्दीच ओसरतेय. त्यातील काही नाटके पाच सहा ठिकाणी तिकीट लावून करण्यासारखी असतात. परंतु कोकणी अकादमीच्या वा इतर उत्सवात फुकट ठेवूनही लोक मोठ्या संख्येने येत नाही. कोकणी नाटकांची ही ‘आवतिकाय भलायकी’ सुधारणार कशी? कोणत्या प्रयत्नांनी याबद्दल कुणीही विचार करत नाहीत. परिसंवादात शब्दांचा गोळीबार थुंकीच्या फवाऱ्यासहित कोकणी प्रेमाच्या तावातावाने उसळत येतो. वास्तवात मात्र ‘फोव ना कातली सुको जागर’. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.