
पणजी: वास्को येथे शुक्रवारी वीज खात्याच्या मालमत्तेत प्रवेश करून कुंपण घालण्यास प्रतिबंध करत संबंधित अधिकाऱ्यांना धमकावल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वीज खात्याच्या भूमी अधिग्रहण कक्षाचे नोडल अधिकारी कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी शनिवारी (०१ मार्च) पणजी पोलिसांत तक्रार अर्ज देऊन केली.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मात्र, या तक्रार अर्जात मुरगावचे आमदार संकल्प अमोणकर यांचे नाव नोंदवलेले नाही. सडा येथील वीज खात्याच्या जागेतून जवळच असलेल्या वस्तीत जाण्यासाठी कुंपण तोडून मार्ग केल्याप्रकरणी कारवाई करण्यासाठी शेट्ये व इतर अधिकारी काल त्या ठिकाणी गेले होते.
काल सकाळी ८.३० वाजता बोगदा वीज विभागाच्या मालमत्तेवर घडलेल्या घटनेबाबत हा तक्रार अर्ज असल्याचे त्यांनी पणजीचे पोलिस निरीक्षक तसेच उत्तर गोवा पोलिस अधीक्षकांना उद्देशून लिहिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. शून्य एफआयआर नोंदविण्यासाठी व त्यास मुरगाव पोलिस स्थानकात हस्तांतरित करण्यासाठी विनंती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ओंकार दुर्भाटकर, यश फडते आणि सुधीर तारी (पूर्वी बोगदा बारचे मालक, आता इतर कोणी चालवतो), आणि योगेश पाटील यांची नावे संशयित म्हणून अर्जात दिली आहेत. त्यांनी कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांना तसेच इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या सार्वजनिक कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केला म्हणून त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२१ नुसार गुन्हा नोंद करावा.
वरील चौघांनी बोगदा वीज विभागाच्या जागेत बेकायदेशीरपणे अतिक्रमण केले व अधिकाऱ्यांना धमकावले. त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना अपमानित करून त्यांना मानसिक त्रास दिला. यामुळे कलम ३२९ नुसार गुन्हा नोंदवावा, अशी मागणी तक्रार अर्जात केली आहे.
या चौघांनी अधिकारी काशिनाथ शेट्ये आणि इतर अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यात अडथळा आणला आणि त्यांच्या हालचाली रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे कलम १२६ नुसार आणि या चौघांनी दंगल घडवण्याच्या हेतूने चिथावणी दिली आणि वीज विभागाच्या संपत्तीला सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान केले म्हणून कलम १९२, ३२४(५) नुसार गुन्हा नोंद करण्यात यावा. त्यांनी गुन्हेगारी कट रचल्याचे स्पष्ट होते म्हणून कलम ६१ नुसार गुन्हा नोंद करावा अशी मागणी त्यांनी केली आहे
मी कोणाच्याही धमक्यांना भीत नाही
सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिमा आपण सुधारायला हवी. आम्ही सरकारी कर्मचारी असून लोकांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही राजासारखे वागू नये, तर लोकांना मदतीचा हात द्यायला हवा. कुणी आमच्यावर अन्याय करत असेल, तर त्याविरोधात उभे राहायला हवे.
मी कुणालाही भीत नाही. माझ्याकडे शस्त्र आहे, सरकारने मला सुरक्षा पुरवली आहे, अशी प्रतिक्रिया वीज विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी स्पष्टपणे व्यक्त केली.
शेट्ये यांनी सांगितले की, शुक्रवारी वास्को येथे घडलेल्या घटनेत संबंधित भागात चार वाटा उपलब्ध आहेत आणि आम्ही लोकांना एक वाट देण्यास तयार आहोत. आम्हाला वाट देण्याबद्दल कोणतीही हरकत नाही. मात्र, त्यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी. मला कोणतीही धमकी आमदारांनी दिलेली नाही. धमक्या तेथील स्थानिक लोकांनी दिल्या आहेत. ते कोणत्या 'भाई'ला फोन लावून बोलत होते, हे त्यांच्या फोनची तपासणी केल्यावरच समजेल.
'आमदाराने कायद्याचे पालन करावे'
आमदार संकल्प आमोणकर यांचा संदर्भ देत त्यांनी म्हटले की, आमदारांनी मला मारले नाही किंवा थेट धमकी दिली नाही. मात्र, आमदारांनी सांगितले की मी पुन्हा आलो तर ते लोक मला मारू शकतात. आमदार म्हणून त्यांनी कायद्यांचे पालन करायला हवे. आम्ही एक वाट देण्यास तयार आहोत, परंतु ती प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच पूर्ण करावी, असे आवाहन शेट्ये यांनी केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.