चिंताजनक: गोव्याच्या तरुणांमध्येही वाढतोय हृदयविकार!

बदलती जीवनशैली कारणीभूत; गोव्यात 30 टक्के प्रमाण
Heart attack
Heart attackDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मागच्या आठवड्यात आलेली ती बातमी धक्कादायक होती. गोव्यातील (Goa) लोकप्रिय आरजे पंकज कुडतरकर याला हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्यातून आलेल्या मृत्यूच्या त्या बातमीने सर्वांना चटका लावला. पंकज हा पन्नाशीही न ओलांडलेला धडधाकट तरुण होता. तरीही त्याला अशाप्रकारे मृत्यूने गाठावे ही अतिशय चिंतेची बाब ठरली. सिने अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (40), अमित मिस्त्री (47), सिने निर्माता राज कौशल्य (49) या सेलिब्रिटींना पन्नाशीच्या आत हृदय विकारामुळे आलेल्या मृत्यूने या विषयाकडे सर्व देशाचे लक्ष वेधलेले असताना पंकजच्या मृत्यूने गोव्यातही हे प्रकार कमी नसल्याचे उघड झाले.

तज्ज्ञांच्या मताप्रमाणे पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत भारतात कमी वयात ह्रदय रोगांमुळे मृत्यू येणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून गोव्यातही हे प्रमाण 30 टक्क्यांच्या आसपास असावे. धूम्रपान, दारूचे सेवन याच बरोबर कामाचा किंवा मानसिक ताण ही या मृत्यूची मुख्य कारणे असून बदलत्या जीवनशैलीचे हे बळी असे मत व्यक्त केले जात आहे.

Heart attack
Goa Monsoon Updates: सत्तरी, साखळी, वाळपई, सांगेत पावसाची संततधार

गोव्यात तसेच विदेशात हृदयरोग तज्ज्ञ म्हणून नाव कमावलेले प्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. गुरुप्रसाद नाईक यांनी हृदयरोग गोव्यातील तरुणांमध्येही सर्रास आढळून येत असल्याचे मान्य करताना ताण तणावाने भरलेली जीवनशैलीच त्याचे मुख्य कारण असल्याचे सांगितले.

डॉ. नाईक म्हणाले, कित्येकांना अनुवंशाने या रोगाची लागण होऊ शकते. मात्र, तरुण वयातील व्यक्ती अशा रोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे मृत्यू येण्याचे प्रकार घडू शकतात. गोव्यात हृदयविकाराने तरुणांना मृत्यू येण्याचे प्रमाण तसे फारसे नसले, तरी हृदयाच्या रोगाचे रुग्ण मात्र बरेच आहेत, असे त्यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या मते श्वासोश्वास घेण्यास त्रास होणे, व्यायाम करताना खांदा किंवा जबडा आखडून येणे, अस्वस्थ वाटणे किंवा छातीत दुखणे ही हृदयविकाराची लक्षणे असतात. मात्र, कित्येकदा तरुण मुले मला कसा ह्रदय विकाराचा झटका येणार असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात.

Heart attack
Goa: चिखली चौकात वाहतुकीला त्रास

मुंबईच्या हिंदुजा इस्पितळातीळ प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ आणि गोमंतकीय सुपुत्र डॉ. घनश्याम काणे यांनीही या रोगाची सांगड बदलत्या जीवनशैलीशीच घातली. ते म्हणाले, कित्येकदा अति प्रमाणात केलेला व्यायामही हृदयविकारांना आमंत्रण देणारा असतो. त्याशिवाय अतिरिक्त प्रोटिन्सही मारक ठरू शकतात, असे त्यांनी सांगितले.

कोविडचे परिणाम

कोविडमुळे फुफ्फुसाबरोबर हृदयावरही परिणाम होतो. गोव्यातही कित्येक तरुण वयाचे कोविड रुग्ण हृदयविकाराच्या झटक्याने दगावले आहेत. कोविडमधून बरे झाल्यानंतरही काही जणांमध्ये हृदयरोगांची लक्षणे आढळली आहेत. अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने आपले काम करावे असे सांगण्यात आले आहे. ठराविक अंतराने त्यांनी आपली हृदय तपासणी करणे आवश्यक असते. कोविडमधून बरे झाल्यानंतर किमान दोन आठवडे रुग्णांनी वजनी सामान उचलू नये किंवा व्यायाम करू नये. कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पहिल्या दोन आठवड्यात कामावर जायचे असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ही खबरदारी घेणे आवश्यक

  • नियमित तपासणी करून घ्या

  • हृदयाला पूरक असा आणि समतोल आहार घ्या

  • धूम्रपान करणे आणि तणाव घेणे टाळा, कारण हृदय विकाराचा झटका येण्याची ही दोन मुख्य कारणे आहेत.

  • मद्यपान करत असाल तर ते नियंत्रणात ठेवा

ही आहेत लक्षणे

  • श्वास घेण्यास त्रास होणे

  • व्यायाम करताना खांदे किंवा जबडा दुखणे

  • अस्वस्थ वाटणे किंवा छातीत भरून आल्यासारखे वाटणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com