
बार्देश:-गिरी ते पर्वरी हुडाई खापरेश्वर मंदिर दरम्यानचा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. या रस्त्यावर रहदारी वाढल्याने जागोजागी मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे जोखमीचे बनले आहे. वारंवार याठिकाणी वाहतुकीची कोंडी होते.
दरम्यान, भर पावसात चर आणि खड्डे पडलेले असल्याने ते तात्पुरते बुजवले जात आहेत. त्यामुळे अवघ्या तासाभरात वाहने गेल्यानंतर ही सर्व खडी पुन्हा वर येते. त्यामुळे वाहन चालकांना आणि विशेषतः दुचाकस्वारांना या रस्त्यावर तारेवरची कसरत करत वाहने हाकावी लागत आहेत. हा भाग पर्वरी मतदारसंघात येत असून पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी लक्ष घालून निदान या पावसाळ्यात तरी तात्पुरता तोडगा करावा, अशी मागणी पादचारी व वाहनचालकांकडून केली जात आहे.
जलस्त्रोत खात्यातर्फे म्हापसा ग्रीनपार्कजवळ शेतात सध्या मातीचे भराव टाकून शेतात म्हापसा गिरी तारनदीपर्यंत पूर्ण शेतात बंधारा बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ग्रीन पार्कपासून सर्व्हिसरोडपर्यंत पुढे हमरस्त्यालगत माती पडून सर्व रस्ता चिखलमय व दलदलीचा बनला आहे. त्यामुळे याभागात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. हल्लीच याठिकाणी सरकारी कर्मचारी नारायण अभ्यंकर यांचे १२/१३ दिवसांपूर्वी बस अपघातात मृत्यू झाला होता.
तसेच पर्वरी सिग्नलकडेही संपूर्ण रस्त्यांची दुर्दशा झाली असून ह्युंडाई शोरूमपर्यंत रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे.
राज्य सरकार रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी मोठामोठ्या योजना आखते. परंतु हे अपघात का होतात, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हेल्मेट परिधान न केल्यास दंड ठोठावला जातो. रस्त्याच्या दुर्दशेकडे कोण लक्ष देणार कमिशनपोटी रस्त्यांची वाट लावणाऱ्या कंत्राटदारांना कोण जाब विचारणार.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.