
पणजी: पर्वरी येथील ओ कोकेरो ते ‘मॉल द गोवा’पर्यंतचा रस्ता काही महिन्यांपूर्वीच दुरुस्त करण्यात आला होता. हा रस्ता नव्याने हॉटमिक्स करण्यात आलेला असतानाही गेल्या आठवड्यात आलेल्या जोरदार पावसाने संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. सध्या या मार्गावर खड्ड्यांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले असून वाहनधारकांचा संताप उफाळून आला आहे.
विशेष म्हणजे, या रस्त्यावर असलेले खड्डे इतके मोठे आहेत की चारचाकी वाहनांचे दरवाजेही खडखडत आहेत. दुचाकीस्वार तर अधिकच संकटात सापडले आहेत. खड्ड्यांना चुकविण्याच्या प्रयत्नात मागील आठवड्यात दुचाकीस्वारांचे अपघात देखील झाले आहेत.
या वाढत्या घटनांमुळे आणि रस्त्यांची स्थिती पाहता केवळ डागडुजीसारखे काम करून पैसे खर्च केले गेले, मात्र गुणवत्ता नाही अशा प्रतिक्रिया चालक तसेच व्यावसायिक व्यक्त करू लागले आहेत.
एकीकडे नव्याने तयार केलेला हा रस्ता पावसात खराब झालेला असताना त्यालगत असलेला जुना डांबरीकरणाचा रस्ता मात्र अजूनही टिकून आहे. त्या मार्गावर कुठेही खड्डे नाहीत. यामुळे नव्या रस्त्याच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
सध्या पावसाळ्यामुळे रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली असून दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि सरकारने तत्काळ खुलासा करावा, दोषींवर कारवाई करावी आणि नव्याने खड्डे बुजवून पुन्हा एकदा संपूर्ण रस्त्यावर दर्जेदार हॉटमिक्सचे काम करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.