
पणजी: मुख्यमंत्र्यांनी सूचना करूनही मंत्रिपदाचा राजीनामा न दिलेले गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून अपमानास्पद पद्धतीने हकालपट्टी करण्यात आली. ‘कोणतीही कल्पना न देता कारवाई झाली. ‘माहिती खात्याच्या संकेतस्थळावर यासंदर्भात मी बातमी वाचली’, असे खुद्द गावडे यांनी म्हटले आहे. या कारवाईमुळे मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा मार्ग खुला झाला आहे.
गावडे यांना हटविल्यानंतर पुढे काय, यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. सूत्रांच्या माहितीप्रमाणे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना हटविण्यासंदर्भात घाटत आहे.
त्यानंतर एकूण चार जागा रिक्त होतील. त्याजागी दिगंबर कामत, रमेश तवडकर, दिलायला लोबो, संकल्प आमोणकर यांची वर्णी लागू शकते. हा बदल पुढील आठवड्यात होऊ शकतो. २२ जुलैपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाला चार नवे मंत्री सामोरे जाऊ शकतील.
गोव्याच्या क्रांतिदिनी शोषित जनतेची बाजू घेतल्याची पोचपावती मिळण्यापेक्षा मोठे भाग्य कोणतेच असू शकत नाही. ज्या गोष्टीसाठी या सरकारने ही भूमिका घेतली, त्या विरोधात संघर्षासाठी आवाज उठवण्यास मोकळीक दिल्यामुळे माझ्या सरकारचे आणि पक्षाचे आभार मानतो. सत्ता आणि सत्य यापैकी एक निवडायचे असेल, तर मी सत्याची बाजू घेईन. - गोविंद गावडे.
गावडे यांनी भाजप पक्ष संघटनेबरोबर संघर्षाचे संकेत दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते आगामी काळात भाजपबरोबर संघर्षाची भूमिका घेतील. पुढील काळात ते नवी रणनीती निश्चित करतील. पुढच्या निवडणुकीत ते अपक्ष लढण्याची शक्यता आहे.
गावडे यांची कारकीर्द सातत्याने वादग्रस्त ठरली. तरीही त्यांना अभय मिळाले होते. कला अकादमीच्या नूतनीकरणात कथित भ्रष्टाचाराचा आरोप असो; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनात दिरंगाईचे लांच्छन असो वा त्यांच्या अखत्यारीत खात्यांमध्ये गैरव्यवस्थेची ओरड असो, तरीही गावडे यांचे मंत्रिपद शाबूत राहिले होते; परंतु त्यांनी आदिवासी कल्याण खात्यात भ्रष्टाचार चालतो, असा आरोप करून जेव्हा अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री सावंत यांच्यावरच शिंतोडे उडवले, तेव्हा गावडे यांना हटवले.
गावडे यांच्या खात्यांवर मुख्यमंत्र्यांचा होता अंकुश
काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी गावडे यांना दूरच ठेवले होते; त्यांच्या खात्यामधील भरती प्रक्रिया रोखली. क्रीडा, कला व संस्कृती तसेच ग्रामीण विकास खात्यांच्या कारभारावर मुख्यमंत्र्यांचा अंकुश होता.
गावडे यांना हटविण्याचे ठरले होते. फक्त कारवाई कधी करावी, याबाबत विचार सुरू होता. यासंदर्भातील वृत्त ‘गोमन्तक’ने रविवारी पान १ वर प्रसिद्ध केले होते, त्यातील तपशील खरे ठरले.
गोविंद गावडेंवर झालेले आरोप
कला अकादमीच्या नूतनीकरणावर ५६ कोटी रुपये खर्च होऊनही वास्तुची दुरवस्था झाली. मंत्री या नात्याने गावडे यांनी जबाबदारी झटकली. भ्रष्टाचाराचे झाले आरोप.
२ कला अकादमीप्रश्नी आंदोलकांची गावडे यांनी उडविली खिल्ली; ताजमहाल बांधताना शहाजहाँनने निविदा काढली होती का, अशा शब्दांत केली होती निर्भत्सना.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनात ढिसाळपणा; झाला होता विलंब; लागले होते लांच्छन, मुख्यमंत्र्यांनी धुरा सांभाळल्याने पूर्ण झाली होती स्पर्धा, गावडेंवर जोरदार टीका.
सभापती तवडकर यांच्यासोबत सवतासुभा, ‘उटा’च्या कार्यक्रमात केली जाहीर टीका; वर्चस्ववादातून वारंवार उडत होते खटके. भ्रष्टाचाराचे झाले आरोप.
आदिवासी कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत अर्वाच्च भाषेत बोलणे; त्याचा ऑडिओ झाला होता व्हायरल.
मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील आदिवासी कल्याण खात्यात देवाणघेवाण होते; खात्याचा तोल ढाळसल्याचा केला होता आरोप.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.