Goa: कॅप्टन मिरांडानी डॉ. लोहियांवर पिस्तूल रोखले, त्यांनी हात बाजूला काढत भाषणाला सुरुवात केली; क्रांतीची ज्योत पेटली..

Goa Freedom Movement: लोहियांनी त्या काळी लोकांना आलेली मरगळ दूर करण्यासाठी क्रांतिज्योत पेटवली. आपल्या लोकांचे लोकशाही राज्य असूनही आलेली ही मरगळ घालवण्यासाठी पुन्हा एकदा ही क्रांतिज्योत चेतवावी लागेल.
Goa Revolution Day
Goa Revolution Day HistoryDainik Gomantak
Published on
Updated on

१८ जून १९४६, या दिवसाला गोमंतकीय राजकीय इतिहासातच नव्हे तर सामाजिक इतिहासातही एक वेगळे महत्त्व आहे. कारण, त्या दिवशी गोवेकरांनी पोर्तुगीज सत्तेला ललकारले होते. डॉ. राम मनोहर लोहिया यांनी त्या दिवशी दाखविलेल्या अतुलनीय धैर्याने सगळी जनता अचंबित होऊन उठली होती.

केवळ पुरुषच नव्हे तर महिलाही त्या दिवशी रस्त्यावर उतरल्या. त्या दिवशी गोव्यातील जनतेने फक्त पोर्तुगीज सत्तेलाच ललकारले असे नव्हे तर, त्याच दिवशी गोव्यातील जनतेला स्वत:मध्ये असलेल्या ताकदीचा अंदाज आला. त्यामुळे गोव्यात खऱ्याखुऱ्या क्रांतीची सुरुवात झाली.

गोव्यातील हा क्रांती दिवस आज ८०व्या वर्षात पाऊल टाकत आहे. वास्तविक ही घटना ऐतिहासिक असल्याने यंदाचा हा क्रांतिदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची गरज होती.

पण सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहिल्यास गोवा जरी मुक्त झाला असला तरी गोवेकरांमधील मरगळ अजूनही तशीच कायम आहे का, असे वाटण्याजोगी स्थिती आहे. या मरगळीतून गोवेकरांना बाहेर काढण्यासाठी आणखी एखाद्या डॉ. लोहियांना जन्म घ्यावा लागेल का, असा प्रश्न पडतो.

वास्तविक १८ जून रोजी जी क्रांती सुरू झाली ती गोव्यातील पोर्तुगीज सरकारला आव्हान देणारी पहिलीच घटना नव्हती. त्यापूर्वीही कुंकळ्ळीतील उठाव, पिंटोंचे बंड, मडगावातील नगरपालिका निवडणुकीच्यावेळी लोकांनी केलेला निषेध आणि नंतर त्यांच्यावर झालेला गोळीबार अशा अनेक घटना घडल्या होत्या.

पण त्या पोर्तुगीज सत्तेला गोव्यातून हद्दपार करण्यासाठी नव्हत्या तर स्वत:वर झालेला अन्याय दूर करण्यासाठी होत्या. मात्र १८ जून १९४६ या दिवशी जे काय घडले ते अघटित असे होते. आम्हीही जुलमी पोर्तुगीज सत्तेला आव्हान देऊ शकतो अशी भावना गोवेकरांच्या मनात त्या निमित्ताने पहिल्यांदाच तयार झाली होती. गोवेकरांना आपले स्वत्व समजून आले होते. यासाठीच या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गोवा, दमण, दीव स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास या मनोहर हिरबा सरदेसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्या दिवशी मडगावात नेमके काय झाले त्याचा साक्षात्कार करणारे वर्णन आहे.

१८ जूनच्या आधीचे काही दिवस गोव्यातील राजकीय नेत्यांमध्ये खळबळ माजवणारी होती. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे डॉ. राम मनोहर लोहिया हे गोव्यात आपले मित्र डॉ. ज्युलियाव मिनेझीस यांच्या असोळणा येथील घरी विश्रांतीसाठी आले आहेत, याची माहिती मिळाल्यानंतर गोव्यात राजकीय बदल व्हावा अशी इच्छा असलेल्या कित्येक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली.

याच भेटीदरम्यान डॉ. लोहिया यांनी आपण भाषणबंदीच्या विरोधात आंदोलन करणार हे जाहीर केले. सुरुवातीला अ‍ॅड. जुझे इनासियो द लॉयोल यांसारख्या नेत्यांनी त्यांना सबुरीचा सल्लाही दिला. हे आंदोलन सहा महिन्यानंतर करुया असा त्यांचा आग्रह होता.

मात्र लोहिया यांचे त्यावर उत्तर होते, हे आंदोलन एक दिवसही पुढे ढकलले जाणार नाही, हा निर्धार डॉ. लोहिया यांनी व्यक्त केला तो दिवस होता १७ जून. दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ जूनला मडगाव नगरपालिकेसमोरील खुल्या जागेत हे आंदोलन करण्याचा बेत डॉ. लोहिया यांनी जाहीर केला आणि डॉ. लोहिया यांचा हा निर्णय गोव्यातील मरगळलेल्या लोकांसाठी एक संजीवनी मंत्र ठरला.

१८ जून रोजी होणारी लोहियांची ही सभा कुठल्याही परिस्थितीत उधळून लावायची या इराद्याने पोर्तुगीज प्रशासनाने आज ज्या जागेला लोहिया मैदान म्हणून ओळखले जाते त्या जागी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

लोकांच्या मनात दहशत निर्माण व्हावी यासाठी संगीनधारी बंदुका घेऊन सैनिकांना रस्त्यावर उभे केले होते. या मैदानाच्या दिशेने येणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात होती. एवढा कडक पोलीस बंदोबस्त असतानाही लोकांनी त्याची पर्वा न करता या मैदानावर गर्दी केली होती.

लोहिया सभास्थळी येतात की नाही याची सर्वांना उत्कंठा लागली होती. दुपारच्यावेळेस डॉ. लोहिया टांग्यातून सभास्थळी उपस्थित झाल्यानंतर लोकांमध्ये जणू चैतन्याची लाट पसरली. ‘भारत माता की जय’, ‘डॉ. राम मनोहर लोहिया की जय’ अशा घोषणांनी सर्व आसमंत दणाणून उठला.

भाषणबंदी कायदा मोडण्यासाठी डॉ. लोहिया पुढे येतात हे पाहिल्यावर त्यांना रोखण्यासाठी कॅप्टन मिरांडा यांनी डॉ. लोहियांवर पिस्तूल रोखले आणि डॉ. लोहियांनी क्षणाचीही उसंत न घेता कॅ. मिरांडा यांचा पिस्तूल रोखलेला हात बाजूला काढून आपल्या भाषणाला सुरुवात केली.

नेमका तोच क्षण तमाम गोमंतकीयांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटविणारा ठरला. जर लोहिया पोर्तुगीज सरकारला भीत नाहीत तर आम्ही का घाबरावे, अशा तऱ्हेचा आत्मविश्वास लोकांमध्ये तयार झाला. लोकांमधील भीती क्षणात नाहीशी झाली.

त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. लोहिया यांना मुक्त करावे अशी मागणी घेऊन मडगावातील महिला रस्त्यावर उतरल्या. त्यांनी मडगावच्या उद्यानाभोवती प्रभातफेरीही काढली.

वास्तविक डॉ. लोहिया यांना अटक केल्यावर लोकांकडून ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या त्या एवढ्या उत्स्फूर्त होत्या की, पोर्तुगीज प्रशासनही त्यामुळे भांबावून गेले होते. लोकांना शांत करण्यासाठी पोलिसांना डॉ. लोहिया यांना बाहेर आणावे लागले. लोकांनी घरी जावे असे आवाहन डॉ. लोहिया यांनी स्वत: केले आणि तेही पोर्तुगीज पोलिसांच्या याचनेवरून.

Goa Revolution Day
Goa Revolution Day: लोहिया - मिनेझीस भेटीनंतर 10 दिवसांत गोव्याचा इतिहास बदलून गेला, 18 जून रोजी मडगावात त्याचा स्फोट झाला

डॉ. लोहिया यांच्या या कृतीने गोव्यातील लोकांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटली. त्यानंतर गोवा मुक्तीसाठी सुरू झालेले आंदोलन १९६१ सालापर्यंत चालू राहिले.

मध्यंतरीच्या काळात या आंदोलनालाही काही प्रमाणात मरगळही आली. मात्र लोकांच्या मनात डॉ. लोेहियांनी जी जिद्द निर्माण केली होती ती कमी झाली नाही. एकटा माणूस संपूर्ण समाजात कसा बदल घडवून आणू शकतो याची जाणीव या एका दिवसाने करून दिली.

Goa Revolution Day
Goa Revolution Day 2025: शौर्य, त्याग आणि अभिमानाचा दिवस! गोवा क्रांती दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

आज गोवा स्वतंत्र झाला असला तरी हे स्वातंत्र्य फक्त भौगोलिक स्वरूपाचे तर राहिलेले नाही ना? अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. गोव्यात गोवेकरच उपरा बनण्याची सुरुवात झाली आहे असे वाटू लागले आहे.

अशा परिस्थितीत त्या विरोधात कुणी आवाज उठविला तर तो बंद करण्यासाठी प्रशासनाचा वापर केला जात आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. या अशा परिस्थितीत गोव्यात एका नव्या क्रांतीची गरज आहे का? आजच्या या दिवशी गोवेकरांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com