Goa Gov. Policies: बिन नखांचा, दातांचा वाघ आणि अमलात न आलेली धोरणे काय उपयोगाची? 10,000 नोकऱ्या, कृषी धोरणाचं काय झालं?

Goa Policy Failure: सरकारचे हे वांझोटे वायदे पाहिले की काठीच्या टोकाला बांधलेले गाजर मतदाराला दाखवत त्याच्या पाठीवर बसलेला व त्याला पुढे घेऊन जाणाऱ्या राज्यकर्त्याचे व्यंगचित्र डोळ्यांसमोर येते.
Pramod Sawant
Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

वो ख़्वाब दिखाते है साकार नहीं करते,

उल्फ़त से मगर खुल के इंकार नहीं करते

शायर ज्योती आझाद खतरी यांच्या या ओळी गोव्यातील वास्तवाशी साधर्म्य दर्शविणाऱ्या आहेत. धोरणांचा सुकाळ, अंमलबजावणीचा दुष्काळ स्वयंपोषी प्रगती साध्य करू शकत नाही. वांझोटे वायदे ही सामाजिक फसवणूक.

गोवा सरकारने अलीकडे बरीच धोरणे आखली; पैकी प्रत्यक्षात किती लागू झाली याचा अदमास निराशेच्या गर्तेत घेऊन जातो. पूरक कृती नसल्यास हेतू चांगला असूनही तो निरुपयोगीच. २०१८मध्ये मोठा गाजावाजा करून आयटी धोरण आखले गेले.

१० हजार नोकऱ्या निर्माण करण्याचे ध्येय बाळगले; परंतु धोरणाचा फायदा करून घेण्यास आपली व्यवस्था घोर अपयशी ठरली. पाच वर्षांसाठी वैध धोरण ऑगस्ट २०२३मध्ये कालबाह्य ठरले, पुढे त्याला मुदतवाढ मिळाली; पण दिवास्वप्ने सत्यात कधी उतरली नाहीत. अलीकडेच फेब्रुवारीत ‘शेतजमिनींचे रूपांतरण करू देणार नाही’, अशा गर्जनेसह कृषी धोरण जाहीर झाले. बहुचर्चित धोरणाची वाहवा झाली.

दुर्दैवाने, ते अद्याप अधिसूचित झालेले नाही. त्याशिवाय टीसीपी, पंचायत कायद्यात बदलही अनिवार्य आहेच. बिन नखांचा, दातांचा वाघ आणि अमलात न आलेली धोरणे काय उपयोगाची?

गृहनिर्माण, रोजगार, औद्योगिक धोरणांची कमी अधिक फरकाने हीच स्थिती राहिली आहे. गोवा वारसा धोरणाची तीच गत होऊ नये म्हणजे मिळवले. डिसेंबर २०२४च्या अखेरीला बहुचर्चित गोवा राज्य वारसा धोरणाचा मसुदा पुरातत्त्व खात्याकडे सुपूर्द करण्यात आला आणि विकासाच्या लाटेत लुप्तावस्थेत पोहोचलेल्या गोव्याच्या अभिजात श्रीमंतीवरील धूळ झटकली जाऊन दाही दिशा तेजाळल्या जातील, अशा अपेक्षांना धुमारे फुटले.

गोव्याची ओळख केवळ किनाऱ्यांपुरती नाही. वैभवशाली संस्कृती आणि लोकपरंपरांनी नटलेल्या गोव्याचे सौंदर्य विकासाच्या चकचकीत मुलाम्याखाली झाकोळले गेले ते प्रकाशात आणण्यासोबत येथील सरस ग्रामसंस्कृतीला बळकटी देण्याची गरज होतीच.

त्याला मूर्त रूप लाभेल, असे ते पहिले पाऊल मानले गेले. परंतु त्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्यास साडेपाच महिने गेले. अद्याप धोरण अधिसूचित होणे बाकी आहे. ते झाल्यावर अंमलबजावणीसाठी नियम तयार करावे लागतात, काही योजना आखाव्या लागतात.

ही प्रक्रिया कधी पूर्ण होणार? हे जोवर होत नाही, तोवर योजनेच्या उपयुक्ततेविषयी ती बतावणीच ठरते. वारसा धोरणामुळे २००हून अधिक ऐतिहासिक वास्तू, ४६ लोककला प्रकार व ६१ पारंपरिक व्यवसायांना नवसंजीवनी मिळू शकेल.

वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासोबत त्याद्वारे महसूल निर्मितीचे उद्दिष्ट बाळगण्यात आलेय. अनेक लोककलांचा कीर्तिमान घडावा यासह परंपरागत व्यवसायांचे उत्थान दृष्टिपथात आहे. ‘गोंयकार’पण जिवंत ठेवण्यास कटिबद्ध विचारवंतांनी मांडलेल्या वारसा मसुद्याचे जशास तसे धोरण होणे गोव्याची ओळख टिकवण्यासाठी फार महत्त्वाचे आहे.

त्यासाठी योग्य आणि कालबद्ध अंमलबजावणी आणि राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे. नेमके घोडे तिथेच अडते. घोषणा करायला तिचे आकर्षक दिसणे पुरते; ती प्रत्यक्षात आणायला खूप काही असावे लागते. याचा विचार कुणीही करत नाही. जाहीर करण्याआधी ती पूर्ण कशी होईल याचा शेवटपर्यंत विचार करावा लागतो.

तो झाला नाही की, मग लक्ष वळवण्यासाठी नवीन आकर्षक दिसणारी घोषणा करावी लागते. सरकारचे नेमके हेच सुरू आहे. घोषणेवर घोषणा, योजनेवर योजना, धोरणावर धोरणे; प्रत्यक्षात लोकांच्या हाती काय लागते? भली मोठी निराशा.

Pramod Sawant
Government Services: सरकारी सेवा आता महागणार! गोवा ऑनलाइन पोर्टलवर प्रत्येक सेवेसाठी 'रुपये मोजावे लागणार'

सरकारचे हे वांझोटे वायदे पाहिले की, काठीच्या टोकाला बांधलेले गाजर मतदाराला दाखवत त्याच्या पाठीवर बसलेला व त्याला पुढे घेऊन जाणाऱ्या राज्यकर्त्याचे व्यंगचित्र डोळ्यांसमोर येते.

सरकारने, कुठल्याही मंत्र्याने एखादी घोषणा केली, आश्वासन दिले की, पहिला प्रश्न लोकांनीच आता विचारला पाहिजे, ‘आधीच्या आश्वासनाचे काय झाले?’ हा प्रश्न जोवर ठामपणे विचारला जात नाही, तोवर लोकांच्या माथी कधीही पूर्ण न होणारी आश्वासनेच थोपली जातील.

Pramod Sawant
Goa Politics: मंत्रिमंडळ बदलाची दिल्लीत तयारी! PM मोदींच्या कोर्टात चेंडू; 3 मंत्र्यांना मिळू शकतो नारळ

ती पूर्ण न होण्याचे अर्धे श्रेय राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाला जाते आणि उर्वरित श्रेय कोलदांडा घालणाऱ्या नोकरशाहीच्या प्रभावाला जाते. या सगळ्या बाजारात राजकारणी आणि नोकरशहा अमाप कमावतात, लोकांचे हात रिकामे ते रिकामेच राहतात.

लोकांनी निवडून दिल्यामुळे लोकप्रनिधी व लोक यांचे एक अतूट नाते असते. हे नातेसंबंध घट्ट करणारी वीण म्हणजे नोकरशाही. पण, सगळेच विकून खायला निघालेले नांत्यांचीही बोली लावतात. राजकारणी व नोकरशहा घोषणांच्या बाजारात जे करू नये ते करतात, त्याचे वर्णन या नंतरच्या शेरामध्ये शायर खतरी करतात -

बस बात कोई उन को समझा दे ये इतनी सी

रिश्तों में कभी कोई व्यापार नहीं करते...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com