Goa Politics: खरी कुजबुज: भंडारी समाजातील चर्चा

Khari Kujbuj Political Satire: दिल्लीत नावे पाठवल्यानंतर तेथे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
Goa Political Updates
Khari KujbujDanik Gomantak
Published on
Updated on

भंडारी समाजातील चर्चा

भंडारी समाजाने श्री रुद्रेश्वर देवाची रथयात्रा काढल्याने गोवाभर मोठ्या प्रमाणात जनजागृती घडून आली आहे. श्री रुद्रेश्वर हे आपले आराध्य दैवत असल्याचे राज्यभरातील भंडारी बांधव मानतात. मात्र, ते महाजन होऊ शकत नाहीत. गेली ९ वर्षे निवडणूक होऊ शकलेली नाही. महाजन यादी तयार नसल्याने यंदाही निवडणूक होणार नाही. रथयात्रा समितीत सगळे आजी-माजी आमदार, मंत्री आहेत. महाजन यादी तयार व्हावी म्हणून देवस्थानचे माजी ॲटर्नी उमेश मांद्रेकर यांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. रथयात्रा आयोजित करणाऱ्या ‌महनीय राजकीय नेत्यांनी एक शब्द टाकला, तर आजही निवडणूक होऊ शकेल असे सर्वसामान्य भंडारी बांधवांना वाटते. त्याचीच तर चर्चा आहे. ∙∙∙

आता दिल्लीच्या फोनची प्रतीक्षा

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कोण अशी चर्चा खुद्द भाजपमध्येच सुरू आहे. दिल्लीत नावे पाठवल्यानंतर तेथे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतून फोन आला का अशी विचारणा सध्या एकमेकांना करण्यात येत आहे. दिल्‍लीतून मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांना आधी हे नाव कळेल म्हणून त्यांच्याकडेही हस्ते परहस्ते विचारणा करण्यात येत आहे. या पदासाठी इच्छुक असलेले सरचिटणीस दामू नाईक व ॲड. नरेंद्र सावईकर यांनाही काहीजण फोन आला का अशी विचारणा करून भंडावून सोडत आहेत. त्यांनी अद्याप काही कळले नाही. पद मिळाले तर स्वीकारण्याची तयारी आहे असे ठरावीक साच्याचे उत्तर देणे सुरू केले आहे. ∙∙∙

‘ती’ दोन दुकाने फक्त रात्रीच खुली!

फोंड्यात वरचा बाजार भागातील एका जुन्या इमारतीत एकदम तळमजल्यावरील दोन दुकाने दिवसा बंदच असतात. मात्र, रात्र झाली की ही दुकाने सुरू होतात. त्यानंतर रात्री या दुकानात काय चालते, ते सांगायची गरज नाही, पण हल्लीच्या काळात या भागात मारामाऱ्या चालल्या आहेत. डिसेंबरच्या २८ तारखेला याच ठिकाणी एका युवकावर दोघांनी जीवघेणा हल्ला चढवला होता, केवळ दैव बलवत्तर म्हणून तो युवक बचावला, पण त्याच्या चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या, आता त्यातही आश्‍चर्याचा भाग म्हणजे पोलिसांत तक्रार झाली खरी, पण या जखमी युवकाचे दोन वैद्यकीय अहवाल करण्यात आल्याचे समोर आले आहे. आता हा काय बुवा प्रकार आहे..! ∙∙∙

सत्काराची तयारी सुरू

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार दामू नाईक यांची निवड होणार या वृत्ताने भंडारी समाजात सध्या आनंदाची लकेर उमटू लागली आहे. काही राजकारण्यांनी तर भाजप प्रवेशाची स्वप्ने पाहणे सुरू केले आहे. दामू प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर समाज बांधवांकडून तालुकावार सत्कार करण्याचे नियोजन आत्तापासूनच करणे सुरू झाले आहे. दामू हे समाजाच्या मंचावर फारवेळा दिसले नसले, तरी भंडारी समाजातील अनेकांना ममत्त्व वाटते. आमचा दामू सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला म्हणजे पुढील निवडणुकीत आमच्या समाजाचे जास्त आमदार निवडून येतील असे समीकरणही मांडण्यात येत आहे. भंडारी एकीकरणासाठी दामू यांचे प्रदेशाध्यक्षपद कारण ठरू शकेल, असे काहींना आताच वाटू लागले आहे. ∙∙∙

पर्यटन खात्याचे दमदार उत्तर!

राज्यातील पर्यटनाविषयी काही आठवड्यांपूर्वी देशभरात गोंधळ निर्माण झाला होता. एका नेटकऱ्याने समाज माध्यमांत गोव्यातील पर्यटक संख्या घटल्याचे वृत्त तयार केले होते. या वृत्तावरून सर्वत्र गोव्यातील पर्यटक घटल्याची चर्चा सुरू झाली आणि राज्याची बदनामीही झाली. त्यामुळे पर्यटन खात्याने त्या वृत्ताची दखल घेत संबंधितांविरोधात कारवाईची घोषणा केली. त्याविरोधात तक्रारही झाली, पण पुढे काय? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पर्यटनमंत्र्यांनी सोमवारी १ कोटी ४ लाख पर्यटक गतवर्षी २०२४ मध्ये गोव्यात आल्याचे जाहीर केले. ज्यांनी राज्याची बदनामी केली आहे, त्यांना हे सणसणीत नक्कीच उत्तर आहे. खोटी माहिती देऊन राज्याची बदनामी केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय राज्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचविण्यासाठी ‘खोटा डेटा’ वापरणाऱ्यांवर आणि त्या वृत्ताला प्रसिद्धी देणाऱ्यांविरुद्ध आता पर्यटन खाते काय पावले उचलणार हे लवकरच दिसून येईल, अशी अपेक्षा. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज: भाजपला पर्याय हवा; पण काँग्रेस गंभीर आहे का?

कारवाई सगळ्‍यांवरच का नाही?

मडगावातील काही दुकाने आपले सांडपाणी खुल्‍या गटारात सोडतात म्‍हणून जिल्‍हा प्रशासनाने त्‍यांना सील ठोकण्‍यास सुरवात केली आहे. अर्थातच ही कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या आदेशानुसारच केली जात आहे. असे जरी असले तरी मडगावात अशी कित्‍येक दुकाने आहेत जी आपले सांडपाणी खुल्‍या गटारात सोडतात. अशा परिस्‍थितीत फक्‍त ४६ आस्‍थापनांवरच ही कारवाई का? हा प्रश्न विचारला जात आहे. मालभाट येथे काही दुकानांना सील ठोकले गेले तिथे पुढेच एक सर्व्हिस सेंटर असून या सर्व्हिस सेंटरचेही सांडपाणी गटारातच सोडले जाते. मात्र, या सर्व्हिस सेंटरला नोटीस दिली गेली नाही. या सेंटर चालकाला कुणाचा आशीर्वाद आहे म्‍हणून त्‍यांना हे अभय दिले जात आहे का? ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: 'युती'त असल्याने जाहीर वक्तव्ये टाळा! ढवळीकर- गावडे वादावरुन तानावडेंचा सल्ला

कचरा व्यवस्थापनाची पोलखोल

डॉ. लेविनसन मार्टिन्स गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे १२ वर्षे व्यवस्थापकीय संचालक होते. त्यांच्या कार्यकाळात कचरा विल्हेवाटीचे अनेक प्रयोग राज्यात झाले. साळगाव आणि काकोडा येथील प्रकल्प मार्गी लागले. घन कचरा, जैव कचरा, घातक कचरा, ई कचरा हाताळणीचे प्रकल्प सुरू झाले. केवळ बांधकाम टाकाऊ साहित्य हाताळणीचा प्रकल्प ते सुरू करू शकले नाहीत. आता त्या महामंडळाचे काय चालले याची याची झाडाझडती खुद्द मुख्यमंत्री आज घेणार आहेत. त्यामुळे बैठकीत काय सादरीकरण करायचे हे ठरवण्यासाठी महामंडळात सध्या वावरणाऱ्यांना मार्टिन्स यांचीच आठवण आली. कचरा व्यवस्थापन हे साधे काम नाही. मार्टिन्स यांनी त्याविषयात पीएचडी केली. आता कचरा व्यवस्थापनात आलेल्या शैथिल्याला मुख्यमंत्री कशी दिशा देतात ते आज समजणार आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com