Golavali: 'मराठी ही गोव्याची संस्कृती जपणारी भाषा'! गोळावली येथे साहित्य, सांस्कृतिक संमेलन उत्साहात

Golavali Sattari: मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल, त्यामुळे मराठीचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ.अशोक आमशेकर यांनी केले.
Golavali Sattari
Golavali SattariDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: मराठी भाषा हजारो वर्षांचा इतिहास असलेली समृद्ध भाषा असून ज्ञानेश्वर, तुकाराम यांसारख्या संतांनी तिला समृद्ध केले आहे. मराठी भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल, त्यामुळे मराठीचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ.अशोक आमशेकर यांनी केले.

गोवा मराठी अकादमी आणि गोवा मराठी अकादमी सत्तरी प्रभागातर्फे गोळावली येथे आयोजित साहित्य व सांस्कृतिक संमेलन उत्साहात झाले. या संमेलनाचे उद्‍घाटन केल्यानंतर डॉ. आमशेकर बोलत होते.

गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून राजकीय नेत्यांकडे त्यासाठी तगादा लावायला हवा, असेही डॉ. आमशेकर यांनी नमूद केले.

आरोही वेरेकर यांनी ईशस्तवन केले. ठाणे पंचक्रोशीतील महिलांनी स्वागतगीत सादर केले. राणी खोत यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. सुरुवातीला साहित्य दिंडी काढण्यात आली.

उद्‍घाटन सत्रात व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष विवेक जोशी, उद्‍घाटक आमशेकर, विशेष अतिथी गोवा मराठी अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रकांत कृ. गावस, स्वागताध्यक्ष नारायण खोत, गोवा मराठी अकादमी सत्तरी संयोजक आनंद मयेकर, संचालक चंद्रकांत म. गावस, गोवा मराठी अकादमी सत्तरी प्रभाग अध्यक्ष म्हाळू गावस, सचिव रामकृष्ण गावस, संमेलन कार्याध्यक्ष रामनाथ खोत, देवस्थान पुजारी ज्ञानेश्वर खोत तसेच आयोजन समिती सचिव गुरुदास खोत उपस्थित होते.

स्वागताध्यक्ष नारायण खोत यांनी सांगितले, की मराठी ही गोव्याची संस्कृती जपणारी भाषा आहे. त्यामुळेच मराठी शाळा टिकणे अत्यंत गरजेचे आहे. गोवा मराठी अकादमी सत्तरी संयोजक आनंद मयेकर यांनी मराठीमुळे संस्कार आणि समृद्धी मिळते, म्हणून मराठीचा प्रसार आणि प्रचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

गोवा मराठी अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रकांत कृष्णा गावस यांनी सत्तरी तालुक्यातील मराठीप्रेमी सक्रिय असल्याचे सांगत सत्तरी प्रभागाच्या कार्याचे कौतुक केले.

Golavali Sattari
Goa Marathi Natyaspardha: '..असे प्रकार घडत राहिले तर मात्र सगळ्या नाट्यस्पर्धांवरच पडदा पडेल'; निकालांवरच प्रश्नचिन्ह?

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २०१६ साली सरकारी गोवा मराठी अकादमी स्थापन करून मराठीच्या कार्याला चालना दिली व मराठीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रिया गावकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ज्येष्ठ भजनी कलाकार महादेव पांडुरंग जोशी, रामनाथ शंकर गावकर आणि विष्णू जानू गावडे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी संमेलन कार्याध्यक्ष रामनाथ खोत यांनी आभार मानले.

Golavali Sattari
गोव्यातील मराठीचा इतिहास हा केवळ भाषेचा इतिहास नाही, तर तो सांस्कृतिक संघर्षाचा ज्वलंत दस्तऐवज! हाती राजदंड, पण पाय डळमळीत

मराठी विद्यालये बंद पडणे चिंताजनक!

संमेलनाध्यक्ष विवेक जोशी यांनी मार्गदर्शन करताना मराठी ही आपल्या अस्तित्वाची भाषा असल्याने ती टिकवणे आवश्यक असल्याचे सांगितले. गोव्यात मराठी प्राथमिक शाळा असल्या तरी मराठी विद्यालये बंद होत असल्याची बाब चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकप्रतिनिधींवर दबाव आणून मराठीवरील अन्याय दूर करण्याची मागणी करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com