

मडगाव: घोगळ हाऊसिंग बोर्ड येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचा उपाध्यक्ष अली कलंदर खानजादे (४०) याच्या खून प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. शनिवारी रात्री पोलिसांनी निजामुद्दीन सय्यद व फिरोज शेख या दोघांच्या मुसक्या आवळल्या. शुक्रवारी पोलिसानी अक्रम खान, उबेद मकंदर, आलम सय्यद व रिझवान शेख या चौघांना अटक केली होती.
चौघांना शनिवारी मडगावच्या प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांनी राबवलेल्या ‘कोम्बिंग ऑपरेशनद्वारे’ साहिल उर्फ स्पाक्या, मेहबूब मकंदर, ताज मकंदर, अल्लाउदिन सय्यद, लतीफ सय्यद व अयुब सय्यद यांना ताब्यात घेतले.
सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. अटक केलेल्या संशयितांवर फातोर्डा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या १०३ (१), ६१, ३५१, १९० या कलमाखाली गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली.
दरम्यान, फातोर्डा पोलिसांशी संपर्क साधला असता निजामुद्दीन व फिरोज या दोघांना उद्या रविवारी पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
खुनाच्या घटनेनंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी शनिवारी पोलिस बंदोबस्तात या मशिदीला टाळे ठोकले. भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ च्या अंतर्गत प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई केली आहे. मशिदीसमोर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
आतापर्यंतच्या प्राथमिक पोलिस तपासात संशयित हे विवाह समारंभ व अन्य सोहळ्यासाठी पैसे आकारात होते. यास अली याचा विरोध होता. कदाचित, त्यासाठी त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला ओह. अली याच्या मृतदेहाची शवचिकित्सा केल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
सर्व संशयितांना जोपर्यंत अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह स्वीकारला जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा अली याच्या समर्थकांनी घेतला होता.
पोलिसांनी त्यांची समजूत काढल्यानंतर त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. या खून प्रकरणात सहभागी असलेल्या काही संशयितांनी अलीच्या कुटुंबीयांना धमकाविण्याचे सत्र सुरू केले. त्यामुळे त्यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक वर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.