

पणजी: गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालांनी राज्यातील राजकीय दिशा पुन्हा एकदा स्पष्ट केली. भाजप आणि मगोप (MGP) युतीने या निवडणुकीत विरोधकांना धोबीपछाड देत स्पष्ट बहुमत प्राप्त केले. या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला. "गोमंतकीय जनतेने पुन्हा एकदा काँग्रेसला नाकारले आणि डबल इंजिन सरकारवर विश्वास दाखवला," अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोफ डागली.
दरम्यान, या विजयाचे विश्लेषण करताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा आवर्जुन उल्लेख केला. मुख्यमंत्री म्हणाले की, "या विजयात सरकारच्या 'म्हजे घर' योजनेचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. या योजनेमुळे सामान्य लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाला असून त्या कृतज्ञतेपोटी जनतेने भाजपला भरभरुन मतदान केले." ही निवडणूक केवळ राजकीय लढाई नसून ती तळागाळातील लोकांच्या सक्षमीकरणाची पावती आहे, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिमान नेतृत्वाला दिले. त्यांनी जनतेचे आभार मानताना म्हटले की, "भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल आणि आम्हाला प्रचंड विजय मिळवून दिल्याबद्दल गोवा तुमचे मनापासून धन्यवाद! हा जनादेश म्हणजे पंतप्रधान मोदीजींचे नेतृत्व आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या 'डबल इंजिन' सरकारवरील विश्वासाचे प्रतिबिंब आहे."
भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या नेतृत्वाखाली रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. "आमच्या समर्पित कार्यकर्त्यांनी भाजपचे ध्येय शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अथक प्रयत्न केले, त्यामुळेच आज हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.
नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की, भाजपच्या नेतृत्वाखालील ही युती गोव्याच्या सर्वांगीण विकासाला गती देईल. पारदर्शक आणि उत्तरदायी प्रशासन देऊन 'विकसित गोवा' आणि 'विकसित भारत' घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या निकालामुळे गोव्यात भाजप हा पुन्हा एकदा 'नंबर 1' चा पक्ष ठरला असून, काँग्रेसच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.