

म्हापसा: बार्देश तालुक्यात भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. सध्या सातपैकी सहा विधानसभा आमदार हे या सत्ताधारी पक्षाचे आहेत. मात्र असे असूनही भाजपला ‘झेडपी’ निवडणुकीत ९ पैकी केवळ ६ जागांवरच समाधान मानावे लागले. गेल्या झेडपी निवडणुकीत भाजपने सात जागा जिंकल्या होत्या.
पक्षामधील काही वरिष्ठांच्या हस्तक्षेपामुळे शेवटच्या क्षणी लादलेल्या आपल्या मर्जीतील उमेदवारांमुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसला. परिणामी, काही मतदारसंघांत कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोधी उमेदवारांसाठी काम केल्याची चर्चा आहे. त्यामुळे बार्देशमध्ये भाजपचे संख्याबळ कमी होण्यास हे एक कारण असल्याचे बोलले जात आहे.
मंत्री नीळकंठ हळर्णकर यांचे नेतृत्व असलेले शिरसई व कोलवाळ हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडून निसटले. तेथे या पक्षावर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. कोलवाळ झेडपी मतदारसंघ कविता कांदोळकर यांनी पुन्हा जिंकला.
एकीकडे भाजप, काँग्रेस, आरजीची कामगिरी बार्देश तालुक्यात लक्षवेधी ठरली. पण आम आदमी पक्ष पूर्णतः अपयशी ठरला. याला कारण त्यांची मजबूत नसलेली पक्षसंघटना. आरजीचा तळागळात जनसंपर्क वाढला आहे. गावागावांतील तसेच जनहिताचे विषय ‘आरजी’कडून उचलून धरले जात आहेत. साहजिकच आगामी विधानसभा निवडणुकीत आरजीने काँग्रेससोबत युती केल्यास बार्देशातील राजकीय चित्र बदलू शकते.
बार्देश तालुक्याचे पालकमंत्री असलेले रोहन खंवटे यांनी आपले दोन्ही मतदारसंघांत मोठ्या मताधिक्यानेन ‘कमळ’ फुलवण्याची किमया साध्य केली. मात्र, शेजारील हळदोणा मतदारसंघ त्यांना पक्षाला जिंकून देता आले नाही.
भाजपचे पराभूत उमेदवार सुभाष मोरजकर यांना मंत्री रोहन खंवटे, माजी आमदार ग्लेन टिकलो आणि माजी प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांचा पाठिंबा होता. यासह पक्षसंघटना मोरजकर यांच्या बाजूने होती. तरीही काँग्रेसने या मतदारसंघात बाजी मारली. हा निकाल मंत्र्यांपेक्षा माजी आमदार टिकलो यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या भविष्यात मारक ठरू शकतो.
थिवी विधानसभा मतदारसंघातील दोन्ही झेडपी जागा या मतदारसंघाचे आमदार तथा मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्यासह भाजपला काबीज करता आल्या नाहीत. गेल्या दोनवेळा जिंकलेला शिरसई हा मतदारसंघ यावेळी भाजपने गमावला.
शिरसई व हळदोणा मतदारसंघातून बदलेल्या उमेदवारांमुळे भाजप कार्यकर्त्यांत नाराजी होती. तसेच, दोन्ही मतदारसंघांत मतविभागणीचा फटका बसला. या मतदारसंघांतील आरजीची मते भाजप व काँग्रेस यांच्यातील विजयाचे अंतर ठरले.
कळंगुट आणि शिवोलीमध्ये भाजपचे आमदार आहेत. या दोन्ही मतदारसंघांतील कळंगुट व हणजूण जिल्हा पंचायतीची जागा अवघ्या मतांच्या फरकाने भाजपला मिळाली. त्यामुळे भाजपासाठी हा निसटता विजय ठरला.
कळंगुटचा भाजप उमेदवार केवळ ६४३ मताधिक्क्याने जिंकला. कांदोळीमधील मतदारांचा कौल आणि आरजीने मिळवलेल्या पावणे चार हजार मतांमुळेच भाजपला ही जागा काबीज करता आली.
हणजूणमध्ये भाजपला काँग्रेसचे कडवे आव्हान मिळाले. केवळ २५३ मतांच्या फरकाने ही जागा भाजपने जिंकली. भाजपचे नारायण मांद्रेकर यांना ४७५४ तर काँग्रेसचे योगेश गोवेकर ऊर्फ मोगॅम्बो यांना ४५०१ मते पडली. वेर्ला-काणकातील मतदारांनी दिलेला कौल आणि आरजीने मिळवलेली २३६४ मते ही भाजपला लाभदायक ठरली.
रेईश-मागूश मतदारसंघात भाजपचे वर्चस्व राहिले. आमदार केदार नाईक व साळगाव मतदारसंघातील कार्यकर्ते आणि समर्थक मतदार हे रेईश-मागूश तसेच सुकूरमधील उमेदवारांच्या पाठिशी खंबीरपणे राहिले. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात भाजपला बहुमत मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.