

वास्को: राज्यात शनिवार, २० रोजी ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यासाठी शुक्रवारी गोवा मुक्तिदिनी सकाळपासूनच तालुकास्तरीय केंद्रांतून जिल्हा पंचायत निवडणूक साहित्याचे वितरण झाले असून सायंकाळपर्यंत निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्राचा ताबा घेऊन मतदानाची सज्जता पूर्ण केली. ही जिल्हा पंचायत निवडणूक मतपत्रिकेच्या माध्यमातून पक्षीय पातळीवर होणार असून त्यासाठी मतपेटी, शिक्का, मतपत्रिका, शाई तसेच सर्व साहित्य राज्य निवडणूक आयोगातर्फे पुरवले आहे.
निवडणुकीच्या आणि मतदानाच्या कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सकाळी ९.३० वा. तालुकास्तरीय निर्धारित केलेल्या केंद्रांत बोलावण्यात आले. तेथे मतदान साहित्याचे वाटप झाल्यानंतर तेथून ते मतदान केंद्रात रवाना झाले. त्यांना केंद्रावर जाण्यासाठी वाहतुकीची सोय करण्यात आली होती. शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांनी मतदानाची सर्व तयारी मतदान केंद्रांवर पूर्ण केली. शनिवार, २० रोजी सकाळी ८ वा. मतदानाची सुरुवात होणार आहे.
दरम्यान, वास्को येथील एमपीटी सभागृहात सांकवाळ व कुठ्ठाळी जिल्हा पंचायत मतदारसंघातील निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिस खात्याने दोन्ही मतदारसंघांत चोख बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी पोलिस खात्याने पोलिस स्थानक, वाहतूक विभाग, सुरक्षा विभाग व इतर विभागांतील मिळून सुमारे तिनशेहून अधिक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत.
दोन्ही जिल्हा पंचायत मतदारसंघात गट विकास अधिकारी कार्यालयातून निवडणूक केंद्रांची चोख व्यवस्था केली आहे. या दोन्ही मतदारसंघांत मिळून ५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात कुठ्ठाळी जिल्हा पंचायत मतदारसंघात २२ तर सांकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघात ३३ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
सांकवाळ जिल्हा पंचायत मतदारसंघात १४ हजार ६४५ पुरुष मतदार व १३ हजार ७५९ महिला मतदार मिळून एकूण २८ हजार ४०५ मतदार आहेत. येथे महिलांपेक्षा पुरुष मतदारांची संख्या अधिक आहेत. तसेच येथे १ तृतीयपंथी मतदार आहे. कुठ्ठाळी मतदारसंघात ८,०७४ पुरुष मतदार व ९,३६८ महिला मतदार मिळून १७,४४३ मतदार आहेत. या मतदारसंघात महिला मतदारांची संख्या जास्त आहे.
दोन्ही मतदारसंघांतील ५५ मतदान केंद्रांत एकूण ५५ पोलिंग एजंट, प्रत्येक मतदान केंद्रात ३ मतदान अधिकारी १६५ अधिकारी तसेच ३० बदली अधिकारी मिळून १९५ अधिकारी वर्ग तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक मतदान केंद्राध्यक्ष मिळून ५५ व १० अतिरिक्त बदली मतदान केंद्राध्यक्ष मिळून ६५ मतदान केंद्राध्यक्ष तैनात करण्यात आले आहेत.
तसेच ५५ शिपाई, प्रत्येक केंद्रावर २ पोलिस मिळून ११० पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता ५५ बालरथ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सर्वात मोठा तालुका असलेल्या सासष्टी तालुक्यातून ९ मतदारसंघांत शनिवारी (ता.२०) मतदान होणार असून त्यासाठी २२४ मतदान केंद्रे सज्ज झाली आहेत. या तालुक्यातील एकूण ९ मतदारसंघांत एकूण १,५७,२४३ एवढे मतदार असून पुरुष मतदारांची संख्या ७५,०७४ एवढी आहे तर महिला मतदार ८२,१६९ आहेत. मतदान शांततेने व्हावे यासाठी सगळीकडे चोख पोलिस बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी दिली.
सत्तरी तालुक्यातील नगरगाव, होंडा आणि केरी या तीन जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून, शुक्रवारी वाळपई कदंब बसस्थानक येथील सभागृहात निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सुमारे ११,००० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
सत्तरी तालुक्यातील एकूण ८३ मतदान केंद्रांवर ४९,७७४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये होंडा मतदारसंघात पुरुष- ८,०२८, महिला- ८,२११ - एकूण- १६,२३९ मतदार, केरी मतदारसंघात पुरुष- ८,४२६, महिला- ८,६५० - एकूण- १७,०७६ मतदार, नगरगाव मतदारसंघात- पुरुष- ८०८०, महिला- ८३७९, एकूण- १६,४५९ मतदारांचा समावेश आहे.
हरमल मतदारसंघ : ७,९२३ पुरुष व ७,५३४ महिला मिळून एकूण १५,०६१ मतदार आहेत. येथे २४ मतदान केंद्रे आहेत.
मोरजी मतदारसंघ : ७,६३४ पुरुष व ७,९२३ महिला मिळून एकूण १५,५५७ मतदार आहेत. येथे २१ मतदान केंद्रे आहेत.
धारगळ मतदारसंघ : ८,०२८ पुरुष व ८,१७५ महिला मिळून एकूण १६,२०३ मतदार आहेत. येथे २५ मतदान केंद्रे आहेत.
तोरसे मतदारसंघ : ७,५२७ पुरुष व ७५३४ महिला मिळून एकूण १५,०६१ मतदार आहेत. येथे २३ मतदान केंद्रे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.