

फोंडा: संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून राहिलेल्या कुर्टी जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप-मगोप युतीला नुकताच मगोपचा राजीनामा देऊन स्वतंत्र झालेल्या केतन भाटीकरांच्या अपक्ष उमेदवाराशी जोरदार टक्कर द्यावी लागत आहे.
निवडणुकीला फक्त एकच दिवस राहिला असला तरी अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. या निवडणुकीत भाजपने सगळी यंत्रणा कामाला लावल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. आणखी काही महिन्यांतच फोंडा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्याने या मतदारसंघाचा अर्धा भाग असलेला कुर्टी जि.पं. मतदारसंघ जिंकणे, हे भाजपच्या दृष्टीने अपरिहार्य बनले आहे.
दुसऱ्या बाजूने गेली विधानसभा निवडणूक फक्त ७७ मतांनी हरलेल्या भाटीकरांच्या दृष्टीनेही ही निवडणूक महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे सध्या या मतदारसंघात ‘करा वा मरा’ अशी स्थिती दिसत आहे.
काँग्रेसनेही जोर धरला असला तरी ते किती मजल मारतात, हे पाहावे लागेल. गेल्या जि.पं. निवडणुकीत रवी नाईक काँग्रेसचे आमदार असूनसुद्धा काँग्रेसला फक्त १९०० मते प्राप्त झाली होती. त्यामुळे यावेळी काँग्रेस यात किती भर घालतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सावित्री हॉल, कुट्टी येथे नुकत्याच झालेल्या जाहीर सभेला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे काँग्रेसच्या आशा थोड्या पल्लवीत झालेल्या दिसत आहेत. गेल्यावेळी जि.पं. निवडणूक रिंगणात नसलेला आम आदमी पक्ष यावेळी आखाड्यात उतरला असून त्यांनी वेरेचे माजी पंच मीनू गावडे यांना उमेदवारी दिली आहे.
पण त्यांच्या प्रचार आघाडीवर बरीच सामसूम दिसत असून संपूर्ण गोवाभर फिरलेले ‘आप’चे राष्ट्रीय नेते कुर्टीत फिरकलेले दिसले नाहीत. मात्र, वेरे भागात त्यांना काही प्रमाणात मते मिळू शकतात, असे बोलले जात आहे. एकंदरीत कुर्टी जि.पं.चे चित्र धूसर असले तरी या जि.पं. मतदारसंघाच्या निकालावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे, एवढे निश्चित.
भाजपने या मतदारसंघात उमेदवार प्रीतेश गावकर यांच्या प्रचारात कोणतीच कसर बाकी ठेवली नसून खांडेपार - वेरेचे भाजपचे सर्व पंचसदस्य तसेच फोंड्याचे भाजपचे नगरसेवक यांनी या उमेदवाराच्या प्रचारार्थ मतदारसंघाचा कानाकोपरा पिंजून काढल्याचे दिसत आहे. दक्षिण गोव्याचे भाजप सचिव विश्वनाथ दळवी आणि दिवंगत रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरविली असून त्यांनी या निवडणुकीवर बारीक नजर ठेवल्याचे दिसत आहे. दोघेही विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारीचे दावेदार असल्यामुळे या निवडणुकीच्या निकालावर त्यांचे भवितव्य ठरू शकते.
प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे हेही आपल्या वेरे पंचायतीत भाजपचे उमेदवार प्रीतेश गावकर यांच्या प्रचारासाठी वावरत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही या मतदारसंघात तीन जाहीर सभा घेतल्या असून त्यांच्यासोबत वीजमंत्री सुदिन ढवळीकर हेही होते. मात्र, युती आहे म्हणून सांगितले जात असले तरी मगोप कार्यकर्ते भाजपच्या प्रचारात अभावानेच दिसले, हेही तितकेच खरे. तरीही प्रचारात भाजपने जोरदार मुसंडी मारली, हे खरे.
मगोपचा राजीनामा दिलेले केतन भाटीकर हे सध्या एकाकी लढत देताना दिसत आहेत. विद्यमान जि.पं. उमेदवार प्रिया च्यारी यांचा अपवाद वगळता त्यांच्यासोबत कोणताही मोठा नेता फिरताना दिसला नाही. त्यामुळे त्यांची एकही जाहीर सभा होऊ शकली नाही. मात्र, मगोपचे बहुतेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत बघायला मिळाल्यामुळे मगोप सोडूनही ते मगोपमध्येच असल्यासारखे वाटत होते.
रवी नाईक काँग्रेसमध्ये असताना फोंडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून गणला जात असे; पण ते भाजपमध्ये गेल्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६८४० मतांवर समाधान मानावे लागले होते. आता कुर्टी जि.पं. निवडणुकीद्वारे फोंड्यातील गमावलेले स्थान परत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
प्रचारात फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर, खासदार विरियातो फर्नांडिस, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाग घेतला. आमदार विजय सरदेसाई आणि काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची जाहीर सभेत झालेली भाषणेही चांगलीच गाजली.
यावेळी काँग्रेसला चांगली मते मिळाल्यास त्याचा फायदा त्यांना आगामी पोटनिवडणुकीत होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसने सर्व शक्ती उमेदवार रामदास तिमयेकर यांच्या मागे लावली असल्याचे दिसून आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.